सॅमसंग वगैरेंना मागे टाकून एक चायनीज मोबाईल कंपनी भारतात टॉपला गेली
सगळ्या आळीत मिळून एक फोन, पीसीओचे लाल डब्बे, इनकमिंगला पडणारे पैशे, मग बटणांचे मोबाईल आणि मग टचस्क्रीन स्मार्टफोन. सामान्य माणसांच्या आयुष्यात मोबाईल या यंत्राचा प्रवास बऱ्यापैकी असाच झालाय. आता सध्याच्या जमान्यात कुणी बटणाचा मोबाईल वापरताना दिसलं, की वय-बिय न बघता डायरेक्ट काका किंवा काकू आवाज दिला जातो.
थोडक्यात काय तर स्मार्टफोन हा आता एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे. आयफोन, सॅमसंगचे फ्लॅगशिप फोन काय सगळ्यांना परवडतीलच असं नाही. त्यात भारतात मध्यमवर्गीय मार्केटपण लय मोठं. त्यामुळं लोकांना परवडेबल फोन काढणं ही काळाची गरज ठरली.
लय कंपन्यांनी ट्राय केलं, पण सगळ्या नव्या-जुन्यांना टक्कर देत एकच ब्रँड मार्केटमध्ये टिकून राहिला तो म्हणजे- शाओमी
भारतात स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत टॉपला पोहोचलेल्या शाओमीचा प्रवास नक्की कसा झाला हे जाणून घेऊ-
शाओमीची स्थापना केली लेई जून या चिनी व्यवसायिकानं. जूननं २०१० मध्ये सॉफ्टवेअर कंपनी म्हणून शाओमीची स्थापना केली आणि गुगल अँड्रॉईडवर चालू शकेल अशी ‘MIUI’ नावाची ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. पुढच्याच वर्षी शाओमीचा पहिला मोबाईल, ‘Mi-1’ मार्केटमध्ये आला.
आता आणखी दोन प्रश्न पडतात. पहिला प्रश्न म्हणजे शाओमी ‘Mi’ हे नाव का वापरतं? त्यांच्या लोगोतही हीच दोन अक्षरं का आहेत? याबाबत वेगवेगळ्या थेअऱ्या असल्या, तरी शाओमीच्या मते या अक्षरांचा अर्थ ‘मिशन इम्पॉसिबल’ असा आहे. कंपनीनं आतापर्यंत पार केलेल्या अडथळ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा लोगो डिजाईन करण्यात आला आहे.
आता दुसरा प्रश्न शाओमी हे नाव कसं पडलं- याबाबतही वेगवेगळ्या थेअऱ्या आहेत. पण लेई जून सांगतो की, ‘शाओ’ या बुद्दिष्ट तत्वज्ञानाशी हे निगडीत आहे. हे तत्वज्ञान आपल्याला सांगतं की, तांदळाचा एक कण पर्वताएवढा असतो. हे तत्वज्ञान कंपनीची सहनशक्ती दाखवतं.
सध्याच्या मार्केटकडे पाहिलं तर भारतात शाओमी सगळ्यात जास्त मोबाईल विकणारा ब्रँड आहे. सॅमसंग, नोकिया, ॲपल, वनप्लस असे तगडे कार्यकर्ते मार्केटमध्ये असूनही शाओमीचा पहिला नंबर कसा काय आला असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.
सुरुवातीला शाओमीच्या फोनची बऱ्यापैकी विक्री होत होती. नेमका बॉयकॉट चायना ट्रेंड आला आणि लोकांनी शाओमीच्या फोनकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. मात्र कंपनीनं हा फोन चायनात नाही तर भारतात बनतो हे दाखवून दिलं आणि परत मुसंडी मारली. सध्या कंपनीच्या भारतात ७ फॅक्टरीज आहेत. आणखी दोन फॅक्टरीज सुरु करण्याचं त्यांचं नियोजन आहे. आपले ९९ टक्के मोबाईल भारतातच बनतात असं कंपनीचं म्हणणं आहे.
शाओमीच्या यशामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची स्टोअर्स. ऑनलाईन खरेदीचं मार्केट कितीही वाढलं असलं, तरी आजही अनेकजण दुकानातून फोन घेणंच पसंद करतात. शाओमीनं हेच हेरत देशात एकाचवेळी पाचशे ‘एमआय स्टोअर्स’ सुरू केली. त्यामुळं त्यांच्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
शाओमीचे फोन ऑनलाईन विकत घेणं ही सुद्धा तारेवरची कसरत असते. यामागचं कारण म्हणजे प्रचंड मागणी आणि ‘ब्लेझ डील्स’ची पद्धत. कंपनी ठराविक वेळेत ठराविक मोबाईल विक्रीची घोषणा करते आणि काही वेळातच फोन विकला जातो. अवघ्या २५ सेकंदांमध्ये ५० हजार मोबाईल विक्रीचा विक्रमही कंपनीनं केला आहे. त्यामुळं मार्केटमध्ये फोन हिट असल्याचं चित्र तयार होतं आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
सोबतच किंमत हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट ठरला आहे. जास्तीत जास्त चांगलं मटेरियल वापरूनही परवडेल अशा किंमतीत फोन उपलब्ध होत असल्यानं लोकांची शाओमीला पसंती मिळते. लॉकडाऊन दरम्यान आलेल्या मंदीत कंपनीला झळ सोसावी लागली, मात्र नव्या ऑफर आणत त्यांनी तग धरलाच.
सध्या मोबाईलसोबतच स्मार्टवॉच, टीव्ही, प्युरिफायर, लॅपटॉप, कॅमेरे असे अनेक प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या या कंपनीच्या मागची प्रेरणा एका तांदळाच्या कणाची आहे, हे विसरून चालणार नाही.
हे ही वाच भिडू:
- सगळ्या जगातले मोबाईल महाग होत चाललेत यामागं चीन आणि तैवानमधली भांडणं आहेत
- चार मोबाईल, एक कंपनी, एक मालक. याला म्हणतात बिझनेस !
- १०० कोटी कमवणारा फुटबॉलपटू फुटका मोबाईल का वापरतो याला पण एक कारण आहे.