मोंगियाचं आई गं, पंतची गाणी आणि नेहराची शिवी, भारताचं स्टम्प माईक कनेक्शन फार जुनं आहे…

भारी भारी टीम्सचा बाजार उठवणाऱ्या आपल्या भारतीय टीमसमोर साऊथ आफ्रिकेची टीम अतिसामान्य वाटत होती. त्यात आपण पहिली टेस्ट जिंकलो आणि वाटलं आता सिरीजही आपलीच. पण झालं भलतंच पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये आपला बाजार उठला आणि आपण सिरीज हरलो.

पण कसंय, आफ्रिकेच्या विजयापेक्षा जास्त चर्चा स्टम्प माईकपाशी येऊन विराट, अश्विन आणि केएल राहुलच्या बडबडीची आहे. आता तो राडा नेमका काय हे बोल भिडूवर वाचायला मिळेल. पण याआधी स्टम्प माईकवरुन झालेले आणि ऐकायला आलेले किस्से बघुयात.

आईला आठवणारा नयन मोंगिया…

स्टाईलिश किपर किरण मोरे यांनी क्रिकेटला अलविदा केल्यावर १९९४ साली मोंगियाची टीममध्ये एंट्री झाली. मोंगिया चपळ क्रिकेटर म्हणून फेमस होताच, पण भावाचा आवाज लई दणकट. अपील करायला लागला, की नळावर भांडणाऱ्या काकूंनाही लाजवेल असा त्याचा आवाज होता. समजा एखादा फलंदाज आऊट होता होता हुकला, त्यानं फिल्डरच्या अगदी जवळून बॉल मारला की स्टम्प्सच्या मागून मोंगिया फिक्स ओरडणार… ”आई गंsssss.” हे ओरडणं इतकं नॅचरल असायचं, की मॅच बघणारी मराठी पोरं गल्ली क्रिकेटमध्येही ‘आई गं’ ची स्टाईल कॉपी करु लागली. असं म्हणतात, मोंगिया फिक्सिंगमध्ये घावला नसता तर धोनीच्या तोडीस तोड क्रिकेटर झाला असता.

धोनीवरुन आशिष नेहराची आठवण आली…

नेहराजी म्हणजे सदा हसतमुख आणि निवांत माणूस. नेहरा तुमच्या ऑफिसमध्ये असता, तर निम्मा दिवस हसण्यात आणि टाळ्या देण्यात गेला असता. पण हाच नेहरा खवळला की लय डेंजर वाटायचा. त्यात दिल्लीचं रक्त, त्यामुळं राग आल्यावर तोंडातून शिव्याच पडणार. एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू होती. अर्थात टेन्शनचा विषय. नेहरा बॉलिंग करत होता, किपींग करत होता धोनी. लांब केस असलेल्या धोनीचे ते नवेनवेच दिवस. आफ्रिदी स्ट्राईकवर होता, त्याच्या बॅटला एज लागून बॉल धोनीच्या जवळून गेला. धोनीनं कॅच सोडला आणि नेहराजी खवळले. त्यांनी डायरेक्ट धोनीची बहीणच काढली. ‘इतनी आसान कॅच नही पकड सकते यार…’ याच्या आधी नेहरा जे बोलला ते काय इथं लिहिणं शक्य नाही. पण स्टम्प माईकमध्ये सगळं रेकॉर्ड झालं आणि सगळ्या जगानं ऐकलंही.

धोनी एकदा मराठी बोलला होता…

हा खरंच. झालं असं की भारताची न्यूझीलंड विरुद्ध मॅच होती. मॅचच्या आधी धोनीनं आपला मराठमोळा खेळाडू केदार जाधवकडून मराठीचे धडे घेतले होते. मॅचमध्ये केदार बॉलिंगला आला आणि धोनी त्याला म्हणाला, ‘पुढे नको भाऊ. घेऊन टाक..’ विकेट काढण्याचा सल्ला धोनीनं मराठीमधून दिला आणि स्टम्प माईकमधून ते ऐकून सगळेच फॅन्स खुश झाले.

स्टम्प माईकचा विषय निघालाय आणि रिषभ पंतचा विषय निघणार नाही हे कसं शक्यय…

हा भिडू तोंडाला रेडिओ लावलेला असल्यासारखा बडबड करत असतोय. आश्विन बॉलिंगला आला की याचा जप सुरू होतो… ‘कम ऑन ॲश, कम ऑन ॲश.’ हे कमी म्हणून की काय, समोरच्या टीमचा प्लेअर बॅटिंगला आला, तरी पंत त्याला सुट्टी देत नाही. मग तो सिनिअर असो किंवा नवीन. एकदा तर भाऊ गाणं म्हणत होता… ‘स्पायडर मॅन, स्पायडर मॅन.. तुमने चुराया मेरे दिल का चैन.’ (आता तुम्ही हे चालीत वाचलं असणार हे फिक्स.) एकदा इंग्लंडचा ओली पोप बॅटिंग करत होता, पंत मागून म्हणाला ‘ओली पोप को लॉलीपॉप दो.’ हे जसं स्टम्प माईकवरुन सगळीकडे ऐकायला गेलं आणि कमेंटेटरही हसायला लागले.

थोडक्यात काय, तर स्टम्प माईक आणि भारतीयांचं कनेक्शन फार जुनं आहे, अगदी नयन मोंगियापासून विराट कोहलीपर्यंत…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.