प्रचाराला पैसे नव्हते, लोकांनी बदाम वाटून सुदामकाकांना निवडून आणलं..

अंगात सामान्यांना देखील लाजवेल असा अंगरखा, वैदर्भी थाटाचे धोतर, अंगरख्याच्या आत घातलेल्या बंडी मध्ये लागेल तेव्हडे खुळखुळते पैसे अशा थाटातला माणूस मुंबईच्या आमदार निवासातल्या खोलीत पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून कसल्या तरी नोंदी काढत आहे हे दृश्य त्याकाळी देखील अनेकांना चकित करायचं.

आमदारकी आणि खासदारकी जिंकलेल्या या माणसाकडे स्वतःच घर देखील नव्हतं हे सांगितलं तर किती जणांना पटेल?

पण असा एक कर्मयोगी महाराष्ट्रात होऊन गेला, कॉम्रेड सुदाम देशमुख असं त्यांचं नाव.

आज बच्चू कडू ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या अचलपूरचं आणि सुदाम देशमुख यांचं कृष्ण सुदाम्याचं नातं होतं. अगदी कमी वयात ते कष्टकऱ्यांच्या लढ्याशी जोडले गेले आणि डाव्या चळवळीकडे ओढले गेले. कम्युनिस्ट पक्षाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते सुदाम देशमुख यांनी.

समाजकार्यातून फुरसत नाही म्हणून त्यांनी लग्न देखील केलं नाही, ते विधानसभेत जेव्हा पाच वष्रे आमदार होते. तेव्हा विरोधी बाकावरून सगळयात जास्त प्रश्न विचारणारा आमदार म्हणून त्यांचाच उल्लेख होई

कार्यकर्त्यांसाठी ते सुदाम काका होते. कोणताही प्रश्न घेऊन जाणाऱ्यांसाठी त्यांची दारे सताड उघडी असायची. फाटक्या चपलेने फिरणारे सुदामकाका म्हणजे गरिबांचा आवाज होते. म्हणूनच कि काय सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, धनदांडगे नेते सोडून अचलपूरचे जनता सुदाम काकांच्या पाठीशी राहायची.

त्यांच्या १९८९ सालच्या लोकसभा निवडणूकीचे किस्से आजही सांगितले जातात.

त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उषाताई चौधरी उभ्या होत्या. अमरावती मतदारसंघातून उषाताई सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. काँग्रेसच सरकार केंद्रापासून राज्य पर्यंत सगळीकडे होते. प्रत्येक गोष्टीचं पाठबळ त्यांच्या सोबत होतं.

मात्र जनता सुदाम देशमुखांच्या सोबत होती. लोकांनीच सुदाम देशमुखांच्या वतीने ही निवडणूक लढवली. देशमुखांच्या कडे प्रचारासाठी गाडी देखील नव्हते. कार्यकर्त्यानीच गाडी कुठून तरी आणली. पेट्रोलपंप वालेच त्यात पेट्रोल टाकायचे.  

‘आपलाच गेरू नि आपलाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा’, हि घोषणा कार्यकत्यांनी फेमस केली होती.

स्कुटरवर बसून सुदाम काका प्रचाराला निघाले आहेत हे दृश्य आजही अमरावतीच्या जुन्याजाणत्यांना आठवत असेल. काही दुकानदार सुद्धा सुदाम देशमुखांच्या प्रचाराला उतरले. ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला बदाम वाटायचे आणि घोषणा द्यायचे,  

‘खाओ बदाम, लाओ सुदाम’.

पोत्यावारी बदाम वाटून लोकांनी सुदामकाकांना लोकसभेत निवडून दिले. 

जेष्ठ पत्रकार मधुकर भावेंनी त्यांच्या आठवणींचा एक किस्सा सांगितला आहे. ते नागपूरच्या लोकमतमध्ये संपादक होते. सुदाम देशमुखांशी त्यांची जुनी ओळख होती. देशमुखांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या निष्ठेबद्दल आणि त्यागाबद्दल अमरावतीतर्फे एक मानपत्र देऊन सत्कार करावा अशी कल्पना पुढे आली.

त्यावेळी अमरावतीच्या खासदार प्रतिभाताई पाटील या होत्या. रा. सु. गवई. माजी खासदार होते. मधुकर भावेंनी या दोघांची भेट घेऊन एक छोटी समिती स्थापन केली आणि सुदामकाकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला.

या काळात सुदामकाका अत्यवस्थ होते. उठू शकत नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांना मानपत्र द्यावे, असे ठरले. या कार्यक्रमाला कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते आणि सुदाम देशमुख यांचे शिष्य बर्धन यांना दिल्लीहून बर्धनना बोलवण्यात आलं.

खूप मोठा कार्यक्रम झाला. सुदामकाकांच्या गैरहजेरीत त्यांचे मानपत्र स्वीकरणाऱ्या बर्धन यांच्या डोळयांत पाणी तरारले. सुदाम देशमुखांच्यावर प्रेम करणारी हजारो माणसे या सभेला हजर होती. प्रत्येकाची अवस्था याहूनही निराळी नव्हती.

सभा झाल्यावर प्रतिभाताई, गवईसाहेब, बर्धन आणि मधुकर भावे हे चौघे सुदाम देशमुखांच्या घरी गेले. एका साध्याशा कॉटवर सुदामकाकांना ठेवण्यात आलं होतं. या साऱ्यांना आलेलं पाहून त्यांनी उठायचा प्रयत्न केला पण त्यांना जमलं नाही. त्यांना तसेच झोपायला सांगून मानपत्र त्यांच्या शेजारी ठेवले. त्यांच्या घशात नळी घातली होती. बोलता येत नव्हते. जवळ पाटी-पेन्सील होती. त्यांना जे काही वाटे, ते ते पाटीवर लिहून देत.

तिथे आलेल्या सगळयांकडे कृतज्ञतापूर्वक नजरेने पाहत त्यांनी मधुकर भावेंना खूण केली पाटी-पेन्सील दे.

भावेंना वाटलं की त्यांना काय त्रास होतो आहे हे बहुधा ते लिहून देतील. त्यांनी ती पाटी-पेन्सील उचलली आणि सुदामकाकांच्या हातात दिली. देशमुखांनी अर्धवट बसल्यासारखे करून पाटी-पेन्सील हातात घेतली. काय लिहिले असेल त्यावर?

सुदामकाकांनी लिहिले होते..

‘मेळघाटातल्या कुपोषणावर ‘लोकमत’मध्ये जोरदारपणे लिहीत राहा..’ 

पाटी भावेंच्या हातात दिली.

मधुकर भावे सुदाम देशमुखांकडे पाहत राहिले. मृत्यू कोणत्याही क्षणाला येईल, अशी त्यांची अवस्था होती. पण त्यांच्या मनात विचार होता. मेळघाटातल्या कुपोषणाचा. प्रतिभाताई, गवई आणि बर्धन हेही सुदामकाकांची ती अवस्था पाहून गदगद झाले. एक लढवय्या माणूस शरपंजरी पडला होता. पण त्याच्या मनात समाजाचाच विचार होता.

दुस-या दिवशी सुदाम देशमुख गेले. त्यांच्या मृत्यू वेळी गावेच्या गवे ओस पडली. घरचा माणूस गेल्यावर रडावे तशी रडली. त्यात खोटेपणा नव्हता. मेळघाटचे जंगल तुडवत हातात कटोरा घेऊन गावोगावी फिरणारा हा नेता विदर्भाच्या मातीत दंतकथा म्हणून उरला.

संदर्भ- नागपूरचे बर्धन अमरावतीचे सुदामकाका -मधुकर भावे 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.