मुस्लिमबहुल इंडोनेशियात हिंदू धर्माची घरवापसी?

कधीकाळी बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असणाऱ्या इंडोनेशियामध्ये परकीय आक्रमणानंतर, इस्लाम धर्माचं वर्चस्व प्रस्थापित झालं. त्यानंतर इथं हिंदू अल्पसंख्यांक म्हणून राहत आहेत. आता मात्र या देशात पुन्हा हिंदू धर्माचं राज्य येणार अशी चर्चा आहे. याला कारण ठरतंय ते एक धर्मांतर आणि साधारण सहाशे वर्ष जुनी भविष्यवाणी.

इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकर्णो यांची मुलगी आणि इंडोनेशियाच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष मेघावती सुकर्णोपुत्री यांची बहीण सुकमावती सुकर्णोपुत्री या इस्लाममधून हिंदू धर्मात प्रवेश करणार आहेत. बालीमधल्या सिंगराजा शहरात सुकमावती औपचारिकरित्या धर्मांतर करणार आहेत. सुकमावती या वयाच्या ७० व्या वर्षी हिंदू धर्मात परत येत आहेत.

इंडोनेशिया हा जगातला सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश. एकेकाळी इथं हिंदू धर्माचा जबरदस्त प्रभाव होता. पहिल्या शतकाच्या सुरूवातीस जावा आणि सुमात्रा बेटांवर हिंदू धर्माचं लोण पसरलं आणि १५ व्या शतकापर्यंत इथले नागरिकही समृद्ध झाले. मात्र इस्लामच्या आगमनानंतर देशातल्या हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा मिळाला. इंडोनेशियात पुन्हा हिंदू धर्माचं प्राबल्य वाढेल असा तिथल्या लोकांना विश्वास आहे. याचं कारण आहेत भविष्यवाणी.

आता भिडू भविष्यवाणी म्हणजे काय पिक्चरमध्ये दाखवतात, तसं बॅकग्राऊंडला आवाज आणि निळा लाईट पडून झालेली नाही. तर इथल्या पुजाऱ्यानं सांगितलेली भविष्यवाणी. 

पुजारी सब्दापालन यांची भविष्यवाणी काय सांगते?

सब्दापालन हा इंडोनेशियातल्या सर्वात शक्तिशाली मजपाहित राज्याचा राजा पाचवा ब्रविजय याच्या दरबारात पुजारी होता. इंडोनेशियात १४७८ मध्ये इस्लाम धर्माचं वर्चस्व वाढू लागलं, तेव्हा ब्रविजयनं इस्लाममध्ये धर्मांतर केलं. तेव्हा सब्दापालननं ब्रविजयला शाप दिला. राज्यात नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय भ्रष्टाचाराचं लोण पसरेल आणि मी ५०० वर्षांनंतर इथं परतेल. हा देश इस्लामच्या तावडीतून मुक्त होऊन इथं हिंदू धर्म मानणाऱ्यांची संख्या वाढेल, असं भाकित सब्दापालननं केलं होतं.

सब्दापालनच्या भविष्यवाणीनं असंही सांगितलं होतं की, ब्रविजयनं इस्लाम धर्म स्वीकारला, तर त्याच्या मुलांना त्रास होईल. जावामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांची जमीन सोडून इतर देशांमध्ये जाण्यास भाग पाडलं जाईल.

सब्दापालनच्या भविष्यवाणीनुसार काही गोष्टी झाल्या असतीलही, पण ५०० वर्षांनंतर पुन्हा येईन म्हणणारा सब्दापालन काही आला नाही. 

वयाच्या ७० व्या वर्षी सुकमावती यांनी हिंदुत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तिची आजी न्योमन राय सिरीमबेनही हिंदू आहे. सुकमावती यांनी यापूर्वी हिंदू समारंभांमध्ये भाग घेतला होता आणि हिंदू धर्माच्या प्रमुखांशी संवादही साधला होता. धर्मांतर करण्याच्या निर्णयाचं बंधू गुंटूर सुकर्णोपुत्र, गुरु सुकर्णोपुत्र आणि बहीण मेघावती सुकर्णोपुत्र यांनीही कौतुक केलंय.

आता या धर्मांतरामुळं तिथल्या हिंदू धर्मीयांची संख्या वाढणार का आणि सब्दापालनची भविष्यवाणी खरी ठरणार का? तुम्हाला काय वाटतं?

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.