लॉकडाऊनच्या मंदीत संधी साधणारी कंपनी म्हणजे डन्झो

फार जुना नाय आत्ताआत्ताच घडलेला एक किस्सा आहे. आम्ही काही कार्यकर्त्यांनी रस्सा मंडळाचं आयोजन केलं होतं. म्हणजे कसं काही कार्यकर्ते घरातून तेल, मसाला आणि सगळं मटरेल घेऊन आले आणि ज्याचं घर सगळ्यात मोठ्ठय त्याच्या घरी रस्सा मंडळ झालं. आता इतका मजबूत रस्सा भुरकला की पोट गच्च झालं. मग कार्यकर्त्यांना हुक्की झाली पान खायची.

कुणाचं रामप्यारी, कुणाचं कलकत्ता साधा, कुणाचं १२०-३०० सगळ्यांनी ऑर्डरी सोडल्या, पण मेन मुद्दा होता की पानं आणायला जाणार कोण. मनात सगळ्यांच्या होतं पण रश्श्यामुळं बॉडी नाय म्हणत होती. मग आमच्यातला स्कॉलर म्हणला, ‘अरे आपण डन्झो करूयात का?’

आता आमच्यात एक नियम ए, स्कॉलर बोलला म्हणजे देव बोलला. एवढ्या रात्री घरबसल्या पानं आणून देणार म्हणजे डन्झो हा चांगलाच गंभीर विषय असणार. आता फक्त आमचा स्कॉलरच नाय, तर लय कार्यकर्ते हे डन्झो वापरतात. आपण जे वापरतोय ते काय आहे, याची माहिती पाहिजेच ना भिडू.

डन्झो काय आहे?

पान असो, साखर असो किंवा असो मटण, डन्झो तुम्ही सांगाल ते सामान सांगाल त्या दुकानातून तुमच्या घरी आणून देत असतंय. शहरातल्या शहरात तुमचं पार्सल पोहोचवण्याचं कामही डन्झो करतं. अर्थात पैशे घेऊन. सध्या बंगळुरू, नोएडा, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, आणि मुंबई अशा शहरांमध्ये डन्झो काम करतं.

डन्झो सुरू कसं झालं?

डन्झोची कल्पना आली कबीर बिस्वास या भिडूच्या सुपीक डोक्यातून. बंगळुरूला गेल्यावर त्यानं या संकल्पनेवर आधारित स्टार्टअप उभा करण्याचा निर्णय घेतला. त्याची बेसिक आयडिया होती की, एक टू-डू लिस्ट बनवायची जी आपलं काम स्वतःच पूर्ण करेल. आपल्या ड्युप्लेक्स फ्लॅटलाच कंपनीचं हेडक्वार्टर बनवत त्यानं आपल्या मित्रांनाही कामाची आयडिया दिली. या भिडूंनी कंपनीची सुरुवात केली, ते व्हॉट्सॲप ग्रुपवर. ज्यात ते डिलिव्हरी सर्व्हिसबाबत व्यवस्थित मेसेज पाठवायचे आणि डिलिव्हरीचं कामही पूर्ण करायचे. बिस्वासनं स्वतः टू-व्हीलरवर फिरत ग्राहकांच्या ऑर्डर घेण्याचं आणि पूर्ण करण्याचं काम केलं.

आपल्याला कामात मदत करण्यासाठी, त्यानं काही जणांना भरती केलं, तर एका एनजीओमधून काही जणांना पार्टटाईम कामावर घेतलं. त्यानंतर, २०१५ मध्ये डन्झोच्या या टीमनं दररोज जवळपास ७० ऑर्डर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या. साहजिकच डन्झोची लोकप्रियता वाढली. पुढच्याच वर्षी म्हणजेच, २०१६ मध्‍ये मागणी वाढल्‍यानं व्हॉट्सॲपवर सुरू झालेल्या या स्टार्टअपनं स्वतःचं अ‍ॅप सुरू केलं.

डन्झो उभं करण्यामागचे भिडू कोण आहेत?

मुंबईत शिकलेला आणि एअरटेलमध्ये तीन वर्ष काम करणारा कबीर बिस्वास कंपनीचा मुख्य संस्थापक आहे. अंकुर अगरवाल, मुकुंद झा हे आधी गुगलला काम करणारे कार्यकर्ते, आधी आयबीएमला काम करणारा दलविर सूरी यांनी ही कंपनी सुरू केली.

डन्झो आणि लॉकडाऊनचं कसं कनेक्शन लागलं?

देशात कोविडचं थैमान सुरू असताना कडकडीत लॉकडाऊन लागलं. लोकांना बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली. काही कालावधीनंतर घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या ॲप्सना परवानगी देण्यात आली. तेव्हाच डन्झोचे स्टार प्लसमध्ये आले. लोकं घराबाहेर पडायला घाबरत होती आणि दुकानदार आपल्याकडच्या वस्तू विकण्यासाठी आतुर होते. डन्झोनं हाच पूल बांधला. सामान घरपोच येतंय म्हणल्यावर कोरोनाचं टेन्शन निम्म्यानं कमी झालं. त्यामुळं लोकं दणादण ऑर्डर्स देऊ लागले आणि डन्झोवाले त्या ऑर्डर्स कमीतकमी वेळात घरपोच आणून देऊ लागले.

डन्झोचा संस्थापक कबीर बिस्वास सांगतो, २०२० या वर्षात आमचा वार्षिक व्यवहार जवळपास दुप्पट झाला. आता डन्झोनं आपली सेवा आणखी भारी करण्यासाठी स्टोअर्स उभारायला सुरुवात केलीये. सोबतच डिलिव्हरीला लागणारा वेळ सरासरी २० मिनिटांवर आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. थोडक्यात डन्झो आणखी फॉर्ममध्ये यायची शक्यता आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपवर सुरू झालेली ही आयडिया मेहनतीच्या जोरावर फॉर्ममध्ये आलीये. त्यामुळं एक गोष्ट सिद्ध झाली की, मेहनतीला पर्याय नाही भिडू!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.