केवळ घरासाठी सुधा मूर्तींनी इन्फोसिसचं डायरेक्टर पद स्वीकारलं नाही
सुधा मूर्तींची पुस्तकं वाचून थोडंफार शहाणपण आलं. अर्थात त्यांची मुळ इंग्रजी पुस्तकं कळण्याइतकं इंग्रजी चांगलं नव्हतं. त्यामुळे लीना सोहोनी यांनी केलेली त्यांची बरीचशी अनुवादीत पुस्तकं वाचनातं आली.
सभोवताली वावरत असणाऱ्या प्रत्येक माणसाची स्वतःची एक स्टोरी असते. त्यांची सुद्धा काही दुःख, काही आनंद असतील. हेच शोधण्याच्या वृत्तीमुळे सुधा मूर्ती यांनी या माणसांच्या कथा लिहिल्या. वाढत्या वयात कळत नकळत बरंच काही शिकवून जाणाऱ्या लेखिकेच्या रुपात सुधा मूर्ती भेटल्या.
पण त्या पलीकडे एक कर्तबगार सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुधा मूर्ती यांचं असामान्य कर्तृत्व आहे.
सुधा मूर्ती यांचं मराठी भाषेशी एक अनोखं नातं असल्याने त्यांच्याविषयी कायम एक आपुलकी वाटत आली आहे. त्यांनी कधी आईच्या तर कधी आजीच्या नात्याने सहजसोप्या गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत. सुधा मूर्तींचा चेहरा सदैव हसतमुख असा.
मात्र तरुणपणी सुधा मूर्ती प्रचंड बंडखोर होत्या. आपल्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मोजक्या मुलींपैकी त्या एक होत्या. जेव्हा कॉलेजमध्ये टाटा कंपनी कॅम्पस मुलाखती साठी आली व मुलींनी अर्ज करू नये असं लिहिलं तेव्हा त्यांनी या अन्यायाविरुद्ध थेट जे.आर.डी टाटांना पत्र लिहिलं होतं.
पुढे त्यांना टाटांच्या टेल्को मिळाली. ती आव्हानात्मक नोकरी त्यांनी मेहनतीने सांभाळली.
टाटांना प्रश्न विचारणाऱ्या अशा सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात एक पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी सुधा मूर्तींनी घेतलेला निर्णय त्यांच्याविषयी असलेला आदर द्विगुणित करतो.
महिलांचं आयुष्य हे लग्नानंतर आमुलाग्र बदलतं. शिक्षण आणि करियरच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या स्त्रियांना लग्नानंतर काही तडजोडी कराव्या लागतात. नाही म्हटलं तरी घराकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. अशा वेळेस महिलांची होणारी मानसिक अवस्था ही त्यांची त्यांना ठाऊक.
खूपदा समाजाने आखून दिलेल्या याच चौकटीमुळे प्रगतीपथावर असलेल्या करिअरला काही प्रमाणात ब्रेक लागतो. सुधा मूर्तींना अशाच एका गोष्टीला तोंड द्यावे लागले.
लग्नानंतर नवऱ्याच्या इन्फोसिस कंपनीच्या स्थापनेवेळी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. इन्फोसिस सुरु झाली तेच सुधा मूर्तीनी आपले दागिने विकून दिलेल्या पैशातुन. त्यांनी सुद्धा इन्फोसिसच्या कामात हिरीरीने पुढाकार घेतला. अगदी सुरवातीला कंपनीच्या कोडिंग करण्यापासून ते रिसेप्शनचे फोन उचलण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या.
त्यामुळे इन्फोसिसचा विस्तार करण्यास सुधा मूर्तींचं महत्वपूर्ण योगदान आहे.
१९८३ – ८४ साली इन्फोसिस जेव्हा पब्लिक लिमिटेड झाली, तेव्हा डायरेक्टर कोणी व्हावं, हा मोठा प्रश्न उभा राहिला.
इन्फोसिसचे एक संस्थापक नंदन नीलकेणी यांनी सुधा मूर्तींना डायरेक्टर होण्यासाठी सुचवले. तसेच काही लोकांना नारायण मूर्तींनी डायरेक्टर व्हावं, असं वाटत होतं. अशावेळेस नारायणा मुर्तींनी स्वतःची बाजू ठामपणे मांडली.
नारायण मूर्ती म्हणाले,
“एक तर मी तरी डायरेक्टर होईल किंवा माझी बायको तरी डायरेक्टर राहीन.”
कुटुंब आणि काम या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवून नारायण मूर्तींनी मत मांडलं होतं. यावेळेस सुधा मूर्तींनी पतीच्या निर्णयाचा आदर केला आणि डायरेक्टर पद स्वीकारलं नाही.
सुधा मूर्तींनी ही इतकी मोठी तडजोड केवळ आपल्या कुटुंबासाठी केली होती. अनेकांना सुद्धा मूर्तींचा हा निर्णय पटला नव्हता. परंतु निर्णयापासून अजिबात न डगमगता योग्य विचारपूर्वक सुधा मूर्तींनी हा निर्णय घेतला होता.
सुधा मूर्तींना त्यावेळी दोन लहान मुलं होती. डायरेक्टर होणं म्हणजे कधी भारतभर , तर कधी परदेशात जाणं भाग होतं. अशावेळी डायरेक्टर होऊन लहान मुलांना कोणालातरी सांभाळायला देणं, त्यांच्या मनाला पटत नव्हतं. मुलांवर संस्कार करणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं ही आई म्हणून नैतिक जबाबदारी आहे, अशी सुधा मूर्तींची भावना होती.
त्यामुळे इतकी वर्ष करियरचं जे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांमध्ये जपलं होतं, ते त्यांनी बाजूला सारलं. मुलांच्या वाढत्या वयात एक आई म्हणून त्यांच्यासोबत असणं त्यावेळी त्यांना डायरेक्टर पदापेक्षा खूप गरजेचं वाटलं. त्यामुळे इन्फोसिस च्या उन्नतीसाठी संपूर्ण वेळ कामात लक्ष असणारा डायरेक्टर असणं आवश्यक होतं.
म्हणून सुधा मूर्तींच्या मते नारायण मूर्तींची डायरेक्टर पदासाठी निवड योग्य होती.
खूपदा प्रगतीच्या दृष्टीने जोमाने वाटचाल करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कुटुंब की करियर असा पर्याय येतो. अशावेळी जो पर्याय स्त्रिया निवडतात, त्यावर पुढचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. सुधा मूर्ती यांनी जरी कुटुंबाला प्राधान्य दिलं असलं तरी या निर्णयाचा त्यांना पश्र्चाताप झाला नाही. करिअरची गाडी रुळावरून घसरली म्हणून त्यांनी दु:ख केलं नाही. जो पर्याय निवडला तो विचारपूर्वक निवडला. आणि त्यामध्ये संपूर्ण आनंद मानला.
पुढे कंपनी जेव्हा प्रगतीच्या शिखरावर पोहचली तेव्हा सुद्धा मूर्तीना इन्फोसिस फाऊंडेशनच्या कामासाठी परत बोलवण्यात आलं. त्या अंतर्गत ग्रामीण विकास, अनाथालय, शैक्षणिक कामांना मदत अशा अनेक गोष्टी सुधा मूर्तींनी केल्या. आजही मुळात केवळ ऑफिसमध्ये न बसता तळागाळातल्या लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम सुधा मूर्ती करतात.
जेव्हा सुधा मूर्तींना विचारलं गेलं, तुम्ही करीयरच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या आजच्या मुलींना काय सांगाल? तेव्हा सुधा मूर्तींनी अगदी दिलखुलास उत्तर दिलं. त्या म्हणाल्या,”मी कोणाला काही सांगत नाही… तुमचे तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतात.”
हे ही वाच भिडू
- पार्ले-जी पुड्यावरचा फोटो सुधा मूर्तींचा आहे ही गोष्ट शुद्ध थाप आहे. खरं काय ते वाचा.
- नारायण मूर्तींनी पुण्यात स्थापन केलेलं इन्फोसिस बेंगलोरला का नेलं??
- इन्फोसिस स्थापन करताना टाटांनी सांगितलेलं ते वाक्य आजही मूर्ती विसरू शकत नाहीत.