पुरात गाव वाहून गेलं होतं आणि मुख्यमंत्री झाडाखाली उभं राहून चौकशी करत होते

महापूर, भूकंप, चक्रीवादळ अशा अस्मानी संकटात राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी कसोटी असते. मोडून पडलेल्या जनतेला धीर देखील द्यायचा असतो शिवाय मदत आणि पुनर्वसन योग्य पद्धतीने होत आहे का यावर देखील लक्ष ठेवायचं असत. मात्र यातही अनेकदा वादग्रस्त प्रसंग उभे राहतात.

गोष्ट आहे १९९१ सालची. विदर्भातले जेष्ठ नेते सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते.

नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सिमेजवळ मोवाड नावाच एक गाव आहे. तीन बाजूनी नद्यांनी वेढलेले हे गाव एकेकाळी संपन्न म्हणून ओळखल जायचं. नागपूर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका इथेच स्थापन झाली होती. हातमागाचा व्यवसाय ही जोरात चालायचा. मोवाड ला उद्योगधंदावाल्यांचं गाव म्हणून ओळखल जायचं.

२९ जुलैची ती काळ रात्र ढगफुटी घेऊन आली.

न भुतोनभविष्यती असा पाऊस पडला. जाम नदीला महापूर आला. असे पूर यापूर्वीही आले होते पण गावाला कधी धोका झाला नव्हता. म्हणून मोवाडवासी साखर झोपेत होते. पण पावसाचा जोर इतका वाढला की जाम नदीचा बंधाराच फुटला. पाणी मोवाडसह तेरा गावात घुसले.

हजारो एकर बागायती शेती वाहून गेली. संत्र्याची झाडे मोडून गेली.

अडीचशे लोक वाहून गेले. एका इमारतीमध्ये आसऱ्याला आलेले ७५ जण भिंत कोसळल्यामुळे जागीच गतप्राण झाले. मालमत्तेच नुकसान किती झालं याची मोजदाद नाही. पाणी उतरल्यावर अनेकांचे मृतदेह काही किलोमीटर अंतरावर सापडत होते.

विदर्भात पहिल्यादांच महापुराचा एवढा मोठा प्रलय अनुभवयाला मिळाला होता.

सगळ प्रशासन खडबडून जागे झाले. दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक तातडीने हजर झाले. काही दिवसातच पंतप्रधान नरसिंहराव यांचा देखील दौरा होणार होता. यालाही एक विशेष कारण होते.

मोवाड हे गाव ज्या रामटेक लोकसभा मतदारसंघात येत होते तिथून नरसिंहराव तीन वेळा निवडून गेले होते यामुळे त्यांची या गावाप्रती सहानुभूती असणे साहजिक होते.

पंतप्रधान येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पाहणी करणे आवश्यक होते.

सुधाकरराव नाईक जेव्हा मोवाड येथे पोहचले तेव्हा अख्ख गाव उध्वस्त झालं होतं. गावाच्या प्रवेशद्वारात मातीचे प्रचंड ढिगारे पसरले होते. ते ढिगारे पार करून मोवाडमध्ये जावे लागणार होते.

सुधाकरराव नाईक महापुराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गावात शिरलेच नाहीत.

त्यांनी अधिकाऱ्यांना गावात पाठवलं आणि स्वतः एका झाडाखाली खुर्ची टाकून शांतपणे पाईप ओढत बसले. त्यांच्या सोबत काही पोलीस देखील होते. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून आलेल्या अधिकाऱ्यांना अहवाल बनवून पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्याचे आदेश दिले व दौरा आटोपता घेतला.

त्यावेळेस बातमीच्या शोधात देशभरातून पत्रकार तिथे हजर झाले होते.

तेव्हा सुधाकररावांच्याच एका अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांनी झाडाखाली बसून महापुराची कशी पाहणी केली हे नागपूर लोकसत्ताच्या प्रवीण बर्दापुरकर यांना सांगितलं,

सोबत नाव न छापण्याच्या अटीवर शासकीय फोटोग्राफरने काढलेले फोटो देखील दिले.

ही तर सनसनाटी बातमी होती. प्रवीण बर्दापूरकर यांनी ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांच्या कानावर ही बातमी घातली. रात्रीच्या विमानानं ते छायाचित्र व बातमी मुंबईला रवाना केली.

काही दिवसांनी ‘लोकप्रभा’ मध्ये प्रवीण बर्दापुरकर यांचा ‘मोडलेले मोवाड’ हा लेख प्रसिद्ध झाला.

त्यात महापूरप्रसंगी मुख्यमंत्री निवांत बसले आहेत हे छायाचित्र प्रकाशित झालं.

संपूर्ण राज्यभरात त्या बातमीने खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली. अर्थातच, सुधाकरराव नाईक नाराज झाले.

लोकसत्ताचे प्रमुख संपादक माधव गडकरी यांच्याकडे त्यांनी नाराजी व्यक्तही केली पण, प्रवीण बर्दापुरकर यांना मात्र त्यांनी थेट संपर्क साधला नाही.

माधव गडकरी यांनी मात्र बर्दापुरकर यांची चांगलीच कानउघडणी केली.

पुढं काही वर्षांनी एकदा सुधाकरराव नाईक आणि प्रवीण बर्दापुरकर बोलत बसले होते तेव्हा तो मोवाड महापुराचा विषय निघाला. त्यावेळी बोलताना सुधाकरराव नाईकांनी त्यांना गुडघेदुखीचा कसा त्रास होता, तो ढिगारा मला चढून जाणं कसं शक्य नव्हतं, हे सांगितले.

बर्दापुरकर सांगतात,

यादिवशी ते बोलले आणि मला विलक्षण कोंडल्यासारखं झालं.

ते सुधाकरराव याना ‘सॉरी’ म्हणाले तेव्हा ते म्हणाले,

पत्रकार म्हणून तुम्ही बरोबर होतात फक्त पुरेशी माहिती नव्हती करून घेतली.

ब्रेकिंग न्यूजच्या गडबडीत झालेली मोठी चूक प्रवीण बर्दापुरकर यांनी मोठ्या मनाने मान्य केली आणि स्वतःच हा प्रसंग  सांगितला आहे.

आजही मोवाड येथे केलेलं पुनर्वसन आदर्श मानले जाते. सुधाकरराव नाईक यांनी कोणताही गाजावाजा न करता गाव उभा केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.