सुखविंदरने गायलेलं छैयां छैयां ऐकून रेहमानने त्याला दर्ग्यात माथा टेकवायला नेलं.

असं म्हणतात पंजाबच्या नसानसांमध्ये संगीत आहे. ही भाषा अतिशय गोड आहे. शिवाय या मातीला सुफी संतांची परंपरा लागल्यामुळे सुफी संगीताचे, उर्दूचे संस्कार देखील या भाषेवर झाले आहेत.

तर गोष्ट आहे याच पंजाबच्या अमृतसरची. एक छोटा मुलगा होता. घरची परिस्थिती चांगली. पण पोराला खोड होती, घरच्यांची नजर चुकवून जवळच्या एका झोपडपट्टीमध्ये जायचं. कशाला तर गाणी ऐकायला? तिथे काही मिराशी सिंगर असायचे. ते आपल्याच मस्तीत दंग होऊन गाणी म्हणायचे. हा तिथे जाऊन तल्लीन होऊन ही गाणी ऐकत बसायचा. मग घरातल कोणीतरी त्याला शोधत शोधत तिथे यायचे. तिथून त्याला उचलून घरी आणल जायचं. घाण वस्तीत जाऊन आला म्हणून अंघोळ घातली जायची.

“ये सुख्खी तो पगला गया है. उसको कपडे मत पेहनाओ. “

पण पोरग ऐकायचं नाही. रोज सुफी गाण्यांच्या ओढीने ते पाचसहा वर्षाच पोरग अर्ध नागड पळत पळत झोपडपट्टीकड जायचं. घरच्यांनी हात टेकले. चांगला इंग्लिश मिडीयमच्या शाळेत घातलाय पण याला झोपडपट्टीचे डोहाळे लागले आहेत.

एक दिवस त्याच्या शाळेच्या कम्पसमध्ये पंजाबच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चरतर्फे एक गाण्याची स्पर्धा होती. मोठे मोठे जानेमाने सिंगर आले होते. अख्खं मैदान प्रेक्षकांनी भरल होत. यात मंत्रीमहोदयदेखील होते. स्पर्धा रंगात आली होती पण पडद्यामागे एक वेगळंच गोंधळ चालेलला. सुख्खीने तिथे जोरात भोकाड पसरल होतं. कारण काय तर त्यालासुद्धा स्टेजवर गायचं आहे. सगळ्यांनी समजावून सांगितलं. एवढे मोठे गायक गात आहेत त्या प्लॅटफॉर्मवर आठ वर्षाच्या मुलाला गायला देण शक्य नव्हत.

घरच्यांनी मारून पाहिलं, पण पोरग भलतचं वांड होत. त्याने अंगावरचे खुर्च्या फेकणे, अंगावरचे कपडे फाडणे वगैरे प्रकार सुरु केले. अखेर आयोजकांनी त्याच्यापुढे हात टेकले. प्रेक्षकांची माफी मागत या पोराला स्टेजवर उभ केलं. सगळ्यांना वाटलं की बडबडगीताचे चार ओळी म्हणेल आणि शांत होईल. पण पठ्ठ्याने लता मंगेशकर आणि किशोर कुमारचं गाण गायलं. 

ते त्यानं एवढ भन्नाट गायलं की लोकांनी सहा वेळा त्याला वन्स मोअर दिला. मोठमोठ्या गायकांना जे साधलं नव्हत ते या आठ वर्षाच्या मुलानं करून दाखवलं होतं. मंत्र्यांनी स्वतःच्या हाताने त्याला ट्रॉफी दिली.

त्या दिवशी सुख्खीचा सिंगर सुखविंदर सिंग झाला होता.

वयाच्या नवव्या वर्षी आईवडील दोघांचही मायेच छत्र उडून गेलं. पण याच्यातील टॅलेंट ओळखून त्याला संगीताच शिक्षण घेण्यासाठी लंडनला पाठवण्यात आलं. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने एका अल्बमच्या गाण्याला संगीत दिलं.

“तुतक तुतक तुतीय हैजमालो”

मलकितसिंगने गायलेलं हे गाण अजूनही पंजाबी डिस्को गाण्याच्या प्लेलिस्टमध्ये हमखास दिसते. पुढे त्याने एक त्याचा स्वतःच्या आवाजातला अल्बम देखील आला,”मुंडा साउथ हॉलदा”. तोदेखील हिट झाला. खुद्द लक्ष्मीकांत प्यारेलालनी त्याला मुंबईला बॉलीवूडमध्ये गाण्यासाठी बोलावून घेतलं. त्यांच्या टीममध्ये सुखविंदर सामील झाला.

बऱ्याच जणांना माहित नसते पण सुपरहिट कर्मा सिनेमामध्ये सुखविंदरने काही ओळी गायल्या आहेत. पुढे खिलाफ, चमत्कार, सौदागर अशा काही सिनेमांमध्ये त्याने गाणी म्हणली. पण स्वतःची छाप अजून तो पाडू शकला नव्हता. त्यातच लक्ष्मीकांत प्यारेलालमधले लक्ष्मीजी वारले. सुखविंदर मुंबई सोडून परत पंजाब मध्ये आला. 

त्याला गाण्याबरोबर धावण्याचा देखील शौक होता. अमृतसरमध्ये बाकी सगळ सोडून धावण्याची प्रॅक्टीस सुरु केली. शाळेत असताना त्याला रनिंगमध्ये प्राईज मिळाले होते. पण थोड्या दिवसांनी त्याला लक्षात आलं की आता रनिंगमध्ये करीयर शक्य नाही. आता आपला एकच सहारा उरला आहे ते म्हणजे गाण. पूर्ण झोकून देऊन हेच कराव लागणार आहे. परत पहिल्यापासून शिकायला सुरवात केली. त्यातच एका ट्रूपबरोबर वर्ल्ड टूर करायची संधी त्याला मिळाली. तिथे देशोदेशीच संगीत ऐकायला मिळालं.

भारतात आल्यावर सुखविंदर एकदा गाणी ऐकत होता तेव्हा त्याला एका सिनेमाच्या गाण्यांनी वेड लावलं. सिनेमाच नाव होत रोजा आणि संगीतकार होता ए.आर.रेहमान. सुखविंदरला जाणवलं या माणसाच्या संगीतात एक जादू आहे. खर संगीत तो ओळखतोय. आपल्या आवाजाला खरा न्याय त्याच्याकडेच मिळेल.

सुखविंदरला काहीही करून रेहमानची भेट मिळवायची होती. पण मितभाषी रेहमानची भेट होणे सहज शक्य नव्हत. खूप वर्ष प्रयत्न केले. सुख्खीने स्वतःच्या मुंडा साउथ हॉलदा या अल्बमची सीडी बनवली होती. ती कशीतरी रेहमानपर्यंत पोहचवली. त्याने ती ऐकली.

आणि एक दिवस रेहमानने सुखविंदरला चेन्नईला भेटायला बोलवल.

सुखविंदरसाठी सर्वात मोठा दिवस होता. ज्याची भक्ती केली त्या देवाला प्रत्यक्षात भेटायला जाण्यासारखं झालं होत. सुखविंदर अगदी खुश होऊन गेला. चेन्नईच्या त्या छोट्याशा गल्लीतल्या रेहमानच्या स्टुडियोमध्येही भेट झाली. तिथे दिग्दर्शक गोविंद निहलानी होते.

सुख्खीला वाटलं आपल्या गाण्यावर रेहमान बोलेल. पण गोविंदजीचं बोलू लागले. त्यांनी आपल्या सिनेमामधली एक सिच्युएशन सांगितली. सुखविंदरला काही कळेना नेमक चालल काय आहे. काही वेळाने त्याच्या ध्यानात आलं की रेहमानला आपल्या तक्षक सिनेमासाठी एक गाण लिहून हवय. सुख्खी म्हणाला,

“सर वो तो मै लिख दुंगा. मगर माफ किजीये मै एक सिंगर भी हु.”

कधी नव्हे ते रेहमानच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो म्हणाला कुछ गाके सुनाओ. सुख्खी म्हणाला,

“मेरी एक रिक्वेस्ट है. मुझे हार्मोनियम चाहिये. “

रेहमानचा स्टुडियो भारतातला सर्वात अद्यावत स्टुडियो होता. रेहमान तिथे कम्प्युटरवर संगीत बनवतो. जुन्यापद्धतीने वाद्यसंगीताचा ऑर्केस्ट्रा वगैरेची गरज त्याला भासत नाही. पण सुखविंदरसाठी त्याने कोपऱ्यात पडलेला वडिलांचा जुना हार्मोनियम पैदा केला.  

सुखविंदरने तो हार्मोनियम घेतला आणि लहानपणी ऐकलेला पीरबाबा बुल्लेशहाचं एक सुफी गाण गाऊन दाखवल. गाण गाताना तो एकदम वेगळ्याच जगात गेला होता. त्याच्या आवाजाची रेंज, त्याच गाण गाताना देहभान हरपण बघून  रेहमानदेखील थक्क झाला. सुखविंदर बराच वेळ गात होता. हे सगळ गाण रेकॉर्ड होत होतं.

“मेरे इश्कने नचाया तक थैय्या थैय्या”

तो जेव्हा थांबला तेव्हा  रेहमानने सुख्खीचा हात धरला आणि स्टुडियोच्या बाहेर नेलं. पंचायतनच्या शेजारीच  गल्लीत एक दरगाह आहे. तिथे नेलं, त्याला एक तक्क्या वगैरे दिला आणि म्हणाला थोडा वेळ आराम कर.

सुखविंदरला झोप लागली. तो उठला तेव्हा तिथे जेष्ठ दिग्दर्शक मणीरत्नम आला होता. रेहमान त्याला ओळख करताना म्हणाला,

“He is the voice of India and he will sing for your film Dil Se.”

सुखविंदर साठी मुंबईमध्ये स्टुडियो उभा करण्यात आला. रेहमान नेहमी रात्री रेकोर्डिंग करायचा. सुखविंदर जेव्हा गाण्यासाठी आला तेव्हा त्याला दिसलं तिथ एक पांढऱ्याशुभ्र वस्त्रात संत माणूस बसला आहे. चेहऱ्यावर निर्मळ हास्य. रेहमानने ओळख करून दिली. ते गुलजार साब होते. त्यांनी सुखविंदरने गायलेलं पीर बुल्लेशाह वाल गाण ऐकलं होत. सुखविंदरने त्यांचे पाय धरले, त्यांनी त्याच्या हातात कागद दिला. त्यावर लिहल होतं,

“वो यार है जो खुशबू की तरह,

जिसकी जुबा उर्दू की तरह,

मेरी शाम रात मेरी कायनात

वो यार मेरा सैय्या सैय्या

चल छैया छैया”

सुख्खी म्हणतो ते शब्द वाचल्यावर मला वाटलं की खरोखरचे पीरबाबा बुल्ले शाह जमिनीवर अवतरलेत.खरोखर या गाण्याने जादू केली. गाण्याच पिक्चरायजेशन पण बाप केलं होतं. 

उटीच्या सुंदर जंगलात धावणाऱ्या ट्रेनवर नाचणारी सेक्सी मलायिका अरोरा आणि सोबत लाल जकेटमधला एनर्जटिक शाहरुख खान. जबरदस्त योग जुळून आला होता. सुखविंदरने जीव तोडून गाण म्हटल होतं. त्याच रेल्वे रुळाप्रमाणे कधीही नागमोडी वळू शकणारा, उटीच्या पहाडाप्रमाणे क्षणात टोकाची उंची गाठणारा आवाज दैवी म्हणाव असाच होता.

असं म्हणतात की या गाण्यानं भारतीय सिनेसंगीतालाचं बदलून टाकलं. गेल्या काही वर्षापासून आलेल्या सूस्ततेला हलवून त्यात एनर्जी भरली. नवीन प्रयोगाला वाट मिळवून दिली. बाकी काय का असेना सुखविंदरसिंग नावाच्या गायकाचा हा पुर्नजन्म ठरला.

त्याला कित्येक पुरस्कार मिळाले. कित्येक भन्नाट गाणी म्हटली. अगदी त्याने म्हटलेल्या गाण्याला ऑस्करदेखील मिळाला. पण सुखविंदर सिंग आजही तसाच झोपडपट्टीमध्ये गाण ऐकायला जाणारा बंडखोर मुलासारखा आहे. मनाला येईल तीच गाणी म्हणतो. मनाला येईल ते बोलतो. अजूनही त्याने लग्न वगैरे केलेलं नाही. सुभाष घई त्याला गंमतीने पागल रमता जोगी म्हणतात आणि ते खरच आहे. आपल्या संगीतात रमलेला रमता जोगी. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.