सुभाष घईला शिवसैनिकांनी धमकी दिली होती, “घरी येऊन कपडे काढून फटके दिले जातील.”
वर्ष १९९३. मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे संपुर्ण देश हादरला. शेकडो जण मृत्युमुखी पडले. हा अतिरेकी हल्ला तर होताच पण दाऊद इब्राहिम, टायगर मेमन सारख्या अंडरवर्ल्डच्या गँगस्टर लोकांनी हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. मुंबई दंगलीत होरपळलेल्या तरुणांचा वापर या स्फोटांसाठी करण्यात आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे खूप लांबपर्यंत पोहचले होते.
अशातच बॉम्बस्फोटामधील संशयितांच्या यादीत एक धक्कादायक नाव समोर आलं,
फिल्मस्टार संजय दत्त
संजय दत्तच्या घरात पोलिसांना काही एके-५६ व हॅन्ड ग्रेनेड सापडले होते. त्याला अटक झाली. प्रेक्षकांचा लाडका संजू बाबा खरंच अतिरेकी आहे का यावरून उलटसुलट चर्चा झाली. कोर्टाने त्याची रवानगी ठाणे जेलमध्ये केली. पोलीस गाडीत दाढी वाढलेला लांब केसांचा संजू एखाद्या कसलेल्या गुन्हेगारांसारखा वाटत होता.
संजय दत्तला अटक झाल्यावर त्याच्या घरच्यांना जेवढं दुःख झालं नसेल त्याच्याहून जास्त दुःख एका व्यक्तीला झालं होतं. ते होते फेमस सिने दिग्दर्शक सुभाष घई.
नव्वदच्या दशकात सुभाष घई एक नंबरचा डिरेक्टर गणला जायचा. कर्ज, हिरो, रामलखन या सिनेमांमुळे त्याला शोमॅन म्हणून उपाधी मिळाली होती. या शोमॅनचा एक ड्रीम प्रोजेक्ट सुरु होता आणि त्यात संजू बाबा मुख्य भूमिकेत होता.
पिक्चरचं नाव खलनायक.
खलनायकच शूटिंग पेंडिंग होतं. संजू खरोखरचा खलनायक आहे हे सिद्ध झालं तर आपले करोडो रुपये पाण्यात जाणार याची सुभाष घईला खात्री होती. त्याचा जीव संजय दत्त पेक्षाही खलनायक मध्ये अडकला होता. काहीही करून त्याला जेलमधून बाहेर काढायचं हेच घईंच्या डोक्यात फिट बसलं होतं.
सरकारवर प्रेशर टाकायचं म्हणून सुभाष घईंनी ठाणे जेलवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये त्याने मोठमोठ्या सिनेस्टार्सला गोळा केलं होतं. हा मोर्चा चांगलाच गाजला. रस्त्यावर उतरलेल्या सेलिब्रेटींना पाहायला लोकांनी गर्दी केली. संजू निर्दोष आहे अशा घोषणा चर्चेचा विषय ठरल्या.
हे सेलिब्रिटी देशद्रोह्याला मदत करत आहेत असं म्हणत ठाण्याचा शिवसेनेचा वाघ म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी सुभाष घईंच्या मोर्चावर दगडफेक केली. दहाबारा गाड्या फोडून टाकल्या. सिनेतारे पळून गेले. सगळ्या वर्तमानपत्रात हा आगळा वेगळा मोर्चा आणि त्याच्या वरील शिवसेनेचा हल्ला फ्रंटपेजवर छापून आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाष घई यांचा फोन घणघणला.
‘सुभाष घई है क्या, मै शिशिर शिंदे बात कर रहा हूँ, मुलुंडसे.’
सुभाष घई यांचे कान टवकारले. आवाजात शक्य आहे तेवढी नम्रता आणत तो म्हणाला,
‘बोलो बोलो. नमस्कार शिशिरजी.’
शिशिर शिंदे एक कट्टर शिवसैनिक म्हणून फेमस होते. राज ठाकरेंचे शिलेदार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पाकिस्तान दौऱ्यावेळी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून काढणाऱ्यामध्ये त्यांचं नाव आघाडीवर होतं. सुभाष घई यांची त्यांच्याशी चांगली ओळख होती.
घईंनी संजय दत्तच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याची बातमी वाचल्या वाचल्या शिशिर शिंदेंची तळपायाची आग मस्तकाला पोहचली होती. त्याच रागात त्यांनी घई ला फोन केला होता.
‘सुभाष, मैं शिशिर शिंदे बात कर रहा हूं, मैं अभी तुम्हारा दोस्त नही, तुमने क्या मोर्चा निकाला था संजयके रिहाईके लिए? सुभाष, तुमको लगता है, तुम वहाँ पाली हिलमें रहते हो, मगर ऐसी हरकत की तो तुमको नही छोडूंगा मै. यदि हिंमत हो तो फिरसे मोर्चा अनाऊन्स करो. तुमको घरपे आके नंगा करुंगा. हरामजादे, संजय तुम्हारा कौन लगता है?’
शिशिर शिंदे सांगतात, मी फोनवर सुभाष घईचे कपडे काढले. माझा दम ऐकताच घईंनी फोनवर अक्षरश: भोकाड पसरलं- ‘हम इतने बार मिले हैं, मुझे माफ करो’, अशी क्षमायाचना घई फोनवर करायला लागले.
शिशिर शिंदेनी घईला पोटभर शिव्या घातल्या आणि रागात फोन ठेवून दिला. पण पुढच्या बारा-पंधरा मिनिटांतच त्यांच्या घरचा फोन वाजला. मातोश्रीवरुन फोन आला होता. समोरच्यानं सांगितलं, साहेबांना बोलायचंय.
शिशिर शिंदे: ‘जय महाराष्ट्र साहेब.’
बाळासाहेब ठाकरे: ‘जय महाराष्ट्र! काय चाललंय तुझं?’
बाळासाहेबांच्या आवाजात राग होता.
शिशिर शिंदे : ‘नाही साहेब, काहीच नाही. मी परवापासून झोपून आहे, पाठ खूप दुखतेय.’
बाळासाहेब ठाकरे: ‘तू काय सुभाष घईला फोन केला होतास?’
शिशिर शिंदे : ‘हो साहेब, मोर्चा काढला होता त्याने ठाण्यात. आनंद दिघेंनी दगडफेक केली, त्याच्या मोर्च्यावर.
बाळासाहेब ठाकरे: ‘मी एक नालायक सेनापती आहे तुमचा. तू आणि आनंद नवीन शिवसेना चालू करा आता!!!’
हे ऐकताच शिशिर शिंदेंची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी बाळासाहेबांची पुन्हा पुन्हा माफी मागितली. माझा असा कोणताही विचार नव्हता, पण मला घईचा खूप राग आला होता, अशी विनवणी त्यांनी केली.
‘गप्प बस एकदम. त्याला काही हात लागता कामा नये,’ असं त्यावर बाळासाहेबांनी सुनावलं.
पुढच्या दहा मिनिटांनी आनंद दिघेंचा देखील शिशिर शिंदेंना फोन आला. तेही तितकेच हबकले होते…
‘शिशिर, साहेबांचा फोन आला होता. मला दम दिला. आयला, तू माझं नाव सांगितलंस. साहेबांनी माझे कान उपटले. तू आणि शिशिर नवी शिवसेना सुरु करा, असं साहेब म्हणाले.’
शिशिर शिंदे म्हणाले,
‘दिघेसाहेब, दोन दिवसांनी आपण एकत्र जाऊया व साहेबांची माफी मागूया’
पुन्हा दहा मिनिटांत शिशिर शिंदेंच्या घरचा फोन वाजला. मातोश्रीवरून फोन होता. शिंदेंचा काळजाचा ठोकाच चुकला. पलीकडून बाळासाहेबच बोलत होते,
‘शिशिर, तुझी पाठदुखी वरचेवर सुरु असते. राष्ट्रपतींचे डॉक्टर माझ्याकडे आलेत. तेव्हा तू इकडे ये. तुझ्याकडे गाडी आहेच. पण तू चालवू नकोस, पाठीमागे झोपून ये आणि ड्रायव्हरला चालवायला सांग’
बाळासाहेबांचा आवाज अत्यंत प्रेमळ होता. शिशिर शिंदे म्हणतात,
काही क्षणातच मला साहेबांचं दुसरं रुप आता अनुभवयाला मिळत होतं. आधीच्या फोनने मी चिंताग्रस्त असतानाच, आता हा असा फोन अगदी आपुलकी दाखवणारा होता.
शिशिर शिंदे मातोश्रीवर आले. मातोश्री त्यावेळी दुमजली होतं. तिथे बाळासाहेब तळमजल्यावर त्यांच्या खोलीत होते. त्यांनी शिंदेंची राष्ट्रपतींच्या डॉक्टरांशी इंग्रजीत ओळख करुन दिली.
हा माझा एकदम धडाडीचा शिवसैनिक आहे, असं ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या खोलीत सोफासेट, कोच आणि दोन खुर्च्या होत्या. डॉक्टरांनी उपचारासाठी शिंदेंना कपडे काढायला सांगितले. ते अवघडल्यासारखा झाले. बाळासाहेबांनी ते जाणलं आणि दरवाजा लावून घेतला. कडी लावली. शिंदे लाजत आहेत हे लक्षात आल्यावर ते त्यांच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत म्हणाले.
अरे काढ तो झब्बा. आतमध्ये तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाहीये.
डॉक्टरांनी शिशिर शिंदेंना तपासायला सुरुवात केली, तेव्हा बाळासाहेब त्यांचा झब्बा हातात धरुन उभे होते. शिशिर शिंदे सांगतात,
माझ्या पाठदुखीपेक्षाही मी त्या प्रसंगाने जास्तच अवघडलो. एका शिवसैनिकाचा झब्बा स्वत:च्या हातात घेऊन साक्षात शिवसेनाप्रमुख उभे आहेत, हे दृश्य पूर्णपणे अविश्वसनीय वाटेल. पण बाळासाहेबांचे अफाट मोठेपणच त्यातून दिसते.
हे हि वाच भिडू.
- छोटा राजनने बाळासाहेबांना सल्ला दिला, दाऊद देशद्रोही नाही, ठाकरेंनी लक्ष घालू नये.
- अशाप्रकारे शिवसेनेत असताना राज ठाकरेंचे पंख छाटण्यास सुरवात करण्यात आली होती
- बाळासाहेब म्हणाले, मी एकटा फोटो काढणार नाही, नितीनला पण बोलावं