शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात साखर होती का?

भिडू काही दिवसांपूर्वी आम्ही एक लेख लिहिला होता की जिजाऊंच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांनी लखुजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली होती. मुलगी झाली हो म्हणून आज देखील काही महाभाग रडत असतात मात्र सतराव्या शतकात एक महान पिता होऊन गेला जो आपल्या मुलीचा जन्म जनतेचं तोंड गोड करून साजरा करत होता.

सांगायचा मुद्दा असा की काही खोडगुनी लोकांना प्रत्येक गोष्टीत खोट काढायची सवय असते. जिजाऊंची कथा वाचून एक भिडू आले आणि त्यांनी शंका मांडली,

” त्याकाळी साखर होती का?”

ती कमेंट वाचून आम्ही देखील विचारात पडलो. मुद्दा योग्यच वाटत होता. इंग्रज आल्यानंतर त्यांनी चहा साखरेची सवय लावली हे तर आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय मग सतराव्या शतकात साखर कुठून आली?

हिंदीत साखरेला चीनी म्हणतात त्यावरून काही जणांना वाटत की साखर चिनवरून आली.

थोडासा अभ्यास केला आणि कळाल की साखरेचा शोध इंग्रजांनी नाही तर भारतीयांनी लावलाय ते ही हजारो वर्षांपूर्वी !!

ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाली असे मानतात. पुरावनस्पतिवैज्ञानिक घटक, प्राचीन वाङ्मयातील संदर्भ आणि शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र यांच्यावरून भारताविषयीच्या विधानाला पुष्टी मिळते.

भारतात पुष्कळ ठिकाणी काष्ठयुक्त व जंगली ऊस वाढताना आढळतो. त्याच्यात आधुनिक काळात पिकविण्यात येणाऱ्या उसाची सर्व वैशिष्ट्ये आढळतात.

इंग्रजीत साखरेसाठी असलेला‘ शुगर’ हा शब्द संस्कृत‘शर्करा’ व प्राकृत शब्द साकरा या वरून आला आहे.

भारतातून गेलेला शर्करा हा शब्द अनेक शतकांनंतर अरबी भाषेत शक्कर असा झाला नंतर मध्ययुगीन लॅटिन भाषेत तो सुकॅरम असा झाला आणि अखेरीस तो शुगर म्हणून इंग्रजी भाषेत दाखल झाला.

फक्त इंग्रजी नाही तर पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच जर्मन भाषेत सुद्धा याचा अपभ्रंश होऊन शब्द निर्माण झाले.

भारतातील ऊस इ. स. पू. १८००– १७०० दरम्यानच्या काळात चीनमध्ये गेला. उसाचा रस उकळून कच्ची साखर तयार करण्याचे तंत्र गंगेच्या खोऱ्यातील लोकांकडून मिळाल्याचे अनेक चिनी लेखकांनी लिहून ठेवले आहे.

साखरेचा उल्लेख अथर्ववेदात आहे, इतकंच काय रामायण महाभारतात देखील इक्षुदंड शर्करा हा उल्लेख येतो.

अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्याने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी भारतातील उसाचा उल्लेख केलेला आढळतो. त्याचा एक सेनाधिकारी नीअरकुस याने इ. स. पू. ३२७ मध्ये तयार केलेल्या अहवालात असे लिहिले होते की,

‘ भारतात असा एक वेत आहे की, त्यापासून मधमाश्यांच्या मदतीशिवाय मध मिळविता येतो. या वनस्पतीला फळे येत नसली, तरी तिच्यापासून मादक पेय मिळते’.

कालांतराने अरबी व पर्शियन लोकही साखरेचा उपयोग करायला भारतीयांकडून शिकले. त्यांनी भूमध्य सागरी खोऱ्यांत उसाची लागवड सुरू झाली.

नंतर काही शतकांनी पॅलेस्टाइनमधून युद्घातून परतलेल्या सैनिकांनी यूरोपात साखर आणली. व्हेनीस शहर हे साखरेच्या व्यापाराचे केंद्र बनले व त्याचे हे स्थान नंतर पाचशे वर्षे अबाधित राहिले.

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांनी ऊस अटलांटिक महासागरापलीकडे नेला.

अमेरिकन क्रांती घडण्यामागे साखर उद्योगाचीही छोटी व साहाय्यक भूमिका होती.

अशा रीतीने भारतात जन्मलेली साखर जगभरात पोहचली. मात्र तिला आज आपण पाहतो ते शुभ्र स्फटिकाच्या रुपात युरोपियन लोकांनी आणले. त्यांनी साखर बनवण्याचे मोठमोठे कारखाने सुरू केले.

भारतातला पहिला साखर कारखाना हुबळी येथे १७८४ साली सुरू झाला.

त्यानंतर काही वर्षातच बिहारमध्ये एल.टी.पॅटर यांनी ऊस लागवड करून साखर कारखाना सुरू केला. त्याकाळी इंग्रजांनी मद्रास येथे सुरू केलेला साखर कारखाना ३०० टन उत्पादन घेत असे.

१७९१ या वर्षी भारताने ग्रेट ब्रिटनला ९६ क्विंटल साखर उत्पादन केल्याचे उल्लेख आढळतात.

१८८२ साली पुण्याजवळच्या मांजरी येथे भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र सुरू झाले.

याचाच अर्थ शिवाजी महाराजांच्या काळातही साखर होती.

महाराष्ट्रातले शेतकरी ऊसाचे पीक घेत होते याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रात आढळतात. पेशवाईच्या काळात जेवणानंतर पाहुण्यांना साखर दिली जात असे, लाडवात साखर घातली जात असे त्यांच्या दफ्तरावरून दिसते.

एवढा मोठा इतिहास आहे मग जिजाऊंच्या वडिलांनी हत्तीवरून साखर वाटली यात आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्रात सुरवातीचे साखर कारखाना नगर जिल्ह्यातील सुरू झाले. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ब्रॅन्डी कंपनीने ‘बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड’ नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. पुढे वालचंद यांनी रावळगाव येथे सुरू केलेला साखर कारखाना भारतातल्या पहिल्या चॉकलेट उद्योगाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला.

स्वातंत्र्यानंतर विखे पाटील यांनी आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन केला आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगाचं , शेतकऱ्यांचं नशीब पालटून गेलं. राज्यभरात साखर कारखाने उभे राहिले, शेतकऱ्यांच्या हाती पैसा येऊ लागला.

याच सहकारी साखर उद्योगाने साखर सम्राट उदयास आले. आजही ऊस शेती महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड राखून आहे. भारतात सर्वाधिक साखर निर्माण करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असते.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Aditya says

    बोल भिडूच्या मित्रांनो,
    तुमचे लेख खुप चांगले असतात, मी गेले 2 वर्षे तुम्हाला follow करत आहे, पण लेखांमध्ये काही दिवसांपासून Maruti Suzuki ची जी add येते त्यामुळे असे वाटते की फोन Hang झाला आहे.
    Please तुम्ही check karun घ्या त्यात काही problem ahe का ते.
    Thank you.

Leave A Reply

Your email address will not be published.