दत्तसाब यांच्या सारखा बाप होता म्हणून संजू ड्रगच्या विळख्यातून बाहेर पडू शकला..
संजुबाबाने आयुष्यात अनेक धक्के पचवले आहेत. पण कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक माणुस म्हणजे त्याचे वडील सुनील दत्त.
सुनील दत्त आणि नर्गिसचा हा मुलगा लहानपणापासुन लाडाकोडात वाढलेला. अतिलाडाने मुलं बिघडतात. संजय दत्तच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. वडील सुनील दत्त आणि आई नर्गीस दोघेही सिनेसृष्टीतले मातब्बर कलाकार. त्यामुळे संजयला मनोरंजन सृष्टीच्या झगमगाटाचं लहानपणापासुन आकर्षण. या धुंदीत तो इतका हरवला की त्याला वाईट सवयी लागल्या.
संजुबाबा ८-१० वर्षांचा असावा.
काश्मिरला एका सिनेमाच्या शुटींगदरम्यान त्याने वडीलांना सिगरेट पिताना बघितलं.
‘बाबा सिगरेट पितात मग मी का नाही?’
असा प्रश्न त्याने आईला विचारला. यावर नर्गिसजींचा मार संजयला खावा लागला.
लहानग्या संजयची हि गोष्ट सुनीलजींना कळाली. त्यांनी संजयला जवळ बोलावलं आणि त्याच्या हातात सिगरेट दिली. यामागचा उद्देश असा असावा की, पहिल्यांदा सिगरेट पिताना संजुला ठसका लागुन तो पुढे सिगरेटला हात लावणार नाही.
पण झालं मात्र उलटंच !
दत्त साबने संजयला सिगरेट दिली. संजयने दोन-तीन झुरक्यात सर्व सिगरेट संपवली. दत्त साबला धक्का बसला. त्यांनी संजयला शिक्षा म्हणुन उन्हात उभं केलं.
पुढे संजय नशेच्या आहारी जो आकंठ बुडाला त्याची सुरुवात इथुन झाली.
सिनेइंडस्ट्रीतली अनेक माणसं सुनील दत्त आणि नर्गिस यांना भेटायला यायचे. दोघांसाठीही सिनेमाच्या ऑफर घेऊन येणारे बडे निर्मातेच जास्त असायचे. हे निर्माते सिगरेटचे झुरके घेत दत्त साबशी गप्पा मारायचे. घराबाहेर जो व्हरांडा असतो तिथे हि मंडळी सिगरेट पिऊन फेकायचे. संजुबाबाला लहानपणापासुनच सिगरेटविषयी आसक्ती.
तो उरलेली सिगरेट पुन्हा पेटवुन बाबांचं लक्ष जाऊन नये म्हणुन तिथेच झोपुन दम मारायचा.
एकदा दत्त साब एका निर्मात्याशी बोलत असताना त्यांना व्हरांड्याच्या दिशेने धुर येताना दिसला. हा धुर कोठुन येतोय? असा त्यांना प्रश्न पडला. ते तिथे गेले असता संजु झोपुन सिगरेट ओढत असल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांनी संजुला पकडलं.
मुलाच्या या वर्तनाने दत्त साब व्यथित झाले. त्यांनी नर्गीसच्या परवानगीने संजुची लगेच हिमाचल प्रदेशातील सनावर बोर्डींग स्कुलमध्ये रवानगी केली.
आई-वडिलांपासुन दूर असलेला १० वर्षांचा संजु बोर्डींग स्कुलमध्ये शिकत होता.
जेव्हा संजु शिकुन ११ वर्षांनी परत आला तेव्हा सुनील दत्त यांनी संजुला घेऊन ‘राॅकी’ सिनेमा बनवायची तयारी केली.
या सिनेमाच्या वेळेसच संजुला अनेक वाईट गोष्टींचं व्यसन लागलं होतं. ‘राॅकी’ सिनेमाचा जेव्हा प्रिमियर होता त्याआधीच नर्गीसजी यांचं निधन झालं. आईवर जीवापाड प्रेम करत असलेल्या संजुला हे दुःख सहन झालं नाही. त्याने अधिक तीव्र प्रमाणात व्यसनांना जवळ केलं. इंजेक्शन, LSD, सिगरेट अशी नको नको ती व्यसनं संजुने करु लागला.
त्याला ‘राॅकी’ नंतर अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. त्याने काही सिनेमांमध्ये कामही केलं. परंतु सीनदरम्यान अभिनयापेक्षा इतर गोष्टींमध्ये संजु बेधुंद झाला होता.
याला मुख्य कारण संजुला वाईट मित्रांची संगत लागली होती.
संजु संपूर्णतः नशेत बुडाल्याचा एक किस्सा असा आहे. ‘राॅकी’ सिनेमाची संपुर्ण टीम नियोजन करत होती. दत्त साब स्वतः टीमसोबत मिटींगरुममध्ये हजर होते. सिनेमाचा हिरो संजु मात्र आला नव्हता. संजु कुठेतरी LSD मारुन वेगळ्याच धुंदीत होता.
त्याला दत्त साबने फोन करुन मिटींगला बोलावलं. संजु गाडीतुन मिटींगला जात असताना
‘मी ठीक आहे, मला काही झालं नाहीय.’
असं स्वतःला वारंवार सांगत होता. संजु दत्त साबसमोर मिटींगला बसला. दत्त साब संजुला ‘राॅकी’ विषयी सांगत होते. आणि अचानक LSD च्या नशेत संजुला भास होऊ लागले की वडीलांच्या डोक्यावर आग लागलीय. काही वेळानंतर वडिलांचा चेहरा मेणासारखा वितळतोय, असं संजुला दिसायला लागलं.
संजुने वडीलांना वाचवण्याच्या हेतुने त्याच नशेत दत्त साबच्या दिशेने उडी मारली.
दत्त साबला संजु असा का वागतोय काहीच कळत नव्हतं. यानंतर काही दिवसांनी सुनील दत्त यांनी संजुला अमेरिकेतील व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठवलं.
सुनील दत्त यांचं संजुवर मनापासुन प्रेम होतं. मुलाचं बरं व्हावं आणि तो व्यसनाच्या विळख्यातुन सुटावा, असं त्यांना मनोमन वाटायचं. अमेरिकेतुन उपचार घेऊन संजु परत आला आणि यानंतर मात्र संजुची सिनेक्षेत्रातील घसरलेली गाडी हळूहळू रुळावर आली.
परंतु संजुमागील संकटं संपत नव्हती. १९९३ ला झालेल्या मुंबई बाॅम्बस्फोटामधील गुन्हेगार म्हणुन संजुबाबाला अटक झाली.
‘माझा मुलगा चुकला जरुर असेल परंतु तो आतंकवादी नाही’,
अशी दत्त साबची ठाम भुमिका होती. या कठीण काळातही संजुच्या पाठीशी ते वडील म्हणुन ठाम उभे राहिले.
या दोघा पिता-पुत्रांचं एकमेकांवर किती प्रेम होतं हे ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ सिनेमाच्या शूटींगच्या वेळेस सर्वांनाच अनुभवायला मिळालं. दत्त साब जवळपास १६ वर्षांनंतर सिनेमात काम करणार होते. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या सीनची तयारी झाली.
जिथे मुन्ना वडीलांना ‘जादू की झप्पी’ देतो. संजुने सीनप्रमाणे दत्त साबना कडकडुन मिठी मारली. सीन कट झाला. परंतु हे दोघेही एकमेकांच्या मिठीत ढसाढसा रडत होते. गेल्या अनेक वर्षात खुपकाही या दोघांनी अनुभवलं होतं. अनेक संकटं झेलली होती. या सगळ्याचा निचरा ‘जादू की झप्पी’ मध्ये झाला.
‘मुन्नाभाई’ नंतर संजुच्या करियरला सुद्धा कलाटणी मिळाली.
व्यसनामध्ये वाया गेलेल्या मुलाला सरळमार्गाने वाटचाल करायला मदत करणारे सुनील दत्त सारखे वडील संजुच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. अन्यथा आजही संजुबाबा व्यसनाधीन होऊन सिनेसृष्टीत हेलकावे खात राहिला असता.
हे ही वाच भिडू.
- संजय दत्तला चंबळच्या खऱ्याखुऱ्या डाकुंनी किडनॅप केलं होतं?
- नर्गिसची आठवण म्हणून सुनील दत्त यांनी बार्शीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारले.
- तो किस्सा ज्यामुळे संजय दत्त निवडणूक लढवायला घाबरतो.