भावा तुझ्याकडेच बघत्या रे म्हणून राजेश खन्नाला सुद्धा फुगवणारा तो बेस्ट फ्रेंड होता !!

व्हेलेंटाईन विक सुरु झालंय. कॉलेज कट्ट्यावर बसून हिरो एखाद्या हिरोईनकडे बघून ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू ..’ गाण म्हणतो. त्याची क्रश पण त्याच्याकडे डोळे फाडून बघत असते. ती चिडलीय की तिच्या पण मनात शिट्टी वाजतीय त्याला ठाऊक नसत. पण शेजारी बसलेला दोस्त त्याला फुगवत असतो.

“भावा ती तुझ्याकडेच बघाल्या.”

पुढे ती त्याला पटते, तो हिरो बनून कॉलेजमध्ये दाबत हिंडतो. सगळ्यात फेमस कपल म्हणून सगळेजन ओळखतात. पण भावाला प्रेरणा देणारा तो दोस्त मात्र विसरला जातो.

होय याच मित्राची स्टोरी तुम्हाला सांगतोय. सुजित कुमार.

मेरे सपनो की राणी मध्ये राजेश खन्ना शेजारी बसून माउथ ऑर्गन वाजवणारा दोस्त. त्याला आपण जुन्या पिक्चर मधी कायम पाहिलंय. जास्त करून राजेश खन्ना सोबतच्या. कधी मोठा भाऊ, कधी धाकला भाऊ, कधी जिगरी दोस्त तर कधी वेगळच कुठलतरी पात्र. पण Acting भारी करायचा म्हणून टिकून पण राहिला.

पण भावांनो हा काय त्याचा पहिला पिक्चर नव्हता.

तर स्टोरी अशी की, त्याच खर नाव एकदम भारदस्त .समशेर बहादूर सिंग. वाराणसी मधील शेतकरी कुटुंबात जन्मलेला. घरची परिस्थिती एकदम चांगली. एकुलता एक. सगळे लाड पूर्ण व्हायचे. हवेलीत राहणारा समशेर लहानपणी लंडनला शिकायला जाण्याचं स्वप्न पहायचा.

पण मोठा झाला तसं मन बदलल. म्हणला आधी इथ वकिलीच शिक्षण घेऊ.

आयुष्य कधी कुठे कसं नेईल हे सांगता येत नाही. कायदा शिकता शिकता नाटकाची आवड लागली. दिसायला देखणा तर होताच पण अभिनयसुद्धा चांगला करायचा. कॉलेजच्या गदरिंग मध्ये, स्पर्धेत नाव गाजू लागल. असच एका स्पर्धेत त्यावेळचे फेमस डायरेक्टर फणी मुजुमदारनी याला पाहिलं आणि फिल्म्स साठी प्रयत्न करायला सांगितलं.

समशेर बहादूर सिंग चा सुजित कुमार बनला.

मुंबईत स्ट्रगल मोठा होता. हिंदी सिनेमात संधी लगेच मिळत नव्हती. कुठे तरी बकग्राउंड ला सिगरेट फुंकत उभा राहा असे फुटकळ रोल मिळत होते. पण अभिनयाची खुमखुमी जात नव्हती. म्हणून याने आपला मोर्चा भोजपुरी सिनेमाकडे वळवला.

भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद जे स्वतः बिहारचे होते त्यांच्या इच्छेखातर नासीर हुसेन नावाच्या दिग्दर्शकाने भोजपुरी सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. साठच्या दशकात भोजपुरी सिनेमा बाळस धरत होता. तिथेच सुजित कुमारचा चांगलाच जम बसला. त्यानं तिथ मोठ नाव कमावल.

खऱ्या अर्थाने तो भोजपुरीचा पहिला सुपरस्टार होता. फक्त युपी-बिहारच नाही तर आफ्रिका, फिजी, मॉरिशस या देशांमध्ये देखील भोजपुरी सिनेमा पोहचला आणि सोबत सुजित कुमार देखील.

त्याची लोकप्रियता पाहूनच पहिला हिंदी सिनेमा ऑफर झाला. याच नाव ‘एक साल पहले.’  यांत त्याची नायिका होती सईदा खान. पुढे त्याचे  हिरो म्हणून पुतलाबाई , लाल बंगला याहे फिल्म्स पण बऱ्यापैकी चालले. पण अपेक्षित यश मिळत नव्हत.

व्यवहारज्ञानात चतुर असणाऱ्या सुजित कुमारने वेळीच आपल हित ओळखून त्याने सहाय्यक भूमिका करायला सुरुवात केली.

पुढे याच भूमिका त्याची ओळख बनल्या. आराधनाच्या आणि मेरे सपनो की राणीच्या यशान त्याचं, राजेश खन्नाच आणि किशोर कुमारच आयुष्य बदलून टाकलं.

राजेश खन्ना सुपरस्टार बनला. त्याला घेतल की पिक्चर हिट हे समीकरण बनलं होतं. फक्त सिनेमात त्याचा आवाज किशोरदा हवेत ही एकच अट असायची. पण योगायोगाने याच यशाच्या फोर्म्युल्यामध्ये सुजित कुमारला देखील आला. मित्राच्या गाण्याला माउथ ऑर्गन वाजवून साथ देणारा सुजित राजेश खन्नाच्या पिक्चरमध्ये असण कम्पल्सरी झाल.

राजेश खन्ना असलेल्या एकूण सोळा सिनेमांमध्ये सुजित कुमारने पण काम केलंय. 

आराधना, हाथी मेरे साथी, आन मिलो सजना, अमर प्रेम, रोटी असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी एकत्र दिले. राजेश खन्ना सोडून देवआनंदच्या सिनेमात देखील सुजित कुमार अनेकदा झळकला.

हॉरर सिनेमात तर सुजित कुमार हमखास दिसायचा. त्याने जवळपास १५०च्या वर सिनेमात काम केलय. पण आपल्याला तो आठवतो ते मेरे सपनो की रांनी मध्येच.

पुढे जाऊन जागतिकीकरणानंतर सर्वत्र टीव्ही आले. सुजित कुमारने या क्षेत्रात पण अभिनय केला होता. आपल्या करत असलेल्या भूमिकेच्या मर्यादा ओळखून त्याने ब्रेक घेतला आणि पुढे फुल्ल टाईम प्रोड्यूसर बनला.

दरार, चॅम्पियन, ऐतबार सारखे सिनेमे प्रोडूस करून इथे पण त्याने आपली छाप सोडली.

प्रेक्षकांनी त्याला विसरलं पण त्याच्या दोस्तानी त्याचा विसर पडू दिला नाही. राजेश खन्ना, जितेंद्र, राकेश रोशन, रणधीर कपूर हे त्याचे खास दोस्त. सत्तरच्या दशकातल्या हिरोंची एक छोटीशी टोळी त्यांनी बनवली होती. हे सगळे म्हातारे एकत्र जिमला जायचे. गप्पा मारायचे. उरलेलं आयुष्य हसत खेळत एन्जोय करायचे.

राजेश खन्नाच्या चढउताराच्या आयुष्यात कायम त्याच्या शेजारी बसून माउथ ऑर्गन वाजवणारा सुजित कुमार शेवटपर्यंत त्याचा बेस्ट फ्रेंड राहिला. 

या दोस्तांची टोळी फुटली सुजित कुमारमुळे. २००७ साली त्याला कॅन्सरने गाठले. 5 फेब्रुवारी 2010 ला त्याने जगाचा निरोप घेतला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.