पोरांनो रडगाणं बंद करा, कोरोनात या भिडूने कसा डाव साधलाय ते बघा जरा… 

दिवाळीच्या सकाळीच मित्राचं पप्पा भेटले, म्हणले दोस्ताला जरा सांग. पुण्यात गेलेलं. एफडी मोडून हॉटेल काढून दिलं. तर कोरोनाचं कारण सांगून आठ महिने घरात बसलय. दिवसभर नुसत मोबाईलमध्ये असतय. आरं इतकं सहन केलं तर हा कोरोना काय जिझय.

लोकं म्हणतेत म्हाताऱ्यांनी घरात बसा आणि तरुणांनी बाहेर पडा, पण आमच्या पोरानं जे घर धरलय ते काय बाहेर पडायचं नाव घिना झालय… 

आमचा दोस्त पण तसाच. अजूनही दहावीत कमी मार्क का पडले याचं उत्तर तो पोट दुखत होतं म्हणून देत असतो. मागच्या वर्षी तेच्या पप्पानं पुण्यात हॉटेल सुरू करुन दिलेलं. चांगल वर्ष-दोन वर्ष सहन करुन धंदा उभारता येईल म्हणून भांडवल उभारलं.

वर्षभर झालं आणि कोरोना आला. गड्यानं महिनाभर कळ काढली आणि पादऱ्याला पावट्याचं झालं आणि हॉटेलमध्ये होतं नव्हतं ते सगळं विकून सोडून तो घरला आला, आत्ता गडी काय परत जायचं नाव घेत नाही.. 

म्हणलं हा प्रोब्लेमच लय जणांचा झालाय, म्हणून तुम्हाला आमच्या दूसऱ्या दोस्ताची स्टोरी सांगावी.

स्टोरी तशी साधीच आहे पण दमदार आहे.. 

तर आमचा हा दोस्त वेल्ह्याचा. पुण्या जिल्ह्यातलाच तालुका. पण लहानपणापासून हा मामाकडं शिकायला पुण्यात. शिवाजीनगरला शाळा झाली आणि कॉमर्ससाठी हा मॉडर्न कॉलेजमध्ये आला. याचे मामा बॅंकेत कामाला. घरची तशी परिस्थिती मध्यमवर्गीयचं.. 

स्वप्नील दिलीप भोसले अस त्याचं नाव. 

तर झालं काय की, स्वप्नील अभ्यासात तसा बराच होता. पण नोकरी करायची नाही हे पहिल्यापासून फिक्स होतं. आत्ता नोकरी करायची नाही तर शिकतो कशाला असा मुद्दा मात्र त्याच्या मनात आला नाही. कॉमर्स मधून चांगल पोस्ट ग्रॅज्यूएशन केलं. त्यानंतर नोकरीचा अनुभव असावा म्हणून काही दिवस नोकरी देखील केली. 

त्यानंतर गडी सिविल लाईनचे कॉन्ट्रक्ट घ्यायला लागला. आत्ता हे करता करता एक समांतर जग चालू होतं. आयुष्यात काय करायचं आहे हे ते जग. स्वप्नील शिकायला पुण्याच्या मॉडर्न कॉलेजला.

ज्यांना पुण्याचा भुगोल माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, BMCC कॉलेज असे दोन चार कॉलेज डेक्कन परिसरात येतात. सर्व परिसर तसा एकमेकात मिसळलेला. इथ FC रोडवर दिवसभर फिरणारी तरुणाई दिसते. 

आत्ता स्वप्नीलला पण हेच दिसलं पाहीजे, म्हणजे पोरगं कॉलेजला आहे. पोरगीला घेवून कॉफीशॉप शोधलं पाहीजे अस जग असताना याला धंदा दिसायचा.

म्हणजे इथे किती गर्दी आहे, एखादं कॉफीशॉप, आईस्क्रिम पार्लर काढलं तर किती चाललं हे गणित डोक्यात चालायचं. 

त्यासाठी त्यानं चौकशी केली, पण FC रोड, JM रोड म्हणजे पुण्याचं पक्क मार्केट. इथं सहजासहजी जागा भेटणं म्हणजे टक्कल पडलेल्या माणसाला ऐश्वर्या मिळण्यातला प्रकार असतो. तरिही गडी दिवसभर फिरायचा. जागांची चौकशी करायचा. चुकून एखादा गाळा मोकळा भेटला तर भाडं ऐकून कपाळात जायच्या असा तो प्रकार… 

पण गड्याच्या डोक्यात पक्क भिनलेलं, भांडवलसाठी पैसे कमावयचे आणि एकदिवस JM रोडवर स्वत:च आईस्क्रिम शॉप काढायचं… 

पुढे गड्यानं नोकरी केली, नंतर कॉन्ट्रक्ट घेवू लागला. इथे तुमच्या डोक्यात कॉन्ट्रक्ट म्हणजे लय मालामाल माणूस असेल अशी कल्पना असेल तर डोक्यातून काढून टाका. सगळेच तसे नसतात वो. तर स्वप्नील गेल्या अडीच तीन वर्षांपासून कॉन्ट्रक्ट घेवू लागला. दूसरीकडे नक्की दूकानं कोणतं काढायचं हा विचार चालू होता. 

म्हणजे, कॉफी शॉप किंवा आईस्क्रिम पार्लर हा विषय डोक्यात होता.

एकदा हडपसरला गेल्यानंतर सावळाहरी आयस्क्रीमच्या दुकानात घुसला. पहिल्याचं दणक्यात आईस्क्रिम आवडलं आणि हाच ब्रॅण्ड म्हणून फिक्स केलं. पण प्रश्न होता धंद्याचा. चौकशी केली तेव्हा अनिकेत गायकवाड यांचा नंबर मिळाला.

कोण कुठला मुलगा आईस्क्रिम खायला येतो आणि फ्रन्चायझीची चौकशी करतो. सटरफटर म्हणून असे नंबर टाळले पण जातात. पण इथं आयस्क्रिमच्या चेनचा मालकच दूसऱ्या मिनटाला स्वप्नीलला भेटायला आला. 

बिझनेस आयड्या दिली, मागे उभा राहण्याचा शब्द दिला सगळं ठरलं आणि कोरोना आला…. 

जे पहात होतो ते डोळ्यासमोर बुडतय की काय अस वाटू लागलं. आत्ता आपल्या स्वप्नीलपुढे दोन ऑप्शन होते. एकतर डोक्यावर हात मारून पादऱ्याला पावट्याचा निमित्त म्हणून जगणं नायतर लाथ मारून पाणी काढणं… 

दोन महिने स्वप्नीलने आईस्क्रिमचा रिसर्च केला. धंद्याचं गणित मांडलं. दूसरीकडे सगळं बंद पडू लागलं. धंदा न झेपणारे स्पर्धेतून बाहेर पडले. ज्या दिवशी लॉकडाऊन शिथील केलं त्या दिवशी स्वप्नील गाडी काढून थेट FC रोड आणि JM रोडची चक्कर मारून आला. 

यावेळीचं जग मात्र त्याच्यासाठी वेगळं होतं.  जिथं हजारो पोरं पोरी घोळक्यानं उभी असायची तिथं काळ कुत्र देखील नव्हतं. सगळं कस सामसुम. पण एकमागोमाग एक चान्स होते. लय माणसांनी दुकानं सोडली, हॉटेल सोडले.. 

बऱ्याच ठिकाणी ऑन लिज चे बोर्ड लटकत होते. विचार करा तीन वर्ष पाहीजे अशी जागा जिथे मिळत नव्हती तिथे आज एकामोगामागं एक रिकाम्या जागांचे ऑप्शन तयार झालेले. 

स्वप्नीलने लागलीच एक फोन घुमवला. गाळा मालकाने फोन उचलला. ठरल्याप्रमाणे झटक्यात सौदा झाला. का? तर या गाळ्याच्या शेजारीच कोव्हिड सेंटर उभा झालेलं. तिथला गाळा कोण घेत नव्हतं. पण आधीपेक्षा खूप कमी किमतीने गाळा मिळत होता. शिवाय जोपर्यन्त सगळं काही सुरळीत होत नाही तोपर्यन्त निम्म भाडं देण्याची परवानगी होती. 

स्वप्नीलने विचार केला हे बघा कोव्हिड तर कायमचा नाही, एकदा सगळं परत पहिल्यासारखं झालं तर परत आपणाला हा गाळा हे लोकेशन तर काय मिळत नसतं. डाव साधला आणि गाळा फिक्स केला. नाही म्हणलं तरी आत्ता आईस्क्रिमच्या धंद्यात उतरून मार्चपर्यन्त मार्केटिंग करायचं ठरवण्यात आलं. 

सावळाहरीच्या मालकांना भेटला, लागलीच डिल फायनल केली. माल भरला आणि ज्या दिवशी दुकानांना पुर्णवेळ परवानगी देण्यात आली त्याच दिवशी गड्यानं दुकानाचं उद्धाटन ठेवलं. आत्ता त्याचं कित्येक दिवसाचं स्वप्न पुर्ण झालय.

संकटात संधी पहायची असली वाक्ये आपल्या शाळेत भिंतीवर लिहलेली असायची. पण ती प्रत्यक्षात आणणारी स्वप्नीलसारखी खूप कमी माणसं असतात. 

आई, बाबा आणि जिवाभावाच्या मित्राप्रमाणे असणारे त्याचे मामा यांच्याबरोबरच झटकन विश्वास टाकणाऱ्या सावळाहरीच्या टिमच स्वप्नील कौतुक करतो. पण आजूबाजूला दूकान सोडून जात असताना स्वप्नील ज्या पद्धतीने कोरोना काय आयुष्यभरासाठी नाय वो हे सांगतो तेव्हा त्याचं कौतुक करतो.

लवकरात लवकर आपल्या गड्यांना हे कळो आणि निमित्त सागंण्यापेक्षा पोरं लढोत हिच आमची इच्छा.. 

तुम्हीही असा नवा व्यवसाय सुरू करणार असलात तर तुम्हाला देखील शुभेच्छा. सावळाहरी संबधित चौकशी करणार असाल तर खालील वेबसाईटवर तुम्ही चौकशी करू शकता.

अनिकेत गायकवाड : 99235 07979

वेबसाईट लिंक : http://www.savlahari.com/

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.