युक्रेनच्या प्रतिकाराने हैराण झालेले पुतीन अणुबॉम्ब टाकून युद्धाचा विषय कायमचाच संपवणार का ?
रशिया- युक्रेन वादात इलॉन मस्कने पुन्हा उडी घेतली आहे. मागच्यावेळी युक्रेनला स्टारलिंक कंपनीच्या सॅटेलाइटद्वारे मदत करणाऱ्या इलॉन मस्कने आता युद्ध संपवण्यासाठी एक डील पुढं केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली रशियाने हस्तगत केलेल्या प्रदेशात पुन्हा निवडणूक घ्या. जर लोकांनी रशियाविरोधात मतदान केलं तर रशिया त्या प्रदेशाचा ताबा सोडेल.
– 1783 पासून क्रिमिया औपचारिकपणे रशियाचाच भाग आहे.
– क्रिमियाला पाणी पुरवठा चालू राहील याचं आश्वासन द्यावं.
– युक्रेन तटस्थ राहील.
या तीन मुद्यांवर शांतता करार करून युद्ध संपवावं अशा आशयाचं ट्विट इलॉन मस्कने केलं आहे.
मात्र युक्रेनने हा प्लॅन सरळ सरळ धुडकावून लावला आहे. यावर युक्रेनचे डिप्लोमॅट्स तुटून पडत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही यावर ट्विट करून रिप्लाय दिला आहे. तुम्हाला कोणता एलोन मस्क जास्त आवडतो. रशियाला सपोर्ट करणारा की युक्रेनला सपोर्ट करणारा अशा आशयाचं ट्विट इलॉन मस्कने केलं आहे.
याच ट्विटवर पुढे रिप्लाय देताना इलॉन मस्कने त्याच्या या ट्विट करून रशिया युक्रेनमधील युद्धबंदीसाठीच्या बंदीमागील कारण सांगितलं आहे. युक्रेनने क्रिमिया पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होतील. कदाचित तो प्रयत्न अयशस्वी होईल आणि आण्विक युद्धाचा धोका असेल. हे युद्ध युक्रेन आणि पृथ्वीसाठी भयंकर असेल असं इलॉन मस्क म्हणाले आहेत.
याआधीच व्लादिमिर पुतीन यांनी अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या आहेत त्यामुळे आता युद्ध संपवण्यासाठी पुतीन शेवटचा पर्याय वापरणार का? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
तर कोणताही देश अणुवस्त्रांच्या वापरसाठी काही निकष स्वीकारता असतोय ज्याला नुक्लियर डॉक्ट्रीन असं म्हटलं जातं. रशियाच्या १९९३ च्या नुक्लियर डॉक्ट्रिननुसार जर जागतिक युद्ध झालं तरच रशिया अणुबॉम्बचा वापर करेल असं लिहलं होतं. मात्र पुतीन आल्यानंतर या डॉक्ट्रिनमध्ये मोठया प्रमाणात बदल करण्यात आले.
रशियाला त्यांच्या शेजारील देशांकडून मोठ्या प्रमाणात संघर्षाला सामोरं जावं लागत होतं. हे लक्षात घेऊन रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे तत्कालीन सचिव व्लादिमीर पुतिन यांनी एक नवीन लष्करी सिद्धांत विकसित केला. आणि एप्रिल 2000 मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वाक्षरी केली, त्यात असे सूचित केले गेले की जर रशियाला मोठ्या प्रमाणात हल्ल्याचा सामना करावा लागला.
त्याच्या पारंपारिक सैन्याच्या क्षमतेपेक्षा ह्या हल्ल्याची तीव्रता जास्त असेल तर ते संरक्षणासाठी प्रमर्यादित आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर देऊ शकेल.
अशी या डॉक्ट्रिनमध्ये तरतूद होती . त्यानंतर जून 2020 मध्ये आण्विक प्रतिबंधक धोरणाच्या अंमलबजावणीचे स्पष्टीकरण करण्याच्या उद्देशाने रशियाने “रशियन फेडरेशनच्या राज्य धोरणाची मूलभूत तत्त्वे आण्विक प्रतिबंधावर” हा एक नवीन दस्तऐवज जारी केला.
“रशियन फेडरेशनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर परिस्थिती” मध्ये पारंपारिक हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून अण्वस्त्र वापरण्याची शिफारस केली आहे, जो ‘एस्केलेट टू डीस्केलेट’ या संकल्पनेचा स्पष्ट संदर्भ आहे. या तत्वानुसार युद्ध वाढू नये म्ह्णून अणुबॉम्बचा वापर करून ते सुरवातीच्या टप्यातच संपवण्याच्या दृष्टीने अणुबॉम्ब वापरला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.
अणुबॉम्बचा वापर अनेकदा पुढच्या राष्ट्राला तंबी देण्यासाठीच जास्त केला जातो त्याला डेटारांस देखील म्हटलं जातं.
दिवसेंदिवस न्यूक्लियर डॉक्ट्रीन आक्रमक करून रशियाने हाच संदेश दिला असल्याचं सांगतात. रशियाच्या याच धमकीमुळे NATO आणि इतर युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला सपोर्ट करूनसुद्धा युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाहीये. मात्र या राष्ट्रांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र पुरवणं. त्याचबरोबर रशियावर आर्थिक निर्बंध लादणं यामुळं रशियाला हे युद्ध चांगलंच जड जात आहे.
त्यामुळेच पुतिन यांनी युक्रेनमधील युद्ध हे रशिया आणि पश्चिमेकडील राष्ट्र यांच्यातील अस्तित्त्वाची लढाई म्हणून मांडले आहे. पुतीन यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की या राष्ट्रांना रशियाला नष्ट करायचे आहे आणि रशियाच्या विशाल नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवायचे आहे.
मात्र काही विश्लेषक म्हणतात की पुतिन यांची ही बाष्कळ बडबड आहे आणि ते एवढ्या टोकाचं पाऊल उचलणार नाहीत. पण पुतीन यांच्या धमकीला अमेरिकेने गांभीर्याने घेण्यास सुरवात केली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी स्पष्ट केले आहे की युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा कोणताही वापर “पूर्णपणे अस्वीकार्य” असेल आणि “गंभीर परिणाम भोगावे लागतील.” परंतु त्याचे काय परिणाम होतील याबद्दल अमेरिकन सरकारसुद्धा संदिग्ध असल्याचं सांगितलं जातं.
मात्र जर रशियाने अणुबॉम्ब हल्ला करायचा ठरवल्यास अमेरिकेला ते थांबवता येइल का ?
रशियन अण्वस्त्र हल्ल्यामुळे याची अमेरिकेला किंवा इतर युरोपियन राष्ट्रांना माहितीच नसणार असं होणार नाही. रशिया आण्विक हल्ला करण्याचा विचार करत असेल तर कदाचित विविध सरकारी आणि संरक्षण एजन्सींमध्ये होणारी संभाषण आणि सिग्नलस या देशांकडून ट्रक केले जातील. रशिया अणुबॉंमचा उपयोग करणार आहे हे लक्षात आल्यानंतर “रशियावर टाकलेल्या राजनैतिक दबावात मोठ्या प्रमाणात वाढ” होईल. रशियाच्या विरोधात मजबूत भूमिका घेण्यासाठी चीन आणि भारतासारख्या देशांवर देखील राजनैतिक दबाव देखील वाढेल आणि रशियाच्या इंधनाच्या निर्यातीसाठी या देशांवर अवलंबून राहण्यामुळे ते अधिक प्रभाव पाडू शकतील असं जाणकार सांगतात.
पण रशियाकडे आण्विक साठा किती आहे आणि जर हल्ला केला तर ते कोणत्या अणुबॉम्बचा वापर करू शकतील का ?
हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अण्वस्त्रांच्या संख्येत रशिया ही जगातील सर्वात मोठी आण्विक शक्ती आहे. त्याच्याकडे 5,977 अणुबॉम्ब आहेत तर युनायटेड स्टेट्सकडे 5,428 आहेत. यामध्ये टॅक्टिकल वेपन्स म्ह्णून वापरता येणारे अणुबॉम्ब अतिशय महत्वाचे असतात. रशियाकडे असे २००० अणुबॉंबी असल्याचं सांगण्यात येतं. हे अणुबॉम्ब क्षेपणास्त्र, पाणबुडी, फायटर जेट यामधून टाकता येतात. रशिया गेल्या काही वर्षात या वेपासवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचा अमेरिकेचा अहवाल आहे.
त्यामुळे येत्या काळात जर आण्विक युद्धाला जगाला सामोरं जायचं नसेल तर रशिया-युक्रेन युद्ध लवकरात लवकर थांबलं पाहिजे असं जाणकार सांगतात आणि म्हणूनच इलॉन मस्कने यात उडी घेतली आहे.
हे ही वाच भिडू :
- कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी रशियाचं रुबल २०२२ चं सर्वोत्तम चलन ठरलं
- लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता