आणि सुधा मूर्ती नारायण मूर्तींना म्हणाल्या,”मी पुण्याची आहे… तुम्हाला उधारी फेडावीच लागेल”

मराठीत एक म्हण आहे. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’. ही म्हण ऐकली की या म्हणीसाठी चपखल बसणारी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात. पण ही म्हण बनलीच एका उदहरणासाठी आहे असं वाटावं, असंही एक नाव आपल्याला परिचित आहे. ते नाव म्हणजे ‘सुधा मूर्ती’

इन्फोसिसच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समाजसेविका, प्रभावी लेखिका आणि महत्वाचं म्हणजे हाडाच्या शिक्षिका असलेल्या सुधा मूर्ती म्हणजे सगळ्यांसाठीच एक प्रेरणास्थान आहेत.

साधेपणात किती ताकद असू शकते हे आपल्याला सुधा मूर्ती यांनी दाखवून दिलय, जाणवून दिलय. 

आता सुधा ताईंना आपल्याला ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात ‘कर्मवीर विशेष’ या विशेष सेगमेन्टमध्ये, १८ जून रोजी पहायला मिळणार आहे. सुधा ताईंसारखं इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि कोण होणार करोडपती सारखा मोठा मंच..म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणारे.

सुधा मूर्ती यांच्याकडे पाहिल्यावर, आपल्याला म्हणजेच खास करून मराठी माणसाला त्यांचा हा साधेपणा टिपिकल मराठमोळाही वाटतो..! 

आपल्या घरातली आई, आजी, काकू, मावशी एखादी कॉटनची, फिकट रंगाची, साधीशीच साडी नेसते, केसांची वेणी किंवा आंबोडा घालते, डोळ्याला साध्या फ्रेमचा चश्मा लावते, गळ्यात छोटसं मंगळसूत्र घालते, आणि कपाळाला मध्यम आकाराची टिकली लावते. पण हे असंच साधं राहणीमान फक्त आपल्या घरातल्या आई आजी आणि मावशीचं नाही तर सुधा ताईंचं सुद्धा आहे.

आणि फक्त राहणीमानच नाही तर सुधा ताईंचा स्वभावही अगदी मराठमोळा आहे. त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांचं उत्तर कर्नाटकातलं आयुष्य. तिथे राहणाऱ्या लोकांचं एक एडवांटेज असं, की त्यांची भाषा कन्नड असते पण, कल्चर, संस्कार, सणवार आणि रिती सगळं काही महाराष्ट्रियन पद्धतीचं असतं.

आणि सुधा मूर्ती या उत्तर कर्नाटकच्या असल्यामुळे त्यांची पहिली भाषा मराठी जरी नसली तरी त्यांचं राहणीमान मात्र महाराष्ट्रियन लोकांसारखं आणि अगदी मराठमोळं आहे. आणि याचंच दूसरं कारण म्हणजे सुधा ताईंचं पुणे शहराशी जोडलं गेलेलं नातं. सुधा ताईंचं पुणंप्रेम सर्वमान्य आणि जगजाहीर आहे. 

सुधा मूर्ती म्हणजे मूळच्या सुधा कुलकर्णी. सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० साली कर्नाटकातल्या शेगांव या गावी झाला. त्यांचं सगळं बालपण गेलं महाराष्ट्रातल्या कुरूंदवाड इथे. आणि सुधा ताईंचं तिसरी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं होतं, त्यामुळे त्यांच्यावर बालवयातले सगळे संस्कार मराठीतच झाले होते.

सुधा ताईंच्या घरात शिक्षणाला पहिल्यापासूनच खूप महत्व होतं.

त्यांच्या आई म्हणजे विमला कुलकर्णी या शाळेत शिक्षिका होत्या तर वडील आर. एच कुलकर्णी हे डॉक्टर आणि प्रोफेसर होते. घरातंच शिक्षणाचं वाढीव महत्व असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाला सुधा ताईंनी वेगवेगळं काहीतरी करावं असं वाटत होतं. 

वडील स्वतः डॉक्टर होते त्यामुळे त्यांना आपल्या मुलीने सुद्धा डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. आईला आपल्या मुलीने गणित विषयात मास्टरी कामवावी असं वाटत होतं, आजोबांना वाटत होतं आपल्या नातीने इतिहासात पी. एच. डी. करावी, पण या सगळ्यात सुधा मूर्तींना अप्लाइड सायन्स घेऊन इंजिनियरिंग करायचं होतं.

आताच्या काळात पोरींनी इंजिनियरिंग केलं तर काही वाटत नाही पण पूर्वीच्या काळात हे फील्ड पोरींसाठी नव्हतं. त्यामुळे घरचे लेकीचं लग्न कसं व्हायचं या टेंशनमध्ये आले. पण सुधा ताईंनी मनाशी पक्क केलेलं की त्यांना इंजिनियरिंगच करायचं आहे. 

कॉलेजचे दिवस

सुधा मूर्तींनी इंजिनियरिंगचं प्राथमिक शिक्षण घेतलं हुबळीच्या KLE Technological University मधून. विशेष म्हणजे तिथे इंजिनियरिंग करणाऱ्या सुधा मूर्ती या एकमेव महिला होत्या.

त्यांच्यासोबत शिकणाऱ्या पोरांना सुद्धा या गोष्टीचं विशेष अप्रूप वाटायचं. सुधा ताई सांगतात, त्या दरम्यानच्या काळात त्यांना खूप प्रेम पत्र यायची. 

तिथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९७४ साली Indian Institute of Science मधून आपलं मास्टर्स पूर्ण केलं आणि जॉब करण्यासाठी त्या पुण्यात आल्या.

पुण्यात सुरू झालेली लव्ह स्टोरी

सुधा मूर्ती यांचं पुण्यावर विशेष प्रेम असण्याची दोन विशेष कारणं आहेत. एक म्हणजे टेलको कंपनीतली नोकरी आणि त्यांचं नारायण मूर्ती यांच्यासोबत जमलेलं लग्न. 

जे आर डी टाटांना एक क्रांतिकारी पत्र लिहून सुधा ताईंनी टेलको कंपनीत मिळवलेल्या पहिल्या जॉबची गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. टेलको कंपनीत त्या जॉइन झाल्या तेव्हा त्यांचा पगार होता अवघा १५०० रुपये. पण या नोकरीने त्यांना आयुष्यात खूप काही दिलं असं त्या नेहमी सांगतात. 

सुधा ताई जेव्हा पुण्यात जॉब करत होत्या तेव्हा नारायण मूर्ती सुद्धा पुण्यातच राहायचे. नारायण मूर्ती आणि त्यांचा मित्र प्रसन्न, हे दोघेही पुण्याच्या मॉडेल कॉलनीत राहत होते. आणि सुधा ताई नारायण मूर्ती यांच्या मित्राला म्हणजेच प्रसन्नला ओळखत होत्या. एकदा त्या प्रसन्न यांच्याकडे काही कामानिमित्त गेल्या असताना त्यावेळी नारायण मूर्ती पॅरिसहून आले होते.

नारायण मूर्ती यांना ते जिथे जातील, जिथे फिरतील तिथून पुस्तकं आणायची सवय होती. सवयीप्रमाणे त्यांनी पॅरिसहून सुद्धा एक पुस्तक आणलं होतं. आणि ते पुस्तक प्रसन्नच्या हातात असलेलं सुधा मूर्तींनी पाहिलं.

त्यावर लिहिलं होतं नारायण मूर्ती पॅरिस, दुसरे दिवशी अजून एक पुस्तक पाहिलं त्यावर लिहिलेलं नारायण मूर्ती इस्तंबूल.

सुधा ताईंना आश्चर्य वाटलं.. त्यांनी कुतुहलाने प्रसन्न यांना विचारलं की हे मूर्ती कोणी इंटरनॅशनल बस कंडक्टर आहेत का? यावर प्रसन्न हसले.. आणि त्यांनी म्हटलं की “नाही, नारायण जिथे कुठे फिरतो तिथून पुस्तक घेऊन येतो’. 

सुधा ताईंना या गोष्टीचं अप्रूप वाटलं, याच दरम्यान त्या नारायण मूर्ती यांना भेटल्या, आणि त्यांच्यात मैत्री झाली. पुढे बराच काळ दोघेही पुण्यात होते. तेव्हा त्यांचं एकत्र पुणे फिरणं व्हायचं. सुधा ताई सांगतात, त्यांनी वर्षाच्या ३६५ दिवस पुण्यात नाटकं आणि सिनेमे पाहिले. 

अजून एक किस्सा सांगताना सुधा ताई म्हणतात, की त्याकाळी त्यांचा पगार नारायण मूर्ती यांच्याहून जास्त होता. आणि जेव्हा केव्हा ते दोघं पुण्यात बाहेर फिरायचे, खायचे, प्यायचे तेव्हा नारायण मूर्ती यांच्याकडे खर्च करायला पैसे नसायचे, ते सुधा ताईंकडे उधारी मागायचे.

आणि सुधा ताई त्यांना म्हणायच्या, “मी कुलकर्णी आहे. त्यामुळे हिशोबाला पक्की आहे, तुम्हाला उधारी फेडावीच लागेल”.

त्या पुढे असंही म्हणतात की त्यांनी ती उधारी तर कधी फेडली नाही पण इन्फोसिस या संस्थेमुळे मुळे आणि इंडायरेक्टली नारायण मूर्ती यांच्यामुळे आज सुधा ताई कोट्यावधी रुपयांच्या मालकीण आहेत, आणि इतकी मोठी संस्था चालवत आहेत.

इन्फोसिसची सुरवातही पहिल्यांदा पुण्यातूनच झाली होती, कारण त्यावेळी मूर्ती दाम्पत्य पुण्यातच रहात होतं. सुधा ताईंना तर पुणं सोडण्याची इच्छाही नव्हती पण शेवटी त्यांचा पहिला क्लायंट त्यांना बंगलोरला मिळाल्याने नंतर मूर्ती दाम्पत्य बंगलोरला शिफ्ट झालं.

एका मुलाखतीत सुधा ताईंनी एक किस्सा सांगितला होता. त्यांच्याघरी कोणीतरी जेवायला आलं होतं. तेव्हा सुधा ताईंनी त्यांना विचारलं की तुम्ही किती पोळ्या खाता? यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हा असा प्रश्न विचारायचं कारण त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा सुधा ताई म्हणल्या,

“एकतर मी पुण्याची आहे, आणि दूसरं म्हणजे अन्न उरलं तर ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि फ्रीजमधलं अन्न खाणं तब्येतीसाठी चांगलं नसतं, म्हणून मी अन्न वाया जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, लोकांना ते वागणं उद्धट वाटतं तो भाग वेगळा”.

त्यांनी सांगितलेल्या या गंमतीवरुन तर त्या पक्क्या पुणेकर आहेत यावर शिक्काच मोर्तब होतो.

सुधा ताई पुण्याबद्दल बोलताना नेहमी भरभरून बोलत असतात. पुण्याची लोकं उर्मट वाटत असली तरी तो त्यांचा प्रामाणिक पणा असतो असं त्या म्हणतात. शिवाय पुणेकर मंडळी ओपन असतात, खरं बोलतात, प्रेम करतात, आणि महत्वाचं म्हणजे विद्या प्रेमी असतात म्हणून सुधा ताईंचं पुणे शहरावर विशेष प्रेम असल्याचं त्या सांगतात.

आणि फक्त सुधा ताईंचच नाही तर पुण्याचं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं सुद्धा या महाराष्ट्र कन्येवर तितकंच प्रेम आहे हे नक्की. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.