आणि कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.

सुभाषचंद्र बोस यांना सुरवातीपासून कॉंग्रेस मध्ये आक्रमक नेता म्हणून ओळखलं जायचं. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अखिल भारतीय युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. तिथून अवघ्या तीन चार वर्षात ते देशपातळीवर लाडके नेते म्हणून प्रस्थापित झाले. सुभाष बाबू व जवाहरलाल नेहरू या तरुण नेत्यांमुळेच १९२७ साली कॉंग्रेस अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला.

देशाच्या पातळीवर नव्या राजकारणाची ही सुरवात होती. ताज्या दमाचे हे नेते आपले म्हणणे जुन्या नेतृत्वाला मान्य करण्यास भाग पाडत होते. तरुणांच्यात त्यांची लोकप्रियता शिगेला पोहचली होती. याच नेत्यांनी कॉंग्रेस मध्ये समाजवादी विचारसरणीला आवाज मिळवून दिला. 

सुभाषबाबू तर वर्गविरहीत समाजव्यवस्थेचे समर्थक होते. आज आपण कम्युनिझम म्हणून ओळखतो त्या डाव्या विचारसरणीकडे झुकणारे त्यांचे विचार होते. इंग्रजांकडून सत्ता परत घ्यायची असेल तर क्रांती घडवावी लागेल आणि त्यासाठी वेळ पडल्यास शस्त्र ही उचलावे लागले तर उचलायचे ही सुभाषबाबूंची जहाल मते कॉंग्रेसमधील उजव्या विचारांच्या नेत्यांना पसंत नव्हती. यातूनच कॉंग्रेस मध्ये ठिणगी पडली. जुने जाणते गांधीजी आणि  तरुण सुभाषचंद्र बोस अशा दोन भागात कॉंग्रेस विभागली गेली.

1314487 Wallpaper2

गांधीजीचा विरोध असूनही सुभाषचंद्र बोस १९३८ च्या हरिपूरअधिवेशनात कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले. युरोप दौऱ्यावर जाऊन आलेल्या सुभाषबाबुनी कॉंग्रेसमध्ये नवे बदल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले. काही वर्षापूर्वी मोदी सरकारने रद्द केलेल्या योजना आयोगाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनीच केली होती आणि त्याचे पहिले अध्यक्षपद नेहरुंना देण्यात आले होते.

१९३९ साली त्रिपुरी अधिवेशनात मात्र बोस व गांधी वाद टोकाला जाऊन पोहचला. त्या वर्षीच्या निवडणुकीत सुभाषबाबुनी गांधीजींचे उमेदवार पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून कॉंग्रेस अध्यक्ष पद मिळवले. गांधीजीनी हा आपला स्वतःचा पराजय मानत कॉंग्रेसचा राजीनामा दिला. अखेर वाद नको म्हणून सुभाषबाबुनी कॉंग्रेस अध्यक्षपद सोडले.

३ मे १९३९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्ता येथील एका विराट सभेत कॉंग्रेस अंतर्गतचं आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली त्याच नाव होत फॉरवर्ड ब्लॉक. नेताजींना मानणारे अनेक कार्यकर्ते या पक्षात सामील होण्यासाठी आले. असं म्हणतात की या सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांना सुभाषबाबुंनी आवाहन केले होते,

“ज्यांना ज्यांना माझ्या पक्षात सामील व्हयाचे आहे त्यांचे ब्रिटीश सरकारकडे परतीचे मार्ग बंद होणार आहेत. यासर्वांनी आपल्या अंगठा कापून रक्ताने प्रतिज्ञापत्रावर सही करावी.”

त्यावेळी सतरा तरुण मुलीनी स्टेजवर येऊन या प्रतिज्ञापत्रावर सही केली आणि  फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची सुरवात झाली.

optimizegeneral

फॉरवर्ड ब्लॉकचे पहिले अधिवेशन २० जून ते २२ जून १९४० रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सुभाषबाबूंनी आपल्या पक्षाची विचारसरणी स्पष्ट केली. ब्रिटीश साम्राज्यवादाच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांती करणे, अन्यायकारी भांडवलशाही चा विरोध, कामगारांना न्याय मिळवून देणे, सर्वधर्मसमभावाचा विचार रुजवणे आणि स्वतंत्र भारतात समाजवादी विचारांचे सरकार स्थापन करणे, ही या पक्षाची उद्दिष्ट्ये होती.

याच अधिवेशनात पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नेताजी अध्यक्ष तर एच.व्ही कामत जनरल सेक्रेटरी बनले. महायुद्धाच्या काळात इंग्रज सरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. हाच २२ जून १९४० हा दिवस फोरवर्ड ब्लॉकचा स्थापना दिवस मानला जातो.

पण पक्षाची घडी बसण्यापूर्वी थोड्याच दिवसात सुभाषचंद्र बोस यांच्यावर ब्रिटीश पोलिसांनी कारवाई केली. त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढे नेताजी ही नजर कैद तोडून फरार झाले. पुढे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली , या सैन्याच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. युद्धाच्या दरम्यान एका संशयास्पद अपघातात त्यांचा मृत्यू झाला हा इतिहास तर आपल्याला माहित आहे.

 पण फॉरवर्ड ब्लॉकचं पुढ काय झालं?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर हा पक्ष अधिकृतरीत्या कॉंग्रेसमधून बाहेर पडला. निवडणूक जिंकूनही फोरवर्ड ब्लॉकचे एच व्ही कामत संविधान सभेत सामील झाले नाहीत. मात्र फॉरवर्ड ब्लॉकमध्येही वैचारिक वाद झाले आणि येथील कामगार चळवळीचे नेते रामचंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली रुईकर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना झाली.

मूळ फॉरवर्ड ब्लॉक पक्षामध्ये कॉंग्रेसने नेहरूंच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचारसरणी स्वीकारली आहे आणि त्यामुळे पक्षात परत जावे का हा विचार जोर पकडत होता. पण कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला. सुभाषबाबूंचे कट्टर समर्थक मुथुरामलिंगम थेवर यांच्या मृत्यू नंतर पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व क्षीण होत गेले.

विदर्भवादी जांबुवंतराव धोटे, बिहार मधील काही जागा वगळता फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष फक्त बंगाल पुरता मर्यादित होऊन बसला. अनेक वेळा फुटल्यामुळे त्याची ताकद वेळोवेळी कमी कमी होत गेली .

मार्क्सवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारा अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक पक्ष २०१९च्या निवडणुकीतही अनेक जागी देशभर निवडणूक लढवत आहे. “सिंह” हे त्यांचे निवडणुकीचे चिन्ह आहे. डाव्या विचारांच्या तिसऱ्या आघाडीमधल्या अनेक पक्षांमध्ये हा पक्ष आजही आपले अस्तित्व शोधत आहे. सुभाषचन्द्र बोस यांचा वारसा टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.