म्हणुन सुनील दत्त यांच्या या सिनेमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये नोंद आहे…

रोजच्याच कामात काहीतरी वेगळं करता येईल का ? याचा सततचा ध्यास हाडाच्या कलाकाराला असतो. लोकांना आवडेल की नाही, हा पुढचा मुद्दा झाला. परंतु स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट एखादा कलाकार करत असतो.

ती कलाकृती पूर्ण झाल्यानंतर मिळणारं समाधान त्या कलाकारासाठी शब्दात मांडता न येणारं असतं. रंगीत सिनेमांच्या प्रवाहात ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवण्याचं एक वेगळं धाडस अभिनेते सुनील दत्त यांनी केलं.

इतकंच नव्हे तर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच सिनेमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये नोंद झाली. इतकं या सिनेमात खास काय होतं???

१९६४ साल.

सुनील दत्त यांनी एक प्रतिभावंत आणि यशस्वी अभिनेता म्हणुन भारतीय सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. याच वर्षी त्यांनी ‘यादे’ हा त्यांचा पहिलावहिला सिनेमा दिग्दर्शित करायला सुरुवात केली. या सिनेमात प्रमुख भुमिकेत सुद्धा सुनील दत्त होते. हा सिनेमा जेव्हा बनवुन पूर्ण झाला, तेव्हा हिंदी सिनेजगताच्या इतिहासातील एक प्रयोगशील सिनेमा म्हणुन ‘यादे’ सिनेमाची दखल घेण्यात आली. आता तुम्ही म्हणाल, अभिनय आणि दिग्दर्शन करण्यात कोणती विशेष गोष्ट आहे, खुप जणांनी आजवर असं केलंय. 

भिडूंनो, हा सिनेमा विशेष अशासाठी आहे की…

जवळपास २ तासांच्या असलेल्या ‘यादे’ सिनेमात सुनील दत्त हे एकमेव कलाकार आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणीही या सिनेमात नाही. १ तास ५३ मिनीटं लांबीच्या या सिनेमात सुनील दत्त यांच्या अभिनयाचा जबरदस्त आविष्कार पाहायला मिळतो. यामुळे ‘यादे’ सिनेमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये नोंद झाली. 

‘नटसम्राट’ सारख्या नाटकात लांबलचक स्वगतं पाहायला मिळतात. उदा. ‘नटसम्राट’ नाटकात ‘कोणी घर देता का घर?’ किंवा ‘टू बी ऑर नाॅट टू बी दॅट इस द क्वेश्चन’ यांसारखी जी स्वगतं आहेत. तशी स्वगतं ‘यादे’ या सिनेमात पाहायला मिळतात.

यामुळे सुनील दत्त यांनी प्रथमच हिंदी सिनेइंडस्ट्रीत ‘स्वगतं’ म्हणजेच ‘मोनोलाॅग’ या संकल्पनेची ओळख करुन दिली. 

तो काळ असा होता की, ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमांचा जमाना मागे सरुन रंगीत सिनेमांचा काळ सुरु झाला होता. प्रेक्षकांना रंगीतपटांचं आकर्षण होतं. या काळात पुन्हा एकदा सुनील दत्त यांनी ‘यादे’ सारखा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवुन सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.

सिनेमा असा करण्यामागे सुनील दत्त यांच्या मनात निश्चितच एक वेगळी संकल्पना होती. एक घर, घराचं किचन, त्या घराचं बेडरुम, बाथरुम इत्यादी गोष्टींभोवती वावरणारे सुनील दत्त, इतकंच या सिनेमाचं थोडक्यात वर्णन करता येईल. 

‘यादे’ सिनेमात सुनील दत्त यांच्या भुमिकेचं नाव अनिल असतं.

अनिलचं एक पत्नी आणि दोन मुलं असणारं चौकोनी कुटूंब. एके दिवशी अनिल कामावरुन घरी येतो तेव्हा घरात त्याची बायको आणि मुलं त्याला दिसत नाहीत. यानंतर अनिल स्वतःशीच बोलतो, त्याला राग येतो , तो मोठ्याने किंचाळतो, रडतो, काही गोष्टींची तोडफोड करतो. सुनील दत्त यांनी या भावना अधिक प्रभावी करण्यासाठी संगीत, साऊंड इफेक्टस, आवाज, कार्टून्स, सावली इत्यादी गोष्टींचा सुंदर उपयोग केला आहे.

उदा. एका प्रसंगात सुनील दत्त यांनी विशिष्ट व्यक्तीला दर्शवण्यासाठी पांढ-या पडद्यामागे त्या व्यक्तीच्या आकृतीचा वापर केला आहे. भिडूंनो, विचार करा, त्याकाळच्या दृष्टीने ‘यादे’ हा किती कलात्मक सिनेमा असेल. 

व्ययक्तिक आयुष्यात घडलेल्या एका घटनेतुन सुनील दत्त यांना ‘यादे’ सिनेमा बनवण्याची प्रेरणा मिळाली. झालं असं की, सुनील दत्त यांची पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस मुलं संजय आणि नम्रताला घेऊन बाहेरगावी सुट्टीसाठी गेली होती. एके संध्याकाळी सुनील दत्त जेव्हा घरी आले तेव्हा पत्नी-मुलं घरात नसल्याने इतकं मोठं घर त्यांना सुनं वाटलं.

जणु काही घराचं घरपण उरलं नसल्याचा एक वेगळा अनुभव त्यांना मिळाला. या अनुभवातुन त्यांना ‘यादे’ सिनेमा बनवण्याची प्रेरणा मिळाली. 

कलात्मक दृष्टीकोनातुन पाहिलं तर ‘यादे’ हा सिनेमा काळाच्या पुढचा सिनेमा आहे. नाटकात असे एकपात्री प्रयोग पाहायला मिळतात, परंतु सिनेमा माध्यमात असं होणं, ही केवळ दुर्मिळ गोष्ट. अभिनेता म्हणुन नाव कमावलेल्या सुनील दत्त यांनी हा सिनेमा बनवुन नकळत स्वतःमधल्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाची ओळख संपुर्ण जगाला दाखवुन दिली. सिनेमांमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी सुनील दत्त यांनी इतरांना प्रोत्साहन दिले. 

भारतीय प्रेक्षकांनी या सिनेमाला इतका प्रतिसाद दिला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘यादे’ नावाजला गेला.

बर्लिन फिल्म फेस्टिव्हल मध्ये ‘यादे’ दाखवण्यात आला. १९६७ सालच्या फ्रँकफर्ट सिनेमहोत्सवात सिनेमाला गौरवण्यात आलं. फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ‘यादे’चा सन्मान करण्यात आला. संपूर्ण सिनेमात सुनील दत्त हे एकच कलाकार झळकत असल्याने, गिनीज बुकात या सिनेमाची नोंद करण्यात आली. 

सुनील दत्त एक माणुस आणि कलाकार म्हणुन खरंच ग्रेट होते. असं म्हणतात, कलाकार नेहमी आतुन असमाधानी असतो. या भावनेतुनच सतत नवं आणि चांगलं करण्यासाठी तो स्वतःच स्वतःला प्रोत्साहन देत असतो.

सुनील दत्त हा असाच एक कलाकार म्हणाला लागेल. ‘यादे’ सारख्या कलात्मक प्रयोगाची निर्मिती करण्याचं धाडस हे त्यांच्यापाशीच होतं. सुनील दत्त यांना सलाम!

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.