निम्मी दुनिया चिकणे दिसा म्हणत होती, तेव्हा पुरुषांच्या दाढ्यांना खत ‘बिअर्डो’ मुळं मिळालं…

नवरा आधीच गुळगुळीत असलेल्या चेहऱ्यावर फेस लाऊन ब्लेड मारतोय, बायको साडी घ्यायचं विधेयक मुक्यानंच मंजूर करुन घेतीये.

किंवा

जिंदगीत कधीच दाढी न वाढवलेला क्रिकेटर कव्हर ड्राईव्ह मारावा, तेवढ्या अलगद गालावरुन ब्लेड फिरवतोय.

दोन्ही जाहिराती बघून आपण कन्फ्युज, कारण यांच्या गालावर मोजून १० केस नसतील, तरी हे दाढी करतायत. म्हणजे पोरींना बिनादाढीची पोरं आवडत असतील काय? प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी किमान ८-९ वेळा गालावर वस्तरा फिरला होता.

मग जसजसं दुनिया कळत गेली, तसं समजलं की, भावा दाढी तर पाहिजेच. मग वाढवायला घेतली, तर आपण डायरेक्ट आदिवासी दिसायला लागलो होतो, ना दाढीला आकार, ना उकार.

हा प्रॉब्लेम झालेले काय आम्ही एकटेच नव्हतो, दाढी कशी ठेवली की ती भारी दिसेल हे सांगणाऱ्या जाहिरातीच कधी आल्या नव्हत्या. चेहऱ्याला चार क्रीम लाऊनही रंग बदलत नसला, तरी दाढी नीट राहायला कायतर लावलं पाहिजे असं मनोमन वाटायचं.

मग मार्केटमध्ये आली एक कंपनी, जिनं काय केलं तर नुसतं दाढी कसं वाढवायची हेच नाही, तर दाढीची काळजी कशी घ्यायची, काय लावायचं आणि काय नाही.. इथपासून अगदी सगळं काही सांगितलं.

पोरांना दाढ्या वाढवायला आणि जपायला प्रोत्साहन देणाऱ्या या कंपनीचं नाव ‘बिअर्डो.’

आशुतोष वलानी आणि प्रियांक शहा अहमदाबादमधली दोन पोरं. कॉलेजच्या दिवसापासून दोघं एकत्र.  २००८-०९ मध्ये आशुतोष परदेशी शिक्षण घेऊन परत आलेला आणि तेव्हाच प्रियांकचं एमबीएचं शेवटचं वर्ष सुरू होतं. शिक्षण झालं आणि आता बिझनेसच्या आयडीयानं उचल खाल्ली.

ते दिवस ऑनलाईन खरेदीचे होते. ऑनलाईन एखादी गोष्ट मागवता येते आणि ती चांगली असते याच्यावर लोकांचा हळूहळू विश्वास बसत होता. हेच डोक्यात ठेऊन त्यांनी एक वेबसाईट सुरु केली

‘aajkiitem.com’

या वेबसाईटवर दिवसाला एकाच कुठल्यातरी भन्नाट प्रॉडक्टची विक्री व्हायची आणि लोकं खरेदीही करायची.

नेमकं पुढं अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारखी मोठी नावं या बिझनेसमध्ये उतरली आणि कित्येक धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपला बिझनेस आटोपता घेतला. पण ही दोन पोरं टिकून राहिली त्यांनी आपल्या बिझनेसचा पॅटर्न बदलला आणि अमेझॉन, फ्लिपकार्टवरुन प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली.

पण यात काय मजा नव्हती, त्यामुळं त्यांनी मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजलं, की पुरुषांच्या दाढीसाठी, त्यांनी पुरुषी दिसावं यासाठी कुणी कामच करत नाहीये. यांच्यात आपण उतरलो, तर इथले गणेश गायतोंडे होऊ शकतोय हे त्यांना समजलं आणि बिअर्ड ऑईल, बिअर्ड वॉश हे दोन प्रॉडक्ट घेऊन कंपनी २०१५ मध्ये मार्केटमध्ये आली

जिचं नाव बिअर्डो.

पुढच्या दोन वर्षांत कंपनीनं खतरनाक मोठी मजल मारली. यामागं स्ट्रगलही होताच. त्यांनी वर्षभरात दाढीच्या थोडं वर जात, चेहरा आणि केसांसाठी प्रॉडक्ट्सही आणले. पण तरीही कंपनीची आर्थिक बाजू सांभाळायला मोठा बूस्टर मिळत नव्हता. अशावेळी त्यांना एक भिडू भेटला, असा भिडू जो त्यांच्यासाठी ब्रँड अँबॅसिडर होता, मेंटॉर होता आणि इन्व्हेस्टरही. 

हा भिडू कोण? तर आपला सुनीलअण्णा शेट्टी.

अण्णा जाहिरातीत दिसू लागल्यावर बिअर्डोचा खप वाढला, पुढं व्हेंचर कॅटॅलिस्ट नावाच्या कंपनीकडून बिअर्डोनं ५ मिलियन डॉलर्स रेझ केले. हे सगळं घडलं, २०१६ मध्ये. पण २०१७ मध्ये पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंटचं टेन्शन होतंच. अशावेळी ‘मॅरिको’ या जायंट कंपनीनं बिअर्डोमध्ये ४५ टक्के स्टेक्स घेतले आता कंपनी सुसाट सुटली.

त्यांनी एक गोष्ट ओळखली होती, फक्त दाढीची काळजी घ्यायला सांगून थांबायचं नाय. हळूहळू त्यांनी परफ्यूम्स, साबण, तेल, क्रीम असं प्रत्येक प्रॉडक्ट आणलं. पुढं मास्क, टीशर्ट, जॅकेटही मार्केटमध्ये आणत बिअर्डोनं मोठमोठ्या ब्रँड्सला सुट्टी दिली नाही.

सुरुवातीला बिअर्डोचं मार्केट फक्त ऑनलाईन होतं, ऑफलाईन मार्केटमध्ये उतरण्यासाठी त्यांनी मोठे मॉल्स, दुकानं यांना टार्गेट न करता सलून्सला टार्गेट करायला सुरुवात केली. 

ज्यावेळेस बिअर्डो मार्केटमध्ये पाय पसरवायला बघत होतं, त्याचवेळेस जगात दाढी वाढवण्याचा ट्रेंड आला होता, ज्याचा फायदा बिअर्डोला झाला. त्यांनी आधी संयुक्त अरब अमिराती आणि मग अमेरिकेत आपले प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात केली.

बिअर्डो सक्सेसफुल होण्यामागं आणखी एक कारण होतं, त्यांनी आपले कस्टमर बिल्ड केले. म्हणजे आता ज्याला दाढी येतच नसेल, तो कशाला बिअर्डोचे प्रॉडक्ट्स घेईल?

म्हणून त्यांनी संशोधन करुन दाढी यायला मदत करतील असे प्रॉडक्ट्स आणले. बिअर्ड ग्रोईंग ऑइल आलं, बिअर्ड ऍक्टिव्हेटर आणलं… या स्कीममधनं त्यांचे आणखी ग्राहक तयार झाले आणि बिअर्डो, त्यांचे शेअरहोल्डर पैशे मोजू लागले.

२०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा विचार केला, तर बिअर्डोनं ६३.८४ कोटींचा ऑपरेंटींग रेव्हेन्यू मिळवलाय. यंदाच्या वर्षात त्यांचं टार्गेट आहे १०० कोटींपेक्षा जास्त बिझनेस करायचं.

एक साधं गणित आहे, जोवर पोरांच्या दाढ्या वाढतायत, तोवर यांना बिझनेस करायला स्कोप आहे. जोवर पोरांना आपण छान दिसावं वाटतंय तोवर यांना बिझनेस करायला स्कोप आहे. 

अमेझॉन, फ्लिपकार्टच्या रेट्यातही यांनी कच खाल्ली नाही आणि आता यश, हृतिकसारखे ब्रँड अँबॅसिडर घेऊन, ग्राहकांचा आणि पैशाचा मोठा आकडा घेऊन, बिअर्डो मार्केटमध्ये तेल लाऊन उभीये.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.