अमेरिकन एअरफोर्सच्या जेट विमान निर्मितीमध्ये या मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे.
नुकताच आपल्या देशाच्या एअरफोर्समध्ये फ्रान्सची राफेल विमाने दाखल झाली. अख्ख्या देशाने जल्लोष साजरा केला. जगातील सर्वात अत्याधुनिक विमाने आपल्या सैन्यदलात आल्यामुळे आपला डिफेन्स अधिक भक्कम झाला आहे यात शंकाच नाहीत. म्हणूनच या पूर्वीचे मिग, सुखोई किंवा आत्ताचे राफेल ही विमाने अख्ख्या देशाचा अभिमान आहेत.
पण स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली तरी संरक्षण साहित्यासाठी आपल्याला इतर देशावर अवलंबून राहावे लागते ही आपली नामुष्की आहे. अस नाही की भारतीय कंपन्या या साठी सक्षम नाहीत.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल एक मराठी माणसाची कंपनी थेट अमेरिकन एअरफोर्सला प्रोडक्ट सप्लाय करते.
सुहास काकडे त्याचं नाव.
सुहास काकडे हे मुळचे कराडचे. वडील शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती जेमतेमच होती. सुहास लहानपणापासून प्रचंड हुशार. फक्त अभ्यासातच नाही तर बाकीच्या गोष्टीतही त्याच डोकं बरच चालायचं. सतत काही ना काही उद्योग करत राहणारा हा चळवळ्या मुलगा.
कराडला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाणांनी शिक्षण पंढरी बनवलं आहे. अनेक शिक्षण संस्था,महाविद्यालये इथे शिकण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मुलेमुली कराडला येतात.
चव्हाण साहेबांच्या मुळे इथे सरकारी इंजिनीअरिंग कॉलेजदेखील सुरु झाल.
वयाच्या चौदाव्या वर्षी सुहास काकडे यांनी इंजिनियरिंगची जुनी पुस्तके विकायचा बिझनेस सुरु केला. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असल्यामुळे त्यांना प्रत्येकवेळी नवीन पुस्तके घेणे परवडत नसे. अशा वेळी सुहास काकडे कडे मिळणाऱ्या जुन्या पुस्तकांचा सहारा असायचा.
त्यांनी यातून भरपूर पैसे मिळवले असे नाही पण शाळेला लागणारी वह्यापुस्तके, खाऊ व इतर खर्च भागत होता. सुहास काकडे यांनी या काळात पैसे किती मिळाले हे महत्वाच नव्हत तर यातून छोट्याशा बिझनेसमधून त्यांच्यातल्या उद्योजकतेला घडवलं.
ही तर फक्त सुरवात होती.
अभ्यासात हुशार असल्यामुळे आयआयटी मुंबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला. आयआयटीमधला काळ देखील त्यांनी प्रचंड गाजवला. तिथे पी.के.केळकर नावाचे गुरु त्यांना लाभले. त्यांचं मार्गदर्शनाखाली सुहास काकडे यांना पैलू पडत गेले. आयआयटी मधूनच त्यांनी प्रोडक्टडिझाईन मध्ये एमएस पूर्ण केलं.
एकदा तर सुहास काकडे यांनी डिझाईन प्रोजेक्ट म्हणून बनवलेल्या मशीनच कौतुक आयआयटी व्हिजीटला आलेल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलं.
साधारण सत्तरच्या दशकातला हा काळ. भारतात इंजिनियरिंग इंडस्ट्रीला खूप मोठ भविष्य नव्हत. आयआयटी मधून पास होणाऱ्या जगातल्या सर्वोत्तम इंजिनियरना नोकऱ्या नव्हत्या. लायसन्सराजमध्ये सगळे उद्योग अडकले होते. सुहास काकडे यांना नोकरी मिळाली ती आयआयटीमध्येच लेक्चरशिपची.
पंखात मोठे बळ असणाऱ्या व्यक्ती खूप काळ पिंजऱ्यात अडकून राहू शकत नाहीत.
सुहास काकडे यांना अमेरिकेतून नोकरीची ऑफर आली. अमेरिका म्हणजे जगातल्या प्रतिभावान लोकांना संधी देणारा देश. अमेरिकन कंपनीला काकडे यांचं महत्व ठाऊक होत. त्यांनी काकडे यांना तिकडे येण्यासाठी कन्व्हिन्स केलं. शिवाय जे मिळवायला लोकांच आयुष्य उलटून जात ते अमेरिकन ग्रीन कार्ड देखील अवघ्या ८ दिवसात उपलब्ध करून देण्यात आलं.
ग्रीन कार्ड घेऊनच सुहास काकडे अमेरिकेला गेले. ते वर्ष होत १९७४.
आपल्या पहिल्या कंपनीत ड्राफ्ट्समन अँड डिझायनर म्हणून काम करत असताना पहिल्याच वर्षी पाच पेटंट मिळवून दिले. सुहास काकडे यांची सुरवातच धडाक्यात झाली. अमेरीकेत असतानाच एमबीए फायनान्सच शिक्षण पूर्ण केलं.
वेगाने नोकरीमध्ये प्रगती होत गेली. पुढे एकेठिकाणी सेल्स मॅनेजर म्हणून जॉईन झाले.
आयुष्य सगळ मशीन डिझाईन करण्यात गेलं होत. विज्ञान,संशोधन यात रमलेल्या काकडे यांना एका मोठ्या कंपनीचे आर्थिक निर्णय सांभाळायची जबाबदारी पार पाडावी लागत होती. लहानपणी पुस्तके विकतानाचा हिशोबाचा अनुभव याच्या जोरावर त्यांनी हे आव्हान पेलल.
आपल्या चुकातून शिकत धडपडत त्यांनी हे कौशल्य देखील आत्मसात केलं. अमेरिकन कंपन्याच वर्किंग कस चालत हे प्रत्येक विभागात काम केल्या मुळे त्यांना जवळून पाहता आलं. अगदी लहानवयात प्रचंड अनुभव गाठीशी आल्यामुळे आता स्वतःची कंपनी सुरु करता येईल एवढा आत्मविश्वास कमवला होता.
अमेरिकेत आलेल्याला फक्त १० वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा म्हणजे १९८५ साली त्यांनी स्वतःची युएसऑटोटीम नावाची कंपनी स्थापन केली.
सुरवातीला अमेरिकन ऑटो कंपन्याना लागणारे इंजिनचे महत्वाचे प्रोडक्ट बनवता बनवता सुहास काकडे यांनी जगभरातील वाहन कंपन्यामध्ये विश्वासर्हता कमवली. यामुळे युएसऑटोटीम अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठीत कंपनी पैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली.
सुहास काकडे यांना लहानपणापासून उंच आभाळाचं प्रचंड आकर्षण होत. म्हणूनच अमेरिकेला गेल्यावर त्यांनी पायलट होण्याचे प्रशिक्षण घेतले व लायसन्स देखील मिळवल होतं. याच आकर्षणातून त्यांनी विमान उद्योगासाठी लागणारे मशीन निर्मिती मध्ये उडी घ्यायचं ठरवलं.
युएसएरोटीम नावाची कंपनी स्थापन केली.
या कंपनी तर्फे जेट इंजिनसाठी लागणारे स्पेअरपार्टस बनवले जाऊ लागले. बोईंग पासून अनेक मोठ्या कंपन्याच्या ऑर्डर्स त्यांना मिळू लागल्या. त्यांच्या प्रोडक्टसची ख्याती अमेरिकन एअरफोर्सपर्यंत जाऊन पोहचली. युएसएरोटीमचे पार्टस अमेरिकेच्या प्रत्येक फायटर विमानात बसवले जातात.
सुहास काकडे यांच्या कंपनीला अमेरिकण सरकारने गोल्डन सप्लायरचा दर्जा दिला. युएसएरोटीमने आपल्या मेहनतीने हा दर्जा टिकवून ठेवला. त्यांच्या सततच्या कामगिरीचा सन्मान म्हणून एक दिवस अमेरिकन झेंडा फडकवला गेला.
हा फक्त सुहास काकडे यांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, भारताचा सन्मान होता.
आजही युएसएरोटीम ही अमेरिकन विमान उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. त्यांची उलाढाल अब्जावधी रुपयांमध्ये पोहचली आहे. जॉर्ज बुश यांच्या पासून नील आर्मस्ट्रॉंग पर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. अमेरिकेसाठी त्यांचे उद्योजक ही सर्वात मोठी ॲसेट
कराडसारख्या छोट्या गावातून जुनी पुस्तके विकणाऱ्या मुलाने अमेरिकेच्या आभाळात मारलेली भरारी अनेकांना प्रेरणादायी आहे. पण दुर्दैव अस की आपल्या या उद्योजकाची माहिती जास्त कोणाला नाही.
त्यांचा अनुभव, त्यांच्या कार्याचा वापर आपल्या देशासाठी, आपल्या मराठी मातीसाठी करून घेण्यात आपण कमी पडलो आहे. अशा उद्योजकांना संधी मिळाली तर भारताला कधीही दुसऱ्या देशांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- या मराठी माणसामुळे दुबईचा पाया रचला गेला
- भारतातील पहिलं स्मार्टकार्ड, एटीएम मशीन बनवणारा मराठी माणूस आहे
- औरंगाबादच्या भोगलेंनी भारतीय किचनला दिलेलं वरदान म्हणजे निर्लेप तवा
- सायकलवरून पाव विकणाऱ्याचा ऑडी कारपर्यंतचा प्रवास
कृपया मला मराठी उद्योजक कथा.पाठवत क्षमस्व! जय महाराष्ट्र!