एकापेक्षा जास्त धंद्यात गंडलेल्या माणसाने नापतोल नावाचा गंडवण्याचा धंदा सुरू केला

लोकांना गंडवण्याचा धंदा कोणता ? तर नापतोल !

नापतोल ऐकून प्रत्येकाच्याच ‘आपण कसे गंडलो’ याच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. सगळ्या ऑनलाइन साईट्स एकेकाळचा बाप म्हणजे नापतोल.कॉम. २००८ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने लोकांवर जाहिरातींचा असा काही भडिमार केला होता की आता टिव्हीत दिसतंय तसं आपल्या घरात येणार असं म्हणत म्हणत लोक पुरती फसली.

या लोकांनी जाहिरात दाखवायला टीव्ही चॅनेल सुरू केला. हे टीव्ही चॅनेल बघून आमच्या आज्या आया आणि त्याचसोबत आम्ही सुद्धा फसलो. दाखवायचं एक आणि द्यायचं दुसरं अशी सिस्टीम होती नापतोलची. थोडक्यात हलक्या प्रतीचा माल तुमच्या पदरी पडायचा. आता पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणत पुन्हा ऑनलाइन शॉपिंग करायची नाही असं मनोमन ठरवलं.

आमच्या आयुष्यात किराणा दुकानदाराने सुद्धा जास्त पैसे घेऊन हलका माल द्यायचं धाडस केलं नव्हतं. पण हे धाडस नापतोलच्या माध्यमातून केलेलं मनु अग्रवालनं.

मनु अग्रवाल आयआयटी कानपूरच्या १९९२ च्या बॅचचा विद्यार्थी. पुढं इंजिनिअरिंगच्या रीतीरिवाजानुसार आपलं मास्टर्स करायला हे पोरगं अमेरिकेच्या मिनीसोटा प्रांतात गेलं आणि तिकडचंच झालं. सिलिकॉन व्हॅलीत सलग चार वर्षे १० ते ५ असं काम करून हे पोरगं वैतागल. आणि १९९८ मध्ये भारतात परतलं.

आता एवढं भारी काम करणार पोरगं हातचं जाऊ नये म्हणून कंपनीने याच्यावर तोडगा काढला. कंपनीनेच याला पोवाईत ऑफिस काढून दिलं. आता फक्त ऑफिसच काम न करता बाकीची पण काम करूया म्हणून मनूने एक स्टार्टअप सुरू केलं. Design Expo Network Pvt Ltd नावाचं. तब्बल ५० लाख रुपये यात गुंतवले. ही कंपनी काय करायची ? तर वेबसाईट डिजाईन करणं आणि इमेल अप्लिकेशन तयार करणं.

मनूची ही कंपनी म्हणजे भारतातल नवं जग होत. म्हणजे भारतात त्यावेळी अजून World Wide Web यायचंच होत आणि इकडं मनु लोकांना वेबसाईट डिझाइन करून देत होता. ज्या काळात आपल्या भारतात खोक्या सारखा कम्प्युटर वापरात होता तिकडं हा मनु लॅपटॉप घेऊन आपले क्लायंट गाळाला लावत होता. त्यानं आपल्या या आयडिया Indiatimes.com आणि Mailmetoday.com यांना विकल्या.

त्याचा हा बिजनेस service-oriented होता. त्याला आता B2C या धंद्यात उतरायचं होत. B2C म्हणजे थेट ग्राहकांपर्यंत. यासाठी मनूने आपला IIT कानपूरचा मित्र अमर सिन्हा याला गाठलं. या दोघांनी १९९९ मध्ये Criclive.com आणि Shubhyatra.com हे पोर्टल सुरू केलं.

एक वर्ष तरी या दोन्ही धंद्यातून मनूला आणि अमरला काहीच मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी हे दोन्ही पोर्टल विकायचा निर्णय घेतला. २००० साली त्यांनी थॉमस कुकला Shubhyatra.com तर मोदी एंटरटेनमेंटला Criclive.com पोर्टल्स विकले. आणि २००१ ला Design Expo कॅनेडियन पेमेंट सिस्टीम SLMsoft ला विकलं.

त्यानंतर एवढं डूबल्यावर सुद्धा मनुचा अंगातला किडा काही शांत बसेना. म्हणून २००३ मध्ये त्याने तब्बल १ करोड घालून ANMsoft technologies उभं केलं. ही कंपनी सेल्स आणि बिजनेस अनालिटिक्स वर काम करायची.

हातात अजून काहीतरी पाहिजे म्हणून याने २००८ मध्ये सुरू केलं नापतोल.

एकापेक्षा जास्त धंद्यात गंडलेल्या माणसाने नापतोल नावाचा गंडवण्याचा धंदा सुरू केला. २००८ मध्ये भारतात नुकतंच इंटरनेट सुरू झालेल. हा इंटरनेट फिव्हर पिकवर असताना त्याचा फायदा करून घेता येईल या हिशोबाने मनूने ही नापतोल नावाची कंपनी सुरू केली होती.

या धंद्यात पार्टनर म्हणून मनूने हरी त्रिवेदी, युसूफ खान यांना सोबत घेतलं. पहिल्या वर्षात तर कंपनीचा काहीच फायदा झाला नाही. पण नंतर अचानक धंद्यात बरकत होऊ लागली. याच श्रेय होत नापतोलच्या आकर्षक जाहिरातींना. २०११ मध्ये नापतोल चा दिवसाचा धंदा होता १.५ करोड. दिवसाला यांच्या वेबसाईटवर ९० हजार व्हिजिटर असायचे. दिवसाला ५ हजार ट्रांजॅक्शन व्हायचे.

आता पैसा पाण्यासारखा सुरुय म्हंटल्यावर मनूच्या डोक्यात लोकांना फुल टाइम जाहिरात दाखवायचा विचार आला. मग यातूनच २०१० मध्ये नापतोलचं टीव्ही चॅनेल आलं. लोक जाहिरातीला भुलून खरेदी करायला लागले. पण लोकांना खराब प्रोडक्ट दिल्यामुळे नापतोल बदनाम होऊ लागलं. पेपरमध्ये लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. लोक नापतोलच्या विरोधात ग्राहक मंचात जाऊ लागले. आणि नापतोलची क्रेझ हळूहळू कमी होऊ लागली.

पुढे लोकांच्या हातात स्मार्टफोन आले आणि अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटस पण. त्यामुळे या वेबसाईटच्या गर्दीत नापतोल कुठं हरवलं कळलंच नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.