स्टिंग ऑपरेशनमध्ये नेहमी नेते-अभिनेते सापडतात पण त्यावेळी सुधीर चौधरी सारखा पत्रकार अडकला..

साल होतं २०१२. देशभरात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अगदी भरात होतं. बघेल तिथं मै भी अण्णाच्या टोप्या दिसत होत्या. रोजचा पेपर उघडला की मनमोहन सिंग यांच्या सरकारचे घोटाळे समोर येत होते. रोज कोणीतरी मंत्री सापडत होता, रोज टीव्ही चॅनलवरच्या चर्चेत सरकारचे वाभाडे काढले जात होते.

अशातच एक स्टिंग ऑपरेशन झालं, पण यावेळी प्रकार उलटा होता. एका नेता कम उद्योगपतीने  हे स्टिंग केलं होतं आणि त्यात सापडले होते दोन टीव्ही पत्रकार.

हे दोन पत्रकार त्या नेत्याकडे १०० कोटींची खंडणी मागताना दिसत होते. सगळ्या देशभरात खळबळ उडाली. नेमकं काय होत प्रकरण ?

हे स्टिंग ऑपरेशन घडवून आणलं होतं जिंदाल स्टीलचे चेअरमन आणि काँग्रेस खासदार नवीन जिंदल यांनी.

जिंदल ग्रुपची स्थापना मूळच्या हरियाणामधल्या हिसार येथे ओ.पी.जिंदल यांनी केली. त्यांचा जन्म १९३० साली शेतकरी कुटूंबात झाला. लहानपणापासून मशिनरीमध्ये रुची होती. तुटलेल्या लोखण्डी पाईप आणि इतर भंगार गोष्टींच्या व्यापारातून त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. हळूहळू वाढवत नेले.

आसाम मधून अशा खराब झालेल्या पाईप विकत घ्यायच्या आणि कलकत्त्याला नेऊन लिलावात विकायच्या असा त्यांचा धंदा सेट झाला. पुढे मग त्यांनी कोलकाता जवळ लिलुआ गावात पाइप बेंड आणि सॉकेट बनवायची एक फॅक्ट्री सुरु केली. त्याच नाव ठेवण्यात आलं जिंदल इंडिया लिमिटेड. ओपी जिंदल आणि त्यांच्या भावांनी सुरु केलेली फॅक्ट्री हि टाटा आणि कलिंग यांच्या नंतर भारतातली तीन नंबरचा कारखाना होता.

आपले कठोर परिश्रम आणि धंदेवाईक दृष्टी यामुळे अगदी थोड्याच काळात त्यांनी प्रचंड फायदा मिळवला. बंगाल भागातले सर्वात मोठे उद्योगपती म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी या पाठोपाठ स्टील उद्योगात प्रवेश केला. तिथे देखील त्यांना यश मिळालं. 

पुढे जिंदल यांनी आपल्या मुळगाव हिसार येथे देखील कारखाने सुरु केले. बघता बघता त्यांचा पसारा अमेरिका चीन इंडोनेशिया पर्यंत वाढला. हजारो कोटींचा उद्योग म्हणून त्यांची गणना केली जाऊ लागली.

१९९१ साली ओमप्रकाश जिंदल यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधी यांच्या आग्रहामुळे ते काँग्रेसमध्ये आले आणि हरयाणा मधून विधानसभा निवडणूक लढवली. तिथे त्यांना घवघवीत यश मिळालं. पुढे ते तिथले ऊर्जा मंत्री देखील बनले.

ओपी जिंदाल राजकारणात गेल्यावर त्यांच्या कंपनीचा कारभार सांभाळला त्यांच्या मुलांनी. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा म्हणजे नवीन जिंदाल.

नवीन यांच प्राथमिक शिक्षण हरियाणामध्येच झालं.कॉलेजसाठी दिल्लीमध्ये हंसराजला ऍडमिशन घेतलं. तिथे ग्रॅज्युएशन झाल्यावर अमेरिकेला गेले, टेक्सस विद्यापीठातून एमबीएची डिग्री घेतली. शिक्षणा सोबत त्यांना खेळात देखील गती होती. नेमबाजीमध्ये त्यांनी

परत आल्यावर आपल्या भावांसोबत जिंदाल साम्राज्याची जबाबदारी पाहू लागले. फक्त बिझनेसचा  वडिलांचा राजकीय वारसा देखील त्यांच्याकडे आला. १९९२ साली एकदा त्यांनी आपल्या कारखान्यात २६ जानेवारीला झेंडा वंदन केले होते. त्यांनी ध्वजारोहण केले यावर तिथल्या जिल्हाधिकाऱ्याने आक्षेप घेतला, नवीन जिंदल यांच्यावर केस झाली. संपूर्ण देशभरात हा खटला गाजला. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत हि लढाई गेली पण शेवटी नवीन जिंदल यांचा विजय झाला.

देशाच्या  नागरिकाला ध्वजारोहण करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे आणि तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं कोर्टाने सांगितलं.  तेव्हापासून राष्ट्रध्वज फडकवण्यावरची सर्व बंधने दूर झाली. 

२००४ साली फक्त ३४ वर्षांचे नवीन जिंदल कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार झाले. त्याच वर्षी राहुल गांधी देखील पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या टीमच्या चेहऱ्यांमध्ये नवीन जिंदाल दिसू लागले. अगदी थोड्याच काळात काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश केला जाऊ लागला. २००९ साली देखील ते जोरदार मतांनी निवडून आले.

हे सगळं राजकारण, बिझनेस चाललेलं तर सोबत स्पोर्ट्समध्ये देखील ते चमकत होते. २००४ साली नवीन यांनी पाकिस्तानमध्ये झालेल्या शूटिंग स्पर्धेत देशाला सिल्व्हर मेडल मिळवून दिलेलं तर २००७ साली सिंगापूर इथे गोल्ड मेडल मिळवलं होतं.

असा हा ऑल राउंडर राजकारणी पहिल्यांदा वादात सापडला कोलगेट प्रकरणात.

२०१२ साली कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारला १.८६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल नियंत्रक आणि महालेखापरीक्षकानी (कॅग) दिला. थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडवण्यात आले. मोठमोठ्या उद्योगपतींचे नाव यात येऊ लागलं. आजवर कधी ऐकलं नाही इतका मोठा हा घोटाळा आहे असं बोललं जात होतं.

नवीन जिंदाल यांच्या कंपनीला देखील ओडिसा राज्यात एका कोळसा खाणीचे उत्खनन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कसे मिळाले यावरून वादंग सुरु झाला. काँग्रेस मध्ये खासदार असलेल्या नवीन यांनी आपले राजकीय कनेक्शन वापरून या खाणी मिळवल्या आहेत असं बोललं जात होतं.

सर्व देशभरात चर्चा सुरु झाल्या. प्रत्येक चॅनेलवर दिवस रात्र हि बातमी दिसत होती. यातच होते सुभाष चंद्रा यांचे झी न्यूज चॅनेल.

सप्टेंबर २०१२ मध्ये नवीन जिंदाल यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब टाकला की झी न्यूज वाले तुमच्या कोळसा घोटाळ्या मधील भ्रष्टाचाराच्या बातम्या दाखवतो असं  सांगून कडून ब्लॅक मेलिंग करत आहेत व १०० कोटी रुपये खंडणी उकलण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त एवढं बोलून ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी एक १४ मिनिटाचा व्हिडीओ सगळ्यांना दाखवला यात झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांनी जिंदाल ग्रुपच्या माणसाबरोबर पैशांच्या व्यवहाराची चर्चा करताना स्पष्ट दिसत होते.

आजवर सिक्रेट कॅमेरे वापरून पत्रकारांनी मॅच फिक्सिंग पासून ते फिल्मस्टारच्या कास्टिंग काऊच पर्यंत अनेक गोष्टी उघड केल्या होत्या मात्र पत्रकारांवरच उलटलेला हा पहिला स्टिंग असावा.

सगळ्या देशभरात बॉम्ब पडल्याप्रमाणे झालं होतं.  प्रकरण गंभीर होतं. जिंदाल यांनी झी वर २०० कोटींचा दावा टाकला. सुधीर चौधरी आणि समीर अहलुवालिया या दोघांना अटक देखील झाली. झी ने हा दावा फेटाळला. उलट नवीन जिंदाल यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते  बलात्कारा पर्यंतचे आरोप करत गुन्हे दाखल केले. प्रकरण चांगलेच चिघळले. कोर्टाने पत्रकारांवर ताशेरे ओढले.

नवीन जिंदाल यांच्यावर लादलेले केस देखील फेक असल्याचं समोर आलं

पण दरम्यानच्या काळात सरकारे बदलली. २०१४ ला काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचे सरकार निवडून आले. स्वतः नवीन जिंदाल हे मोदी लाटेत कुरुक्षेत्र येथून जोरदार मतांनी पडले. त्यांना दुसरे स्थान सुद्धा मिळवता आले नाही.

या पराभवानंतर नवीन जिंदाल यांनी राजकारणापासून थोडेसे अंतर राखण्यास सुरवात केली. त्यांना मिळालेल्या खाणीचं कॉन्ट्रॅक्ट आधीच रद्द झाले होते. पुढे त्यांनी आपल्या व्यवसायात लक्ष केंद्रित केले. त्यांची झी विरुद्धची केस सुरुच होती.

२०१८ साली त्यांनी व झीच्या सुभाष चंद्रा यांनी कोर्टाच्या बाहेर आपली सेटलमेंट केली. नवीन जिंदाल यांनी आमच्यात गैरसमज झाला होता असं सांगत सर्व केस मागे घेतले. त्यांच्या मनोमलीनाच्या कार्यक्रमात सुधीर चौधरी देखील हजर होते. नवीन जिंदाल यांनी ट्विटर वर देखील हा फोटो शेअर केला.

या ट्विट वरून पुन्हा देशभरात गदारोळ झाला. जिंदाल आता भाजप मध्ये जाणार आहेत म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं असंसुद्धा बोललं गेलं. एकूणच सगळं प्रकरण डब्ब्यात गेलं.सुधीर चौधरी आजही झी न्यूजचे चीफ एडिटर आहेत. आता कोलगेट स्कॅमची चर्चा नाही. त्याचा लाखो कोटींच्या घोटाळ्याचा फुगा तर कधीच फुटला होता, त्यात कोणाचा हात होता, कोण दोषी होते याबद्दल आता चर्चा देखील नाही.एकूणच या प्रकरणात खरं काय खोटं काय समजायचा मार्ग नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.