लोंढेंच्या पोरामुळे जपानमध्ये “मेड इन हिंगणगावची” हवा आहे. 

एप्रिल २००९ साली सांगली जिल्ह्यातल्या हिंगणगाव या छोट्याशा गावातून बारा हजार हातमोज्यांचा ट्रक जपानला निर्यात झाला. गावकऱ्यांनी या ट्रकची मिरवणूक काढली. माळरानावर कधी पावसाचा थेंब बघायला न मिळणाऱ्या माणसांना आपल्या गावातनं माल थेट जपानला जातो हे विशेष कौतुकाचं होतं अन् त्याहून अधिक कौतुकाचं काम म्हणजे हे सगळं लोंढ्याच्या पोरानं करुन दाखवलेलं. 

देवानंद लोंढे हे दलित कुटूंबातले. पण आपल्या कष्टावर या माणसाने दुष्काळी भागात पावसाचा ढग आणला. कवठे महांकाळ तालुक्यातलं हिंगणगाव हे संपुर्ण तालुक्याप्रमाणेच कायम दुष्काळी. पावसाचा एक थेंब इथे पडला तर नशीब. त्यामुळे बऱ्यापैकी माणसं एकतर सोन्याच्या दुकानदारीला नाहीतर मुंबईत पडेल ते काम करायला.  राहिलेली मोलमजूरी करून दिवस काढणारी.

हेच नकाशातसुद्धा न दिसणारं गाव म्हणजे देवानंद लोंढे यांच हिंगणगाव.

गावतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांच शिक्षण झालं. पुढे गावातल्याच नारायण तातोबा सगरे हायस्कुलमधून त्यांनी दहावीपर्यन्तच शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीच्या आय.सी.आय अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अॅण्ड रुरल इंजिनिरींगला प्रवेश मिळवला. इथे अभियांत्रिकीच शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढे काय हा प्रश्न होता.

शिक्षण पुर्ण करून देवानंद सांगलीतल्या एका सुतगिरणीत सुपरवायझरची नोकरी करु लागले. इतकं शिकून काय फायदा शेवटी गाढवं राखायचं कामच करायला लागलं. देवानंद सध्या काय करतो याची माहीती मिळाली की जो तो हाच म्हणत असे. आपण शिक्षण घेवून देखील नको ते काम करतोय याची जाणीव त्याला झाली. आपल्या शिक्षणाच्या जोरावर चांगल्या कंपनीत नोकरी करावी म्हणून तो पुण्या मुंबईला गेला आणि नाशिक येथील एका कंपनीत चांगल्या हुद्यावर काम करू लागला. 

शिक्षणाचा वापर करत चोख काम करण्याच्या स्वभावामुळे बघता बघता वेगवेगळ्या हुद्यांवर मोठमोठ्या कंपनीत देवानंद लोंढे काम करू लागले. २००१ साली ते काय करत होते तर गुजरातमध्ये भूकंप झाला होता तेव्हा देवानंद ऑक्सफॅम जीबी या आंतराष्ट्रीय संस्थेमार्फत भूकंपग्रस्त लोकांच्या पुर्नवसनासाठी झटत होते. युनिसेफ, ऑक्सफॅम, रिलीफ इंटरनॅशनल अशा मान्यवर संस्थांसाठी सल्लागार म्हणून ते काम करू लागले. एक दोन नाही तर तब्बल ८० देशांमध्ये काम करण्याचा अनुभव दरम्यानच्या काळात त्यांना मिळाला. 

गाव सोडलं की मोठ्ठं होतं याची जाणीव झाली होती पण त्याचसोबत आपल्या गावाला मोठ्ठ करायला हवं याची जाणीव देखील कुठेतरी होती. 

अफगाणीस्तानमध्ये काम करत असताना देवानंद लोंढे यांना गावी जावू काहीतरी वेगळं करून दाखवू अस वाटायचं आणि अचानक एकेदिवशी त्यांनी इतक्या चांगल्या नोकरीला लाथ मारून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला देखील. 

गावात आल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे काय करायचं..? 

त्यांना समजलं की गावातली सुतगिरण सध्या बंद पडलीय. संस्थेवर असणाऱ्या कर्जामुळे ती लिलावात काढण्यात आलीय. देवानंद यांनी ती बंद पडलेली सुतगिरण विकत घेण्याचा संकल्प केला. जप्त करण्यात आलेली ती सुतगिरण त्यांनी वीस लाख रुपयांना विकत घेतली. सुतगिरण विकत घेण्यासाठी सहकार्यांनी मदत केल्याचे ते सांगतात.

सुतगिरण विकत घेतली खरी पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे तिथं काय करायचं. 

धंद्यात अडाणी असणारा माणूसच असा विचार करू शकतो. कोणती गोष्ट करायची याची माहिती नाही आणि सुतगिरण विकत घेतली. पण तसं नव्हतं. जग फिरलेल्या माणसाला डॉलरमध्येच व्यवसाय करायचा होता. वेगवेगळ्या देशात काय खपतं हे त्याला चांगलच माहिती झालं होतं. फक्त प्रश्न होता तो इथे कोणत्या गोष्टी बनवता येतील तो. 

 अभ्यास केल्यानंतर देवानंद लोंढे यांच्या लक्षात आलं की आपण इथे हॅण्डग्लोज तयार करू शकतो.

चीन आणि जपान या देशात हॅन्डग्लोजना चांगली मागणी आहे. दोन्ही देशात स्वच्छतेचा निकष महत्वाचा मानला जातो. जपानसारख्या देशात तर आपले हात स्वच्छतेने धुतलेले आहेत भष्ट्राचाराने माखलेले नाहीत हे दाखवण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून राजकारणी लोक देखील हॅण्डग्लोज वापरतात. आपण गावातून हॅण्डग्लोजचे उत्पादन करून त्याचा पुरवठा जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये पुरवठा करू अशी ती आयडिया होती. 

आत्ता या आयडीयाला मुर्त स्वरुप देणं ही वाटती तितकी सोप्पी गोष्ट नव्हती. त्यासाठी प्रत्यक्ष चीन आणि जपानमध्ये जावून मार्केट समजावून घेणं ही मोठ्ठी गोष्ट होती. मार्केट समजून घेणं, आगावू आर्डर घेणे आणि इकडे हिंगणगावात तसा सेटअप उभा करणे अशा कित्येक अडचणी होत्या. त्यासाठी देवानंद यांनी चीन गाठलं. बरे वाईट अनुभव आल्यानंतर त्यांना एका कंपनीने हॅण्डग्लोज बनवण्याचे प्रशिक्षण दिले.

तिथे स्वत: शिकून तिथूनच एक मशीन विकत घेवून देवानंद हिंगणगावात परतले. 

आत्ता इथे सेटअप उभा करणं हा मोठ्ठा टास्क होता. त्यासाठी प्रशिक्षित महिलांची गरज होती. फक्त हॅण्डग्लोज कसे बनवतात हे फुकटात शिकायला मिळतय म्हणून जाण्यासारखं वातावरण नव्हतं. दिवसाचा रोजगार मारून कोण हा नवा उद्योग शिकायला जाणार. म्हणून देवानंद यांनी शिकण्यासाठी महिलांना प्रतीदिन शंभर रुपये देण्यास सुरवात केली. एकतर हॅण्डग्लोज कसं बनवायचं हे देखील शिकायला मिळतं आणि वरून शंभर रुपये पण मिळतात म्हणून महिला कामासाठी यायला लागल्या. 

५ मे २००८ रोजी प्रत्यक्ष हातमोजे अर्थात हॅण्डग्लोज बनवण्यास सुरवात करण्यात आली. कंपनीच नाव ठेवण्यात आलं पयोद. पयोद हा संस्कृत शब्द. याचा अर्थ पावसाच्या पाण्याने भरलेला काळा ढग. अगदी नावाप्रमाणे माळरानावर हि छोटेखानी कंपनी पाऊस पाडू लागली. 

एप्रिल २००९ रोजी पयोद इंडस्ट्रितून बारा हजार हातमोज्यांचा पहिला कंटेनर जपानच्या दिशेने रवाना झाला. मेड इन हिंगणगाव नावाचा ब्रॅण्ड जपानच्या वेशीवर पोहचणार होता. याचा आनंद गावकऱ्यांनी फटाके वाजवून मिरवणूक काढून साजरा केला. 

बघता बघता मागणी वाढू लागली आणि कंपनीने नाव कमावलं. एकामागून एक मशिन्स वाढवण्यात आल्या आणि हिंगणगावातल्या महिला आतंरराष्ट्रीय दर्जाचे हॅण्डग्लोज बनवू लागल्या. बघता बघता माळरानावर ही कंपनी रुजली. ती थेट जपान आणि चीनपर्यन्त घौडदौड करू लागली. स्थानिक महिलांना घरात बसूनच काम करता यावे म्हणून तशा प्रकारच्या कामांची तरतूद करण्यात आली. आज टाटा उद्योग समूहात देखील पयोद चेच हॅण्डग्लोज वापरले जातात. 

आज कोटीत उड्डाण घेतलेल्या देवानंद लोंढे यांचा सत्कार देशभरातल्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर नेहमीच होत असतो. 

हे ही वाच भिडू. 

3 Comments
  1. Kailas Narale says

    I want regularly same blog

  2. Omkar kumbhar says

    Hii
    This is omkar kumbhar, and i am a resident of hingangaon i would like to salute to his passion and also congratulate to the man who had grown his business to the international level
    Congratulations sir ????????????

  3. Shivam Londhe says

    ❣️

Leave A Reply

Your email address will not be published.