नरेंद्र गिरींची हत्या कि आत्महत्या ? अखेरच्या चिठ्ठीच्या बाबतीतही एक मोठा ट्विस्ट आहे.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आणि सगळीकडेच आता एकच खळबळ उडाली आहे… मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली आणि आणखीच संशय बळावला आहे. कारण तपासात समोर येत असलेली परिस्थिती आणि काही संदर्भ पाहता एक- एक धागेदोरे बाहेर येत आहेत.
महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजच्या अल्लापूर येथील बाघंब्री मठात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
पण नेमकं या प्रकरण कसं कसं काय काय वळण घेत गेलं ते पाहूया..
प्राथमिक तपासाचा अहवाल आला कि, हि आत्महत्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाघंब्री मठात जिथे महंत नरेंद्र गिरी यांचा फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता, तिथे सर्व बाजूंनी दरवाजे बंद होते. अशा स्थितीत प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी याला आत्महत्या म्हणून अंदाज बांधला. आणि त्यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली होती. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली होती.
सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी आणि इतर दोघांना हा निर्णय घेण्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. एका शिष्यामुळे दुःखी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या चिठ्ठीत त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने आनंद गिरी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतले. मात्र, आनंद गिरी स्वतःला निर्दोष म्हणत आहेत.
अशाप्रकारे, या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या प्रयागराजमधील जॉर्ज टाऊन पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आनंद गिरीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआय चौकशीची मागणी होत आहेत.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र सिंह यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांनी अनेक राजकीय पक्षांशी संबंधित अर्धा डझनहून जास्त लोकांना ताब्यात घेतले आहे
सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व लोकांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांच्या सुरक्षेतील गनरचीही चौकशी केली जाणार आहे. महंत यांना Y श्रेणीची सुरक्षा मिळाली होती.
पोलिसांच्या हाती कॉल डिटेल्स लागले आहेत.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोबाईलमधील काही कॉल डिटेल अहवाल प्राप्त झाला आहे, ज्यात अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूच्या ६ ते १० तासांपूर्वी त्यांच्याशी संपर्क केला होता त्यांच्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे.
नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला?
महंत नरेंद्र गिरी यांचे निकटचे शिष्य निर्भय द्विवेदी यांनी सांगितलं कि, आत्महत्या करण्यापूर्वी महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोट लिहिण्याव्यतिरिक्त एक व्हिडिओ बनवला होता. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्याच मोबाईलवर बनवला. निर्भय द्विवेदी यांच्या मते, या व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा तपशीलवार खुलासा केला आहे.
हा व्हिडिओ सध्या पोलिसांकडे आहे. निर्भय द्विवेदी असेही म्हणाले की महंत नरेंद्र गिरी मोठ्या अक्षरात लिहायचे. त्याची भाषा नक्कीचतोडकी-मोडकी होती, पण ते लिहू शकत होते. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट एका लिफाफ्यात बंद केली होती.
पण यात आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे.
महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणात एक महत्वाचा अपडेट समोर आलेय त्यामुळे घटनेला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्यांची सुसाइड नोट तपासाचा मोठा आधार होता. पण अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या सुसाइड नोटवर संशय व्यक्त केला जातोय..
त्यांनी सांगितल्यानुसार महंत नरेंद्र गिरी यांना स्वाक्षरी करणंही मुश्कील होत असे, अशावेळी ते एवढी मोठी ६ ते ७ पानी सुसाइड नोट कशी काय लिहू शकतील?
या आधी आचार्य नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी या दोघांत वाद झाल्याचे देखील समोर आले होते.
या वादाचे मूळ बाघंब्री पीठाचे आसन असल्याचे सांगितले जात होते. मात्र, गुरु- शिष्य दोघेही याबद्दल उघडपणे बोलले नव्हते. काही वर्षांपूर्वी स्वामी आनंद गिरी यांनी स्वतःला महंत नरेंद्र गिरी यांचे उत्तराधिकारी घोषित केले होते.
पण नंतर महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या या घोषणेला ठामपणे नकार दिला, की हे सर्व शिष्य आहेत, कोणीही उत्तराधिकारी नाहीत. महंत नरेंद्र गिरी यांनी कोणालाही आपला उत्तराधिकारी घोषित केले नव्हते.
आनंद गिरी यांच्या म्हणण्यानुसार, गुरुजी कधीही आत्महत्या करू शकत नाहीत.
आनंद गिरी यांना ताब्यात घेतल्यानंतर, आनंद गिरी म्हणाले की गुरुजी कधीही आत्महत्या करू शकत नाहीत, त्यांची हत्या झाली आहे. ते म्हणाले की, खुद्द आईजी यामध्ये संशयास्पद आहेत. आईजी सतत नरेंद्र गिरीच्या संपर्कात होते.
आनंद गिरी यांनी आरोप केला की ज्यांनी मठाची जागा आणि मंदिराचे पैसे हडप केले त्यांनी महंतजींची हत्या केली आहे. मठातील अनेक मोठी नावे या कटात सामील असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. मात्र महंत नरेंद्र गिरी यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता या प्रकणात राजकीय लोकांची असलेले कनेक्शन असो वा आनंद गिरींचा जबाब असो किंव्हा मग त्यांची सुसाईड नोट असो सर्वच गोष्टींवर संशय निर्माण होत आहे.
तर देखील आणखी तपासात पुढे काय काय ट्विस्ट येतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हे हि वाच भिडू :
- गौतम अदानींच्या या एका अफवेमुळे, NDTV चे शेअर्सचे भाव अचानक १० टक्क्यांनी वाढले.
- किरीट सोमय्या यांचे नेक्स्ट टार्गेट कोण?
- राजीव गांधींचे बेस्ट फ्रेंड होते तरी अमरिंदर सिंग यांनी पूर्वी एकदा कॉंग्रेस सोडली होती.