संजय दत्तचं नाव आई वडिलांनी नाही, चाहत्यांच्या पत्रांवरुन ठरलंय

पन्नास च्या दशकात राज कपूर आणि नर्गिस ही प्रचंड लोकप्रिय अशी रुपेरी पडद्यावरील जोडी होती. या दोघांनी तब्बल १६ चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोघांच्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन ची चर्चा त्या काळातील मिडीयात जबरदस्त चालू असायची.

नर्गिस ची खूप इच्छा होती राजकपूर सोबत लग्न करण्याची. 

पण राज कपूर विवाहित असल्यामुळे ते शक्य झाले नाही. १९५६ साली आलेल्या ‘चोरी चोरी’ या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र काम करणे देखील थांबवली. राजकपूर ची साथ सुटल्यानंतर नर्गिसने आपल्या एक्टिंग करिअरला सिरीयसली घ्यायला सुरुवात केली.

मेहबूब यांनी १९५७ साली ‘मदर इंडिया’ या महान चित्रपटातून नर्गिसला अभिनयाची संधी दिली. नर्गिसचा संपूर्ण सिने आयुष्यातील तो सर्वोत्कृष्ट रोल ठरला. या सिनेमातील तिची फुल लेन्थ भूमिका जगभर गाजली.

 

मदर इंडिया चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानच एका आगीच्या दुर्घटनेतून सुनील दत्त आणि नर्गिस जवळ आले. वस्तुतः ‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुनील दत्त ने नर्गीसच्या मुलाची भूमिका केली होती. परंतु आगीच्या दुर्घटनेतून नर्गिसला सही सलामत बाहेर काढणारा सुनील दत्त तिच्या आयुष्यातील रियल हिरो झाला.

‘मदर इंडिया ; चित्रपट २५ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रदर्शित झाला. दोघांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ११ मार्च १९५८ रोजी लग्न केले. पन्नास च्या दशकातील सर्वात चर्चित असा हा विवाह होता. लग्न झाल्यानंतर नर्गीस ने आपला भूतकाळ पुसून टाकला.  राजकपूर हे नाव तिने डिलीट करताना तिने कुठेही कटूता ठेवली नाही. तिच्या मृत्युपर्यंत राज-नर्गीसच्या प्रेमकहाणीच्या किस्स्यांनी ती विचलीत झाली नाही. सुनील दत्तच्या मागे ती हिमालयासारखी उभी राहीली. 

 

नर्गिस ने सुनील दत्त यांना खंबीर साथ दिली. सुनील दत्तचे करिअर घडवण्यात नर्गिसचा मोठा वाटा होता. साठच्या दशकात सुनील दत्त यांनी आपली स्वत:ची चित्र निर्मिती संस्था अजंठा आर्ट्स सुरु केली. त्या पाठीमागे नर्गिस चा मोठा सहभाग होता. 

 

’यादे’ हा जगातील पहिला एकपात्री सिनेमा निर्माण करण्याची कल्पना नर्गिसची होती.

 

या जोडीला २९ जुलै १९५९ रोजी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. दोन्ही कुटुंबांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले. सामान्य कुटुंबीयां प्रमाणे आपल्या या मुलाचे नाव काय ठेवावे यावर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. पण एकमत काही होत नव्हतं. त्यावेळी सुनील दत्त यांनी विचार केला आपण भारतीय रसिकांचा कौल मागूया, त्यांच्याकडूनच आपण आपल्या मुलाचे नाव सुचवून घेऊया! 

 

‘शमा’ या उर्दू मासिकाचे संपादक युसुफ देहेलवी सुनील दत्त यांचे चांगले मित्र होते. त्या वेळी या मासिकाचा खप देखील प्रचंड होता. हा विषय दत्त सुनील दत्त यांनी त्यांच्यासोबत शेअर केला. संपादकांना ही आयडिया खूप आवडली. त्यांनी लगेच त्यांच्या पुढच्या अंकात ‘सुनील दत्त – नर्गिस च्या पुत्राचे नाव सुचवा आणि आकर्षक बक्षीस मिळवा’ अशी जाहिरात दिली. त्या काळात ‘शमा’ या मासिकाचा वाचक वर्ग प्रचंड होता.

संपूर्ण भारतातून तब्बल १८००० पत्रे ‘शमा’ मासिकाच्या कार्यालयात येऊन पडली. 

त्याचे वर्गीकरण करण्यासाठी युसुफ देहेलवी यांना वेगळ्या स्टाफ ची नियुक्ती करावी लागली. नावानुसार पत्रांचे वर्गीकरण केले. बहुतेक पत्रकर्त्यांनी अनिल हे नाव सुचवले होते. शेवटी युसुफ देहेलवी यांनी वीस नावे शॉर्टलिस्ट करून नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या कडे पाठवली. त्यातून नर्गिसला जे नाव आवडले ते नाव फायनल करण्यात आले.

ते नाव होते ‘संजय’! अशाप्रकारे आपल्या संजूबाबाचे बारसे लोकांनी निवडलेल्या नावामधून झाले होते.

संजय हे नाव हजारो लोकांनी कळवले होते. मग बक्षीस नेमकं कुणाला द्यायचे? मग पुन्हा या सर्व नावांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातून एक चिठ्ठी उचलण्यात आली. आणि पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आग्रा येथील पुष्पा अग्रवाल! त्यांना सुनील दत्त आणि नर्गिस यांचा बाळासोबत चा दोघांच्या ऑटोग्राफ असलेला फोटो भेट म्हणून पाठवण्यात आला!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.