कधीकाळी बॉलिंग शूज नसणारा हा काश्मिरी भिडू भारताचा नेक्स्ट बुमराह होऊ शकतोय…

गल्ली क्रिकेटमध्ये जितकं महत्त्व लांब लांब छकडे मारणाऱ्या बॅटर्सना असतं, तितकंच महत्त्व जोरात बॉलिंग टाकणाऱ्या बॉलर्सलाही. सिक्स मारता आला की बॉलचा काय विषय नसतोय, पण कुठल्या कार्यकर्त्याला बॉल खेळता आला नाही, की लगेच बॉलरला सांगण्यात येतं…पेस कंट्रोल! या पेस कंट्रोलच्या रुलमुळं पेस बॉलर व्हायचं लय जणांचं स्वप्न हुकलंय, हे पण इतकंच खरं.

पण काश्मीरमधल्या एका भिडूचं नशीब याच पेस बॉलिंगमुळं उजळलं. जिथं जगातले दिग्गज बॅटर्स आणि बॉलर्स आपली गुणवत्ता दाखवायला आतुर असतात, ती आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच खेळताना त्यांनं मजबूत हवा केली आणि ही हवा होण्यामागचं कारण होतं, स्पीड.

या भिडूचं नाव उम्रान मलिक!

जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन. तिथलं वातावरण जितकं सुंदर आहे, तितकंच धुमसतंही. दहशतवाद, बेरोजगारी, सुरक्षा आणि कडक नियम अशा विविध कारणामुळं काश्मीरमधल्या बहुतांश तरुणाईची स्वप्न पूर्ण झालेली नाहीत. चुकीच्या मार्गाला लागलेली तरुण पोरं हातात दगड घेतात आणि स्वप्नांचा पाठलाग न सोडणारी पोरं क्रिकेटचा बॉल किंवा बॅट.

जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचं लई येड आहे. तिथं टेनिस बॉलवर होणाऱ्या मॅचेस पार रात्री उशिरापर्यंत चालतात. यातूनच अनेक हिरे पुढं येतात. या हिऱ्यांमधलं एक सुपरहिट नाव म्हणजे उम्रान मलिक.

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उम्रान मलिकला आयपीएलमध्ये तशी अपघातानंच संधी मिळाली. त्याची निवड झालेली नेट बॉलर म्हणून. हैदराबादचा हुकमी एक्का आणि यॉर्कर किंग टी. नटराजनला कोविडची लागण झाली आणि उम्रानची टीममध्ये एंट्री झाली. आता नवा पोरगा आहे, काय माहीत कशी बॉलिंग टाकणार, बहुतेक त्याला हाणतील असा अनेकांचा अंदाज होता.

त्यात आयपीएलमधल्या पहिल्याच बॉलवर त्यानं बाऊंड्री खाल्ली. लोकांना वाटलं भावाचा विषय गंडतोय. पुढचा बॉल टाकला १४१.५ किलोमीटर प्रति तास स्पीडनं आणि त्याच्या पुढचा बॉल आला १५०.०६ किलोमीटर प्रति तास स्पीडनं. कुठल्याही भारतीय बॉलरनं आयपीएलमध्ये टाकलेला तो सगळ्यात फास्टेस्ट बॉल होता. होता म्हणण्यामागचं कारण म्हणजे, त्यापेक्षा जोरात बॉलही उम्राननंच टाकलाय. तोही १५२.९५ किलोमीटर प्रति तास वेगानं.

उम्राननं भले स्पर्धेत दोनच विकेट्स घेतल्या, पण तरी त्याचं नाव चांगलंच गाजलं याचं कारण म्हणजे त्याचा जबरदस्त स्पीड. सातत्यानं १४० किलोमीटर प्रति तास वेगानं बॉलिंग टाकणाऱ्या उम्रानला संयुक्त अरब अमिरातीमध्येच झालेल्या टी२० वर्ल्डकपसाठी नेट बॉलर म्हणून स्थान देण्यात आलं. भारताचा कॅप्टन विराट कोहली, पेस बॉलर जसप्रीत बुमराह यांचं मार्गदर्शन घेतानाचे उम्रानचे फोटोज चांगलेच हिट झाले.

ही झाली उम्रानची सक्सेस स्टोरी. पण त्याआधी त्यानं केलेला स्ट्रगल सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

इम्रान मूळचा जम्मूमधल्या गुज्जरनगरमधला. आई, वडील आणि दोन बहिणींसोबत वाढलेल्या उम्रानचं क्रिकेटवर लहानपणापासून प्रेम. जवळच्याच तवी ग्राऊंडवर रात्री उशिरापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या उम्रानची पेस बॉलिंग पाहुन अनेकांनी त्याला प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. पण उम्रान काय हा सल्ला मनावर घ्यायचा नाही. तो कधी स्टेडियमवर जायचा तर कधी नाही.

त्याची बॉलिंग पाहून त्याला जम्मू काश्मीरच्या अंडर-१९ कॅम्पच्या सिलेक्शनसाठी बोलावणं आलं. तेव्हा तो कुठल्याच क्लबकडून खेळलेला नव्हता, त्यामुळं त्याच्याकडं फार कुणाचं लक्ष नव्हतं. तरीही भिडू नेटमध्ये बॉलिंग करायला गेला. तेव्हा सिलेक्टर्स म्हणले, ‘अरे तुझे बॉलिंग शूज कुठंयत?’ तेव्हा उम्रानच्या लक्षात आलं की, बॉलिंगसाठी वेगळे शूज लागतात. त्यानं नेटमध्येच एका कार्यकर्त्याशी मैत्री केली आणि त्याच्याकडून तात्पुरते शूज घेतले.

उम्राननं बॉलिंग केली आणि त्याचा स्पीड बघून सगळेच हँग झाले. सिलेक्टर्सनं त्याला थेट सांगितलं की तुझी टीममधली जागा फिक्स झालीये. मग अंडर-१९, अंडर-२३ असे टप्पे पार करत उम्रान जम्मू-काश्मीरच्या मुख्य संघातूनही खेळला. आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून त्याची निवड झाली आणि तो आयपीएल खेळूनही गेला.

कधीकाळी बॉलिंग शूज नसणाऱ्या उम्राननं टी२० वर्ल्डकपमध्ये नेट बॉलर म्हणूनही भूमिका निभावली. जसप्रीत बुमराहला आदर्श मानणारा उम्रान त्याच्यासारखीच भेदक बॉलिंग करायला उत्सुक आहे. विशेष म्हणजे साऊथ आफ्रिका टूरवर जाणाऱ्या इंडिया ए संघातही त्याची निवड झालीये. थोडक्यात धुमसत्या काश्मीरमधल्या पोराचं इंडिया जर्सी घालण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.