एकेकाळी अभिनय येत नाही म्हणून नाटकातून काढलेला आज मराठीचा सुपरस्टार झाला..

मला आठवतंय, शाळेमध्ये असताना मित्रांसोबत ‘बालगंधर्व’ सिनेमा पाहायला गेलो होतो. मुळात त्या वयात सिनेमा पाहण्याबद्दल फार अप्रूप असायचं. कारण घरच्यांपासून लपवून क्लास बुडवून सिनेमा पाहायला जाण्यात एक वेगळं थ्रील होतं.

तर असेच एकदा आम्ही मित्र दादरच्या चित्रा टॉकीजला बालगंधर्व पाहायला गेलो. नटरंग नंतर रवी जाधव यांचा हा दुसरा सिनेमा. बालगंधर्व यांच्याविषयी फक्त ऐकुन माहीत होतं. पण जेव्हा सिनेमाचे प्रोमो टीव्ही वर वैगरे पाहायला मिळाले तेव्हा या सिनेमाविषयी एक कुतूहल निर्माण झालं.

त्यामुळे हा सिनेमा पाहायला हे ठरवलं होतं.

जेव्हा बालगंधर्व मित्रांसोबत पाहिला तेव्हा सिनेमा संपल्यावर भारावून गेलो होतो. मनात समाधान होतं. आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. याला एकमेव कारण म्हणजे सुबोध भावे.

सुबोधने नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचं आयुष्य सुंदर अभिनयामुळे समोर उभं केल्यामुळे नकळत मनात एक आदराची भावना निर्माण झाली. पण हा आदर बालगंधर्वांना होता की सुबोध भावेच्या अभिनयाला होता, हा प्रश्न अनेक वर्ष सतावत होता.

त्याचं उत्तर पुढे असं गवसलं,

बालगंधर्व हे महान होतेच पण सुबोधने ज्या पद्धतीने बालगंधर्वांचं व्यक्तिमत्व जिवंत उभं केलं, ते पाहून सुबोधच्या अभिनयाचा फॅन झालो. आज मराठी नाटक, टीव्ही आणि सिनेमा क्षेत्रात लीलया संचार करणाऱ्या सुबोध  भावेचा वाढदिवस. 

सुबोध ज्या क्षेत्रात वावरला तिथे त्याने स्वतःचा ठसा उमटवला.

सुबोध उत्तम कलाकार तर होताच. पण अभिनय करता करता सुबोध कथाकार झाला, दिग्दर्शक झाला. या गोष्टींमध्ये सुद्धा सुबोधने लक्षवेधी काम केले. आत्ता जरी सुबोध अभिनयात नवनवीन भूमिकांची आव्हानं समर्थपणे पेलत असला तरी एकवेळ अशी होती, की अभिनय येत नाही म्हणून सुबोधला नाटकातून काढून टाकलं होतं. 

खूपदा आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही. कधी आपण प्रवाहात फक्त वाहत जातो. सुबोधचं आयुष्य सुद्धा असंच काहीसं होतं.

शाळेमध्ये असताना त्याला नाटकाची, अभिनयाची इतकी आवड नव्हती. शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये भाग घेण्यात मात्र सुबोध उत्साही असायचा. याला कारण असं, गॅदरिंग मध्ये जी मुलं भाग घ्यायची त्यांना गॅदरिंगच्या तयारीसाठी लेक्चर बुडवण्याची मुभा असायची. लेक्चरला बसावं लागू नये म्हणून सुबोध गॅदरिंगमध्ये उत्साहात भाग घ्यायचा. 

शाळा झाल्यानंतर पुढे काय करायचं?

हा जसा आपल्या मनात प्रश्न असतो तसाच प्रश्न सुबोधच्या मनात सुद्धा आला. या प्रश्नाचं उत्तर असं. मित्र जिथे जातील तिथे मी जाईल. सुबोधच्या मित्रांनी सायन्स मध्ये ॲडमिशन घेतलं. आपल्याला सायन्स मध्ये खरंच रस आहे का? असा कोणताही विचार न करता सुबोधने मित्रांसोबत सायन्स मध्ये प्रवेश घेतला.

शेवटी व्हायचं तेच झालं. १२ वीचा बोर्डाचा पेपर. सुबोधला काहीही येत नव्हतं. सुबोध चक्क बेंचवर डोकं ठेवून झोपला. अर्धा तास झाल्यावर सुबोध पेपर देऊन मोकळा झाला. ही कृती केल्यामुळे आपण नापास होणार हे पक्क झालं. सुबोधचे मित्र सुद्धा असेच पेपर लवकर देऊन वर्गाबाहेर निघून आलेले. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत कोणतंही टेंशन न घेता त्या दिवशी सारसबागेतली भेळ खाऊन आनंद साजरा केला. 

घरी आल्यावर सुबोधने आईला विश्वासात घेऊन ही सर्व गोष्ट सांगितली. पुढे कॉमर्स मधून सुबोध १२ वी पास झाला आणि बी. कॉम करण्यासाठी पुण्याच्या सिम्बॉयसीस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले.

सहज म्हणून सुबोध कॉलेजच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये जॉईन झाला.

सध्या मराठीतल्या सुपरस्टार असलेल्या सुबोधला कॉलेजच्या दिवसांमध्ये अभिनयाची जाण नव्हती. किंबहुना अभिनय वाईट असल्याने सुबोधला नाटकातून खूप वेळा वगळण्यात आलं होतं. बी. कॉम च्या पहिल्या वर्षात असताना सुबोधला नाटकामध्ये केवळ तीन वाक्य होती.

ती वाक्य म्हटल्यावर सुबोध विंगेतून धावत नाटकाची प्रकाशयोजना सांभाळायचा. यानंतर मात्र दुसऱ्या वर्षी सुबोधला नाटकात चांगली भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे सुबोधला अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. हळूहळू नाटकातल्या माहोलमध्ये सुबोध रमू लागला. नाटक हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. केवळ नाटक करता येईल म्हणून बी. कॉम झाल्यानंतर सुबोधने एम. कॉम ला सुद्धा ॲडमिशन घेतले. 

अभिनेत्री मुक्ता बर्वे एका मुलाखतीत म्हणाली होती,

“त्यावेळी पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या वेळेस सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते या दोघांचा एक दबदबा होता. हे दोन कलाकार त्यावेळी एकांकिका स्पर्धा गाजवत होते.”

हे अगदी खरं आहे. कारण कॉलेजच्या जीवनात सातत्याने चांगली नाटकं करत असल्याने सुबोध भावे हे नाव सर्वांना परिचित होतं. याच काळात नाटकं करता करता सुबोधने मार्केटिंग पदावर नोकरी करण्यास सुरुवात केली.

९ ते ६ जॉब करून सुबोध ६ नंतर कॉलेजला जाऊन पुन्हा नाटकांच्या माहोलमध्ये हरवून जायचा. ऑफिसमध्ये असताना कधी एकदा ६ वाजत आहेत असं त्याला व्हायचं. ऑफिस झाल्यानंतर जेव्हा तो नाटकाच्या ग्रुपमध्ये यायचा तेव्हा मात्र त्याला वेळेचं भान नसायचं. 

अशातच एका सॉफ्टवेअर कंपनीत सुबोध नोकरी करू लागला.

परंतु नोकरीचे ८ तास आणि पुढे नाटकाच्या वर्तुळात बेभान असणं अशी दोन वेगळी आयुष्य सुबोध जगत होता. नोकरी की नाटक अशी सुबोधची द्विधा मनःस्थिती झाली होती. आपल्याला नक्की आयुष्यात काय करायचं आहे, हा प्रश्न सुबोधने स्वतःला विचारला. उत्तर मिळालं. सुबोधने सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जाऊन राजीनामा देऊन ती नोकरी सुध्दा सोडली.

“मला अभिनयात स्वतःला आजमावण्यासाठी दोन वर्ष द्या”,

असं सुबोधने कुटुंबीयांना सांगितलं. 

अभिनयात करियर करण्याचा निर्णय घेतल्यावर सुबोध सुरुवातीचे ६ महिने घरी बेकार बसून होता. दूरदर्शन वर असलेल्या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका सुबोधने केल्या. पण हवा तसा ब्रेक त्याला मिळत नव्हता. बॅक टू पॅवेलियन होण्याची वेळ येतेय की काय, अशी शंका वाटू लागली.

इतक्यात उपेंद्र लिमयेच्या सांगण्यावरून सुबोध एका मालिकेच्या ऑडिशनसाठी गेला. तिथे त्याची निवड झाली. सुबोधला मिळालेली पहिली मोठी मालिका म्हणजे आभाळमाया.

यानंतर मात्र सुबोधच्या कलाकृतींचा वटवृक्ष अजूनही बहरत आहे. 

माझ्या मते, सुबोध अभिनेता म्हणून किती ग्रेट आहे याची जाणीव सर्वांना बालगंधर्व पाहून झाली असावी. भूमिकेचे बारकावे डोळ्यांतून कसे प्रकट करावे, याचा वस्तुपाठ म्हणजे सुबोधने साकारलेले बालगंधर्व. ही भूमिका करताना सुबोधला खूप झगडा करावा लागला. बालगंधर्वांसारखं वागणं, बोलणं, वजन कमी करणं, चेहऱ्यावरील भाव, स्त्रियांसारख्या लकबी अशा अनेक गोष्टींसाठी सुबोधला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.

कधी कधी सुबोध फार हताश व्हायचा. पण जिद्द आणि मेहनतीने सुबोधने बालगंधर्व आपल्यासमोर जिवंत उभे केले. इतकी मोठी भूमिका साकारल्या नंतर काहीच वर्षांमध्ये सुबोध ‘लोकमान्य’ म्हणून समोर आला. तर एकदम कडक म्हणत सुबोधने अनोख्या स्टाईलने काशिनाथ घाणेकर रंगवले. आणि या सर्वांच्या मध्ये कट्यार काळजात घुसली सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा केलं. 

एरवी सिनेमात यशस्वी झालेला कलाकार पुन्हा टीव्ही कडे परतत नाही. पण एकाच वेळी करोडो लोकांच्या घराघरात पोहचवण्याऱ्या टीव्ही माध्यमाचं महत्त्व सुबोध जाणून आहे. म्हणून आजही सुबोध मालिका करताना दिसतो.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, तू काम करत राहा.. भूमिका कोणतीही असो, तुझा अभिनय पाहणं हा आनंददायी अनुभव असतो.. सध्याच्या पिढीत व्यवस्थेबद्दल मनात असेल ते बोलणारी तुझ्यासारखी फार कमी माणसं आहेत.. चौफेर स्वतःची छाप पाडणारं तुझं व्यक्तिमत्त्व आम्हाला प्रेरणा देतं.. नवनवीन भूमिकांनी तुझी कारकीर्द उजळत राहो.. हीच वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा.

  •  देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. VIGHNESH says

    PURUSHOTTAM KARANDAK CHA ETIHASS KAY AAHE BHIDU???

Leave A Reply

Your email address will not be published.