सुनक यांची चर्चा सुरु आहे पण ब्रिटनसोबतच जगातील ८ देशांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या मागील निवडणुकीत ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शेवटच्या क्षणी मागे पडले होते, परंतु अवघ्या १.५ महिन्यात ब्रिटनच्या राजकारणाचे वारे पुन्हा एकदा फिरले आणि ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर सुनक पंतप्रधान म्हणून ब्रिटनला संबोधित करणार आहेत. 

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान होत आहेत म्हणून त्यांची चर्चा केली जातेय

परंतु जगातील आणखी बऱ्याच देशांची प्रमुख पदं भारतीय वंशाच्या नागरिकांकडे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील काही लोकांनी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरण केलं होतं. त्यातीलच अनेकांनी जगभरातील वेगवेगळ्या देशांचे प्रमुख म्हणून काम सांभाळलेलं आहे. 

भारतीय वंशाचे हे १० नागरिक वेगवेगळ्या देशांचे प्रमुख पद सांभाळत आहेत.

१) अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या मोठ्या नेत्या आहेत.  

कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या भारतातील चेन्नईच्या होत्या. पेशाने ब्रेस्ट कॅन्सर रिसर्चर असलेल्या श्यामला या नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाल्या. तिथेच त्यांनी आफ्रिकन वंशाचे डोनाल्ड यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे कमला हॅरिस या भारतीय आणि आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. 

कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षामधून राजकारणात पाऊल ठेवलं. राजकारणात आल्यानंतर त्या पहिल्यांदा २००४ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्को जिल्ह्याच्या ॲटर्नी झाल्या. तर २०११ मध्ये त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ॲटर्नी जनरल झाल्या. २०१७ मध्ये कॅलिफोर्निया राज्यातून त्या सिनेटर म्हणून अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून गेल्या. 

तर २०२१ मध्ये जो बायडेन यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाल्या. अमेरिकेच्या इतिहासात उप्राष्ट्राध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत तसेच अमेरिकेत इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या भारतीय वंशाच्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. 

२) तिसऱ्यांदा पोर्तुगालचे पंतप्रधान झालेले अँटोनियो कोस्टा हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. 

अँटोनियो कोस्टा हे यांचे वडील ओरलँडो अँटोनियो फर्नांडास दा कोस्टा यांचा जन्म गोव्यात झाला होता. त्यानंतर ते पोर्तुगालला स्थायिक झाले. तिथे पोर्तुगीज असलेल्या मारियो यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि अँटोनियो कोस्टा यांचा जन्म झाला. अँटोनियो यांना भारतीय वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान आहे. 

कोस्टा हे १९९७ पासून पोर्तुगालच्या राजकारणात सक्रिय आहेत. १९९७ मध्ये समाजवादी पार्टीची सत्ता असतांना पहिल्यांदा संसदीय कामकाज मंत्री आणि त्यानंतर न्याय मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. २००७ मध्ये ते पोर्तुगालची राजधानी लिस्बनचे महापौर म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्ये ते पुन्हा केंद्रीय राजकारणात परतले, ते समाजवादी पार्टीचे सेक्रेटरी जनरल आणि विरोधी पक्ष नेते झाले. 

पण एकाच वर्षानंतर २०१५ मध्ये कोस्टा हे पोर्तुगालचे १३ वे पंतप्रधान झाले. २०२२ मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. कोस्टा यांच्या धोरणामुळे त्यांना पोर्तुगालचे गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं.  

३) मॉरिशसचे ७ वे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंह रूपन

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातील अनेक मजूर मॉरिशिअसमध्ये नेण्यात आले होते. त्यामध्ये पृथ्वीराजसिंह रूपण यांच्या परिवाराचा सुद्धा समावेश होता. आर्य समाजाचे सदस्य असलेल्या हिंदू कुटुंबामध्ये रूपन यांचा जन्म झाला. एलएलएममध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या रूपन यांनी १९८३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. 

१९९५ मध्ये त्यांनी खासदार पदाची पहिली निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण २००० च्या निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून गेले. २०१०-१२ असे दोन वर्ष त्यांनी डेप्युटी स्पीकर म्हणून पदभार सांभाळला. २०१४-१९ दरम्यान त्यांनी सामाजिक विकास आणि आर्थिक विकास मंत्री म्हणून काम सांभाळलं. तर २००९ मध्ये ते देशाचे ७ वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. 

४) संस्कृत श्लोक म्हणत शपथ घेणारे सुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी.

१८७३ मध्ये डच सरकारने ब्रिटिशांशी करार करून भारतीय मजुरांना सुरीनाम मध्ये नेलं होतं. त्यातीलच सुरिनामी भारतीय परिवारात चंद्रिकाप्रसाद संतोखी यांचा जन्म झाला. १९८३ मध्ये संतोखी पोलीस इंस्पेक्टर म्हणून रुजू झाले. १९८९ मध्ये ते सुरिनामच्या सीआयडीचे प्रमुख झाले तर १९९१ मध्ये पोलीस कमिश्नर झाले. 

पण २००५ मध्ये त्यांनी प्रोग्रेसिव रिफॉर्म पार्टीमधून राजकारणात प्रवेश केला. २००५ मध्ये ते देशाचे न्याय आणि पोलीस मंत्री झाले तर २०१०-२० या काळात खासदार म्हणून काम पाहिलं. २०११ मध्ये प्रोग्रेसिव रिफॉर्म पार्टीचे प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि २०२० मध्ये ते सुरिनामचे ९ वे राष्ट्रपती झाले. 

राष्ट्रपती पदाची शपथ घेतांना त्यांनी वेदांमधील संस्कृत श्लोक म्हटले होते त्यामुळे त्यांचा शपथविधी बराच चर्चेत आला होता.  

५) गुयानाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती मुहम्मद इरफान अली.

दक्षिण अमेरिकेतील सुरिनामच्या शेजारीच गयाना नावाचा देश आहे. गुयानात निम्मी लोकसंख्या भारतीय वंशाचीच आहे. या देशात ६१ टक्के ख्रिश्चन, २४ टक्के हिंदू तर ७ टक्के मुस्लिम राहतात. मुहम्मद इरफान अली हे गुयानाचे १० वे आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती आहेत. 

मुहम्मद इरफान अली यांचा जन्म भारतीय-गुयानीज वंशाच्या परिवारात झाला. दिल्लीतुन एम ए केल्यानंतर त्यांनी शहरी आणि प्रादेशिक नियोजनात डॉक्टरेट पदवी मिळवली. अली २००६ मध्ये पीपल्स प्रिग्रेसिव्ह पार्टीकडून राजकारणात आले. २००९-१५ या काळात गृह, पाणी, पर्यटन आणि वाणिज्य मंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळलं होतं. तर २०२० मध्ये त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली.

६) मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ हे सुद्धा भारतीय वंशाचेच आहेत.

मॉरिशसचे ५ वे पंत्रप्रधान असलेले प्रविंद जगन्नाथ-यादव हे १९८७ पासून मिलिटन्ट सोशालिस्ट मुव्हमेंट पक्षाकडून राजकारणात आहेत. पहिल्यांदा २००० मध्ये ते देशाचे कृषी मंत्री झाले तर २००५ मध्ये अर्थ मंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळलं होत. दोनदा उपपंतप्रधान म्हणून काम करणारे जगन्नाथ हे २००३ पासून एमएनएस पक्षाचे प्रमुख आहेत. 

तीनवेळा अर्थमंत्री म्हणून काम सांभाळणाऱ्या जगन्नाथ यांची २०१७ मध्ये मॉरिशसचे ५ वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. ऑगस्ट २०२२ मध्ये जगन्नाथ हे काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्यासाठी ३ दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. 

७) गुयानाचे उपराष्ट्रपती भरत जगदेव यांचे आजोबा उत्तर प्रदेशाच्या अमेठीतले होते.

गुयानाच्या राष्ट्रपतींबरोबरच उपराष्ट्रपती भरत जगदेव हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. जगदेव १९९२ मध्ये पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीकडून राजकारणात आले. १९९५ मध्ये त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर १९९७ मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपती झाले.  जगदेव यांनी आतापर्यंत गुयानाचे एक वेळ पंतप्रधान, २ वेळ राष्ट्रपती आणि २ वेळ उपराष्ट्रपती राहिले आहे. तर २०१०-११ मध्ये दक्षिण अमेरिकी राष्ट्रांच्या संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष होते. 

८) आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान लिओ वराडकर यांचे वडील महाराष्ट्रातले होते.

लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर यांचं घर मुळात कोकणातल्या मालवणचं आहे. अशोक वराडकर यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यानंतर अशोक वराडकर हे आयर्लंडला गेले आणि त्यांनी आयरिश वंशाच्या मरिअम यांच्याशी लग्न केलं.

लिओ वराडकर हे १९९९ मध्ये २० व्या वर्षी फ़िगल कन्ट्री निवडणुकीत विजायियो झाले होते. २००७ पासून ते आयर्लंडमध्ये वेगवगेळ्या पदांवर मंत्री म्हणून काम करत आहेत. तर २०१७ मध्ये देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून कार्यकाळ सांभाळला होता. ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान झाले होते.

२०२० पासून ते आयर्लंडचे ट्रान्सेट म्हणजेच पंतप्रधान पदानंतरचे दुसरे सगळ्यात शक्तिशाली नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे आयर्लंमधील अनेक खात्यांचा कार्यभार आहे.

९) सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हलिम्मा याकोब या सुद्धा भारतीय वंशाच्याच आहेत.

सिंगापूरच्या ८ व्या राष्ट्रपती हलिम्मा याकोब याचे वडील भारतीय वंशाचे आहेत तर आई मलेशियन वंशाची आहे. नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस मध्ये काम करणाऱ्या याकोब यांनी २००१ मध्ये पीपल्स ॲक्शन पार्टीत प्रवेश केला आणि त्या राजकारणात आल्या. २००१ मध्ये त्या सिंगापूरच्या संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या. 

२०१७ मध्ये त्यांनी पीपल्स ॲक्शन पार्टी सोडली आणि राष्ट्रपती पदासाठी अपक्ष निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत विजय झालेल्या हलिम्मा याकोब सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. 

१०) त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या विरोधी पक्ष नेत्या कमला प्रसाद बिसेसर या सुद्धा भारतीय वंशाच्या आहेत. 

कमला प्रसाद बिसेसर यांनी १९८७ मध्ये त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या राजकारणात प्रवेश केला होता. १९९५ मध्ये खासदार म्हणून निवडून गेलेल्या कमला यांनी देशाचे प्रमुख पद भूषवले आहेत. १९९९-०१ दरम्यान त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलं होतं. २ वेळ देशाच्या ऍटर्नी जनरल तर २०१०-१५ या काळात देशाच्या पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी कारभार सांभाळला आहे. तर सध्या त्या देशाच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत. 

या नेत्यांसोबतच जगभरातील १५ हुन अधिक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर काम करत आहेत. पण एकेकाळी भारतावर करणाऱ्या ब्रिटनचे पंतप्रधानपद भारतीय व्यक्तीच्या हातात येणे ही फार महत्वपूर्ण घटना आहे.  

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.