त्या दिवसापासून सुधीर आणि सचिन हे समिकरण भारतीय टिमसाठी फिक्स झालं

भिडूंनो, आपण आयुष्यात कोणाचे तरी फॅन असतोच. त्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटता यावं, हि इच्छा असते. सुदैवाने तसा योग आलाच तर तो क्षण कधीही न विसरता येण्यासारखा. मग त्या विशिष्ट व्यक्तीला भेटल्यावर फोटो काढणं, ऑटोग्राफ घेणं ओघाने आलंच. पण त्यानंतर? तोच क्षण पुन्हा पुन्हा आठवुन आपण आनंद मानतो.

बिहार येथे मुजफ्फरनगर भागात राहणारा सुधीर कुमार चौधरी याला मात्र हा आनंद पुन्हा पुन्हा अनुभवता आला. इतकंच नव्हे, तर आज सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट टीमचा तो अविभाज्य भाग बनला आहे.

सुधीर कुमार उर्फ सुधीर गौतमची सचिन तेंडुलकरला भेटण्याची खुप इच्छा होती.

तो सचिनला भेटला. इतकंच नव्हे तर सचिनच्या घरी गेला. २०११ साली जेव्हा भारताने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हा सचिनने त्याच्या हातात वर्ल्डकपची ट्राॅफी देऊन आनंद साजरा केला. भारतीय क्रिकेट टीमच्या प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये अंगावर तिरंगाच्या रंग असलेला सुधीर कुमार हमखास पाहायला मिळतो.

हातात तिरंगा फडकावत तो संपुर्ण उत्साहात भारतीय टीमला चीयर अप करत असतो. भारतातल्या एका छोट्या भागात राहणारा हा माणुस आज भारतीय टीम ज्या ज्या देशात जाते तिथे त्यांच्यासोबत असतो.

जाणुन घ्या, भारतीय टिमचा ‘जबरा फॅन’ सुधीर कुमारची ही विलक्षण कहाणी.

सुधीर आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. २००० ते २००१ अशा वर्षभरात तो काॅलेजमधुन क्रिकेट खेळला. याच काळात सचिन तेंडुलकरला भेटण्याची त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. ‘इच्छा तेथे मार्ग’ असं म्हणतात. पण आपण हातावर हात धरुन बसुन न राहता तो मार्ग स्वतःच निर्माण करायचा असतो. सुधीरने तेच केलं.

६ नोव्हेंबर २००२ ला भारताची वेस्ट इंडिजसोबत मॅच होती. सुधीर सायकलवरुन मॅच पाहायला गेला. या सामन्यात सचिनला दुखापत झाल्याने तो खेळत नव्हता. सुधीरला कळालं. त्याचा साहजिक थोडासा हिरमोड झाला पण त्याने तो सामना पाहिला. सुधीरची सचिनला भेटण्याची जिद्द अफाट होती.

एक वर्षानंतर त्याला कुठुनतरी कळालं सचिन मुंबईत आहे.

२००३ च्या ऑक्टोबरमध्ये सुधीर पुन्हा सायकल दामटवत सचिन मुंबईत ज्या हाॅटेलात येणार होता तिथे पोहोचला. सचिन येताच सुधीर त्याच्या पाया पडला. सचिनला कल्पना होती की सुधीर इतका दूरवर सायकलने प्रवास करत त्याला भेटायला आला आहे.

सचिन त्याला म्हणाला,

‘सुधीर इथे नाही. घरी येऊन मला भेट.’

पुढच्याच दिवशी सुधीर सचिनच्या वांद्रे इथल्या घरी पोहोचला. घराबाहेर असलेल्या सिक्युरीटी गार्डने सुधीरला हटकले. नंतर सचिनला हि गोष्ट कळाली. सचिनने सुधीरला मानाने घरात बोलावले. त्याच्यासह गप्पागोष्टी केल्या. आणि इथुन पुढे सुधीर-सचिन-भारतीय टीम हे जणु एक समीकरण बनलं.

या भेटीनंतर सुधीरने भारतीय टीमची एकही क्रिकेट मॅच पाहणं सोडलं नाही. तो भारतीय टीमसोबत प्रत्येक मॅचमध्ये स्टेडियममध्ये हजर असतो. संपुर्ण शरीर भारतीय तिरंग्याच्या रंगाने तो रंगवतो. चेह-यावर सुद्धा तो स्वतःच्या हाताने तिरंग्याचा रंग देतो. केसांवर भारत देशाचा नकाशा त्याने कोरला आहे. शरीराच्या दोन्ही बाजुंवर ‘तेंडुलकर 10’ हे त्याने लिहिलं आहे. सचिनच्या जर्सीच्या मागे १० क्रमांक होता.

मॅचच्या आदल्या रात्री सुधीर संपुर्ण शरीर रंगवतो. पुढच्या दिवशी मॅच संपेपर्यंत तो काहीही खात नाही.

२०११ साल. संपुर्ण भारतात वर्ल्डकपचा माहोल. सचिनचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याची सर्वत्र चर्चा. २ एप्रिल २०११ वर्ल्डकप फायनलचा दिवस. सुधीर स्टेडियममध्ये हजर. सचिनचं होमग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर फायनलचा सामना.

धोनीने सिक्स मारला आणि भारताने वर्ल्डकप पटकावला.

संपुर्ण भारतीयांसाठी आणि विशेषतः सचिनसाठी परमोच्च आनंदाचा तो क्षण. सचिनने एका ठिकाणाहुन सुधीरला इशारा करुन बोलावले. सुरक्षारक्षकांचं जाळं भेदुन सुधीर सचिनजवळ पोहोचला.

सचिनने सुधीरच्या हातात वर्ल्डकपची ट्राॅफी दिली आणि दिलखुलास टाळ्या वाजवुन हा आनंद साजरा केला. सुधीरच्या आयुष्यातला स्वप्नवत असा तो क्षण.

सुधीर जेव्हा भारताची मॅच नसेल तेव्हा दोन-तीन महिने ट्रेनची तिकीट काढण्यापुरतं काम करुन पुन्हा भारतीय टीमला प्रोत्साहन द्यायला सज्ज होतो. सुधीर सचिनच्या आणि भारतीय टीमच्या प्रेमापोटी लग्नबंधनात अडकला नाही.

त्याने तीन जाॅब सोडले आहेत. कित्येक दिवस तो त्याच्या कुटूंबाला भेटत नाही. सचिन क्रिकेटमधुन रिटायर झाल्यानंतरही सुधीरने भारतीय क्रिकेटची साथ सोडली नाही.

तो आता ‘मिस यु सचिन 10’ असं लिहुन मैदानात हजर असतो.

२०१५ साली भारत बांग्लादेशविरुद्ध दुसरा वन डे सामना हरला. तेव्हा बांग्लादेशी फॅन्सने आनंदात संपुर्ण स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं. सुधीर जेव्हा स्टेडियमबाहेर आला तेव्हा बांग्लादेशी फॅन्सने त्याच्याभोवती घेराव घालुन त्याच्यावर दगडफेक केली.

दुस-या दिवशी सुधीर भारतीय टीमच्या सरावाला गेला असताना विराट कोहली तसेच संघातील इतर खेळाडुंनी त्याची विचारपुस करुन त्याला काळजी घ्यायला सांगीतले.

कोणाच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नये असं म्हणतात. सुधीर सचिनच्या घरी जाताना नेहमी लिचीचे दोन बाॅक्स घेऊन जाते. तो हरभजनसिंग आणि धोनीच्याही जवळचा आहे. हरभजनच्या लग्नाला सुधीर गेला होता. धोनी आणि त्याच्या कुटूंबासह सुधीरने एकत्र जेवण केले आहे.

‘शेवटच्या श्वासापर्यंत सचिनचा फॅन राहिल आणि भारतीय क्रिकेटला चीयर करेन’,

असं सुधीरचं म्हणणं आहे. सुधीर जेव्हा विविध भागांतुन सायकलने प्रवास करतो तेव्हा तिकडची माणसं सुधीरसोबत सेल्फी घेतात. सुधीर सेल्फीमध्ये चेहरा न दाखवता मान खाली करुन डोक्यावरचा तिरंगा फोटोमध्ये दाखवतो.

जवळपास गेली १५ वर्ष सुधीर भारतीय टीम सामना खेळायला जिथे जाते, तिथे असतो. फक्त फॅन असणं वेगळं. पण संपुर्ण शरीर तिरंग्यात रंगवुन आयुष्य सचिन आणि भारतीय क्रिकेटसाठी वाहणारा, सुधीरसारखा फॅन आढळणं दुर्मिळ.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.