थरूर तर सुटले पण सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो…

‘सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाशी शशी थरूर यांचा संबंध नाही’

असं म्हणत काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यावरील आरोप रद्द न्यायालयाने करत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या विशेष CBI न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे थरूर यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र या निकालामुळे सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

१७ जानेवारी २०१४. दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या ३४५ नंबरची खोली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर या खोलीत मृतावस्थेत आढळल्या. संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. अनेक आरोपप्रत्यारोप होऊ लागले. या मृत्यू मागे पाकिस्तानी कनेक्शन आहे असंही बोललं गेलं.

मात्र पुष्कर यांच्या मृत्यूआधी त्यांच्याबाबतीत अनेक संशयास्पद प्रकार घडले होते. 

यात पुष्कर यांनी मृत्यूच्या आठवडाभर आधी पती शशी थरूर यांना ई-मेल केला होता. ‘आपला जगण्यातील रस संपला आहे. मृत्यू यावा अशीच माझीच प्रार्थना आहे’ असं या मेल मध्ये म्हंटलं होतं. त्यानंतर पत्नी डिप्रेशनमध्ये असताना पती म्हणून शशी थरुर यांनी काहीच केलं नाही. सुनंदा यांच्या मृत्यूच्या काही काळ आधी थरुर यांनी पत्नीचे फोन देखील कट केले किंवा उचलले नाहीत, असं पोलिसांनी आपल्या अहवालात सांगितलं होतं.

शशी थरूर यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते?

पुष्कर यांनी त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीच शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप सोशल मीडियावरुन केला होता. त्यानंतर अवघ्या २ दिवसांमध्येच म्हणजे १७ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

सुनंदा पुष्कर यांची मैत्रीण ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंह यांनी देखील निवेदनात म्हटले होते की,

थरूर हे मेहर तरार नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सुनंदा यांनी त्यांना सांगितले होते की, थरूर आणि मेहर जून २०१३ मध्ये दुबईच्या एका हॉटेलमध्ये ३ रात्री एकत्र राहिले होते. एका दिवशी सुनंदाने नलिनीला फोन केला, तेव्हा ती खूप दुःखी होती. थरूर आणि मेहेर यांच्यांमध्ये मॅसेजमधून संभाषण होते. एका मॅसेजमध्ये असेही लिहिले होते की, शशी थरूर निवडणुकीनंतर सुनंदाला घटस्फोट देण्याची तयारी करत होते.

पुष्कर यांच्या शवविच्छेदन अहवालात काय उघड झाले?

  • सुनंदा यांच्या शरीरात दारूचे कोणतेही ट्रेस सापडले नाहीत.
  • सुनंदा यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर १० पेक्षा जास्त जखमा होत्या. मात्र, त्याला प्राणघातक म्हटले जाऊ शकत नाही.
  • अहवालानुसार सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता.
  • सुनंदा यांचा मृत्यू संध्याकाळी ४ ते ७ च्या दरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

सुनंदा पुष्कर डिप्रेशनमध्ये होत्या?

पोलिसांना तपासावेळी सुनंदा यांच्या खोलीतून डिप्रेशनचे औषध अल्प्राझोलम (अल्प्रॅक्स) च्या दोन रिकाम्या स्ट्रिप्स सापडल्या होत्या. यामुळे सुनंदा यांच्या मृत्यूचे मुख्य कारण अल्प्राझोलमचा ओव्हरडोस असू शकतो, यात त्यांनी तब्बल २७ गोळ्या खाल्ल्या होत्या, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

तज्ज्ञांचे मते, अल्प्राझोलमचा अती सेवनाने मेंदूच्या कार्यावर परिणाम पडतो. बेशुद्ध होणे आणि मृत्यूची शक्यता असते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पोस्टमार्टम अहवालात म्हंटले आहे की सुनंदा यांचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे झाला नाही. उलट जादा डोस जाणीवपूर्वक दिला गेला.

अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु

मृतदेह सापडल्याच्या बरोबर एका वर्षानंतर म्हणजे १ जानेवारी २०१५ रोजी तापसानंतर पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. पुढे सखोल तपासानंतर जुलै २०१८ रोजी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात तब्बल ३ हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या आरोपपत्रात पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांचे पती आणि खासदार शशी थरूर यांच्या नावाचा आरोपीमध्ये समावेश केला होता. थरूर यांच्यावर भारतीय दंड संहिता 498A (पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून महिलेवर क्रूरता) आणि 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

थरूर यांची निर्दोष मुक्तता

मात्र जवळपास ७ वर्षानंतर निकाल आल्यानंतर न्यायालयाने शशी थरूर यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी निकाल देताना हे प्रकरण रद्द केले. न्यायालयाने १२ एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. या निकाला नंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि म्हणाले की मी गेल्या ७ वर्षांपासून वेदना आणि छळ सहन करत होतो.

मात्र आता थरूर जर या प्रकरणात निर्दोष असतील तर सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न कायम राहतो. सोबतच ७ वर्षानंतर देखील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचता न आल्याने सध्या पोलिसांच्या तपासावर देखील शंका व्यक्त करण्यात येत आहे. आता पोलिस पुढे या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारापर्यंत नेमकं कधी पोहोचणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.