याच बाबाने जगाला गणिताच्या कोड्यात अडकवून ठेवणारं ‘सुडोकू’ बनवलं होतं

‘माझं गणित लयं कच्चये राव’ असं म्हणणारा प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती हमखास सापडतोच. गणित डोक्यावरून जातं असं म्हणतं कॉलेजात लेक्चर बंक केल जातं, बऱ्याच शाळकरी पोरांना तर गणिताच्या  नावानं कापरं सुद्धा सुटतं. पण याच गणितातल्या कोड्यांच्या खेळानं अख्ख्या जागला येडं लावलंय.

हा खेळ म्हणजे ‘सुडोकू’

गणिताच्या नावानं डोकं खाजवतं पळ काढणारी मंडळीसुद्धा सुडोकू म्हंटलं कि, तासनतास पेपरात डोकं घालून बसतात. काही तर सुडोकू सोडवायचं म्ह्णून पेपर लावणारी मंडळी सुद्धा आढळतात. रेल्वेच्या डब्यात किंवा बसमध्ये प्रवास करताना असो, घरात विरंगुळा म्ह्णून किंवा एकाग्रता वाढवावी म्ह्णून सुडोकू ही गेम जगभरात फेमस आहे.

या खेळाचा ग्रँडफादर म्हणजे माकी काजी

दरम्यान, सगळ्यांना आपल्या बनवलेल्या सुडोकू खेळात अडकवून ठेवणाऱ्या माकी काजी यांचं मंगळवारी म्हणजेच १० ऑगस्टला निधन झालं. पित्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असणाऱ्या माकी काजी यांनी  वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

माकी काजीची कंपनी निकोलीने मंगळवारी सांगितले की, सुडोकूचे गॉडफादर आता आपल्यात नाहीत. टोकियो मेट्रो क्षेत्रातील मिताका शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तसं म्हणायचं झालं तर सुडोकूचा शोध १८ व्या शतकात स्विस गणितज्ञ लिओनार्ड यूलर यांनी लावला. पण याला स्पेशल आणि पॉप्युलर बनवलं ते माकी काजींनी.

१९८० मध्ये, काझीने ते मासिकात छापायला सुरुवात केली. लोकांना हा गुंतागुंतीचा खेळ आवडायला लागला,  त्यानंतर त्याची लोकप्रियता वाढतचं गेली. यानंतर लोकांना ते इतकं आवडलं की, ते डिजिटल स्वरूपात देखील लाँच केले गेले. 

२००६ पासून याच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या स्पर्धा  दरवर्षी आयोजित केल्या जाऊ लागल्या. काझी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा मान मिळाला.

काझींच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर १९५१ मध्ये जपानच्या सेफेरो येते त्यांचा जन्म झाला. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने केयो विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु १९७० मध्ये, जपान-अमेरिकन सुरक्षा कराराला विरोध केल्यामुळे, त्याचे बरेच वर्ग चुकले, ज्यामुळे माकी काजीला आपले शिक्षण सोडावे लागले.

शिक्षण सोडल्यानंतर त्याला एका प्रिंटिंग कंपनीत नोकरी मिळाली. या दरम्यान त्याच लक्ष एका अमेरिकन मासिकाकडे गेलं, त्यातल्या नंबर क्रॉसवर्ड गेमवर त्याची नजर खेळती राहिली.

यांनतर माकी काजीने १९८० मध्ये पहिले मासिक सुरू केले. त्याने आपल्या मित्रांसह जपानमध्ये ‘पहेली सुशिन निकोली’ या नावाने हे मासिक सुरू केले. ‘आकडे एकटे राहिले पाहिजे’ असं टायटल त्यांनी ठरवलं. या पझलचं नाव ‘सुडोकू’ असं ठेवण्यात आले, जे याच नावाने जगभरात प्रसिद्ध झाले.

पण तो इथेच थांबला नाही. १९८३ मध्ये त्याने निकोलाई कंपनीची स्थापना केली. माकी काजी दर तीन महिन्यांनी ‘पझल मॅगझीन’मध्ये कोडी बनवून, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सादर करण्याची योजना आखली. माकीने जपानमध्ये या कोड्यांचं पुस्तक छापायला सुरुवात केली. यानंतर, त्याचा ‘पझल कॉर्नर’ प्रत्येक पुस्तक दुकानात दिसू लागला.

१ ते ९ अंक उभ्या आणि आडव्या ओळीत असे बसवायचे कि तोच अंक परत त्या रेषेत यायला नको. असा हा इंटरेस्टिंग आणि डोक्याला पळवणाऱ्या खेळाची लोकप्रियता हळू- हळू देशाबाहेरही पसरू लागली. 

या खेळाला जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये स्थान मिळाल्यानंतर काझीच्या या खेळाचे सगळेच वेडे झाले. सुडोकू इतके लोकप्रिय झाले की लोक हे कोडे सोडवण्यात दिवस – दिवस घालवू लागले.

२००४ मध्ये सुडोकू जगासाठी लोकप्रिय खेळ बनला. न्यूझीलंडमधील काझीच्या एका चाहत्याने हा गेम द टाइम्स या ब्रिटिश वृत्तपत्रात छापला. त्यांनतर हे खेळणाऱ्यांची संख्या वाढतंच गेली.  या खेळाची खेळाच्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणून २००६ पासून दरवर्षी सुडोकू खेळाची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे चीफ गेस्ट म्ह्णून माकी काजी यांना बोलवले जायचे.

काजीचे सुडोकू कोडे जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत जाऊन पोहोचलंय, जिथल्या १०० पेक्षा जास्त मीडिया कंपन्यांमध्ये ते छापले जातेय. तसेच अनेक मोबाईल कंपन्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये याचा वापर केला.

दरम्यान,  काझी जुलैपर्यंत कंपनीशी संबंधित होते.  परंतु आरोग्याच्या कारणामुळे त्यांना कंपनी सोडावी लागली.

जगभरातील दहा कोटी लोक नियमितपणे हे कोडे खेळतात. विशेष गोष्ट म्हणजे या खेळाला वयोमर्यादा नसते. अगदी लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत या खेळ आवडीचा बनलाय. आधी मासिक, मग पेपर, मोबाईल ते आता थेट वेबसाईट असा या सुडोकूचा  यशस्वी प्रवास आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.