सुभाषबाबूंनी पेटवलेली देशभक्ती महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं कल्याण करून गेली
भाऊसाहेब उर्फ डॉ.पंजाबराव देशमुख या महान व्यक्तिमत्वाने शिक्षण क्षेत्रात हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवलयं. पाठीमाग वळून पाहिलं तर तुम्हाआम्हाला समजत की त्यांची दुरदृष्टी वर्तमानाचा वेध घेणारी आणि भविष्याची पाऊल ओळखणारी होती.
महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतात नावाजलेले मोठं नाव आणि शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थानांच्या माध्यमातून आज दिसत आहे. तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, अस्पृश्य, गरीब व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे नेते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख ओळखले जातात.
जेव्हा भाऊसाहेब इंग्लंड मध्ये शिकायला होते तेव्हा त्यांची भेट सुभाषचंद्र बोस यांच्याशी झाली. सुभाषबाबूंच्या प्रभावामुळेच पंजाबरावांच्या मनात देशसेवेचे बीज रुजले.
भाऊसाहेबांचा जन्म वडील शामराव व आई राधाबाई यांच्या पोटी २७ डिसेंबर १८९८ या दिवशी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील या पापळ गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. पुढे चालून आपला मुलगा शिक्षण क्षेत्रात बदल घडवेल असे त्यांच्या आई वडिलांना किंचितही वाटले नव्हते.
अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी त्यांचे बालपणीचे शिक्षण झालं. त्यांचं मन लहानपणापासूनच कनवाळू होत. एकदा प्राथमिक शाळेत शिकताना त्यांचा वर्गमित्र सोबत होता. ते दोघेजण रस्त्याने पायी चालत शाळेत जात होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मित्राच्या अंगात सदरा नव्हता, त्याच्या अंगाला चटके बसत होते. ही गोष्ट पंजाबरावांना लगेच खटकली. त्यांचे संवेदनशील मन एकदम गहिवरून आले. त्यांनी स्वत:च्या अंगातील सदरा काढून त्या गरीब मित्राला दिला. त्या गरीब मित्राला देवदर्शन झाल्यासारखे वाटले.
पुढे जन्मगावीच ते मॅट्रिकही उत्तीर्ण झाले. जेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा अमरावतीला द्यायला आले होते, तेव्हाच त्यांनी ठरवले की मला उच्च शिक्षण घेणे हे फार महत्वाच आहे, म्हणून त्यांनी पुणे गाठलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ते दाखल झाले.
मुलानं खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आईवडिलांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे देशाचे पांग फेडावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांचे आईवडील उराशी बाळगून होते. कितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी चालेल परंतु पंजाबरावाचे उच्च शिक्षण थांबवायचे नाही, ही जिद्द आई-वडिल मनाशी बाळगून होते. त्या दिशेने वाटचाल करून स्वत:ची शेती गहाण ठेवून पंजाबरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना केले.
पुढं केंब्रीजला असताना त्यांची गाठ एकदा सुभाषचंद्र बोस यांच्याशी पडली. तेव्हा सुभाषबाबू आय.सी. एस. ची परीक्षा देत होते. सुभाषबाबूंनी घरी पाठविण्यासाठी लिहलेले पत्र डॉ. पंजाबरावांना वाचायल मिळालं. पत्रातील मजकूर असा होता
मी आय. सी. एस. पदवीचा उपयोग मान-सन्मान आणि पैसा कमविण्यासाठी करणार नाही. तर माझ्या मायभूला स्वतंत्र करण्यासाठी करेन.
या विचाराने भाऊसाहेब प्रभावित झाले आणि त्याचवेळी खर्या अर्थाने समाजक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मायभूमी साठी अनेक विद्यार्थी शिकवण्याचे कार्य नेटाने चालविण्याचे व्रत डॉ. पंजाबराव देशमुखांनी घेतले. पंजाबराव अवघे सत्तावीस वर्षांचे असताना त्यांना तत्वज्ञानाचे महापंडित ही उपाधी प्राप्त झाली.
त्यावेळी विदर्भात बोटांवर मोजता येतील एवढ्या कमी शाळा होत्या. अशा शाळेत केवळ गर्भश्रीमंत आणि भांडवलदारांचीच मुले शाळेत जात असत. तालुक्याच्या ठिकाणीच शाळा असल्यामुळे गोरगरीबांच्या आणि मागासलेल्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा अशा मुलांच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुखांनी अमरावती येथे श्रद्घानंद छात्रालय स्थापन केले.
या कामासाठी त्यांना आबासाहेब खेडेकर, नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंग चव्हाण आदी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्रद्घानंद छात्रालयात सर्व जाती-धर्मांची मुले एकत्र येऊन शिक्षण घेतात, जेवतात, हे पाहून संत गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुखांची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
अमरावती इथं त्यांनी आणखी एक शाळा स्थापन केली, ती म्हणजे श्री शिवाजी मराठा हायस्कूल. त्यामुळे बहूजनांच्या मुलांना शिकण्याची सोय झाली. तिलाच अनेकजण तट्टा हायस्कूल म्हणून हिणवू. शाळेला समाजकंटकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. पंजाबरावांनी त्याकडे विशेष लक्ष देऊन तिचे संरक्षण केले. तिचे १ जुलै १९३२ ला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती असे नामकरण केले. या ज्ञानगंगेचा उगम अमरावती येथे झाला असला तरी ती ज्ञानगंगा तिच्या वैशिष्ट्याने वाहत जाऊन मोठी झाली. आज ती विशाल वटवृक्षासारखी फोफावली आहे.
हे हि वाच भिडू.
- निझामाने अख्खा विदर्भ इंग्रजांना भाड्याने दिला तेव्हा
- भारतातील पहिली बाजार समिती विदर्भाच्या कारंजालाडमध्ये स्थापन झाली
- मतदारसंघाचाच विचार करणाऱ्या नेत्यांना सांगा, कृष्णाकाठच्या माणसाने विदर्भासाठी योजना आणली