सासुरवाडीवरून ओरडा पडल्यावर सुनील गावस्करांनी मॅल्कम मार्शलची धुलाई केली होती…

सुनील गावस्कर यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये हेल्मेट न घालता खेळून दाखवलं होतं तेही फास्टर बॉलिंगविरुद्ध. त्याकाळात गावस्करांचं हे पाऊल धाडसी मानलं गेलं होतं. पण अशाच फास्टर बॉलर आणि सुनील गावस्कर या खेळाडूंमुळे टेस्ट क्रिकेटची रंगत वाढली होती.

असाच एक किस्सा ज्यात सुनील गावस्करांना सासुरवाडीवरून ओरडा पडला आणि त्याचा बदला त्यांनी कसा घेतला.

ज्यावेळी विना हेल्मेट गावस्कर खेळायचे तो काळ खतरनाक फास्टर बॉलर लोकांचा होता, त्यात  मॅल्कम मार्शल (Malcolm Marshall), माइकल होल्डिंग, एंडी रॉबर्ड्स, डेनिस लिली, इमरान खान, सरफराज नवाज अशा दिग्गज गोलंदाजांचा समावेश होता. पण यापैकी सगळ्यात टफ फाईट झाली ती मॅल्कम मार्शल आणि सुनील गावस्कर यांच्यात.

मॅल्कम मार्शल हा त्याकाळातला सगळ्यात जास्त हुशार बॉलर मानला जायचा. जुन्या काळातल्या जाणत्या क्रिकेट रसिकांना मॅल्कम मार्शल काय चीज होता हे चांगलंच ठाऊक असेल.

मार्शलच्या बॉलिंगचा वेग बघून बॅट्समन आधीच डगमगून जायचा आणि आऊट व्हायचा.

बऱ्याच वेळा मॅल्कम मार्शलने गावस्करांना आपल्या बॉलिंगने त्रास दिला पण गावस्कर मात्र एका मॅचमध्ये मार्शलला भारी पडले होते.

ऑक्टोबर १९८३ ची गोष्ट. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. क्लाइव्ह लॉयड वेस्ट इंडिजचे कॅप्टन होते तर भारताचे कॅप्टन कपिल देव होते. ६ टेस्ट मॅचेसचं आयोजन करण्यात आलं होतं पैकी पहिली टेस्ट हि कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवण्यात आली.

कानपूर हि सुनील गावस्करांची सासुरवाडी होती. सासुरवाडीत मॅच असल्या कारणाने गावस्करानी काहीतरी खतरनाक बॅटिंग करून लोकांची मनं जिंकणं गरजेचं बनलं होतं. 

या मॅचमध्ये मॅल्कम मार्शलच्या बॉलिंगवर शॉर्ट बॉलवर गावस्करांच्या हातून बॅट सुटली. आज या घटनेबद्दल काही विशेष वाटणार नाही पण त्यावेळी बऱ्याच ठिकाणी या प्रकरणाची चर्चा झाली कि सुनील गावस्कर मॅल्कम मार्शलच्या बॉलिंगला घाबरले वैगरे. यामुळे मॅचमध्ये अजूनच रंगत वाढली.

पण या मॅचमध्ये गावस्कर सपशेल सुपरफ्लॉप ठरले. पहिल्या इनिंगमध्ये गावस्कर भोपळाही न फोडता परतले. दुसऱ्या इनिंगमध्येही फक्त सातच धावा गावस्करांना करता आल्या. दोन्ही इनिंगमध्ये गावस्करांना मॅल्कम मार्शलनेच आउट केलं होतं.

भारतीय संघ ती मॅच ८३ धावांनी पराभूत झाला. भारत हारला याबद्दल जास्त चर्चा न होता चर्चा झाली ती सुनील गावस्करांना सासुरवाडीकडून पडलेल्या ओरड्याची. 

सासुरवाडीत मॅच असूनही गावस्कर विशेष खेळी करू शकले नाही यामुळे त्यांना चांगलाच ओरडा पडला पण याचा बदला घेण्याचा गावस्करानी निर्धार केला होता. पुढची मॅच हि फिरोजशहा कोटला मैदानावर होती. 

यासाठी तयारी म्हणून गावस्करांनी कर्सन घावरी यांना नेट प्रॅक्टिस साठी बोलावून घेतलं होतं. या सरावात कर्सन घावरीच्या शॉट बॉलवर सुनील गावस्करांनी मजबूत सराव केला. गावस्करांनी या घटनेबाबत नकार दिला होता पण ज्या ज्या लोकांनी नेट प्रॅक्टिस मध्ये बॉलिंग केली त्या सगळ्यांना शॉर्ट बॉल फेकायला गावस्करानी सांगितलं होतं.

२९ ऑक्टोबर ला दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरवात झाली. कपिल देव टॉस जिंकून बॅटिंगसाठी उत्सुक होते. गावस्कर आणि अंशुमन गायकवाड बॅटिंगला आले. त्यावेळचे फॅन्स हे कट्टर फॅन्स होते. सगळं स्टेडियम फक्त गावस्कर आणि मॅल्कम मार्शल यांची जुगलबंदी बघण्यासाठी आलं होतं. मागची मॅच वेगळी होती हि मॅच वेगळी सांगत गावस्करांनी दोन शॉर्ट बॉलवर मॅल्कम मार्शलला एक सिक्स आणि एक चौकार लगावला.

या मॅचमध्ये गावस्करानी ३७ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि सगळ्या ग्राऊंडने टाळ्यांचा कडकडाट केला. ८० च्या दशकात फक्त ९४ बॉलमध्ये गावस्करांनी शतक झळकावून मॅल्कम मार्शल विरुद्ध ठामपणे उभं राहत फटकेबाजी केली होती.

हा बदला  तेव्हा लोकांमध्ये असा फेमस झाला कि सासुरवाडीचा ओरडा गावस्करांच्या जिव्हारी लागला आणि त्यातून त्यांनी मॅल्कम मार्शलचा बदला घेतला.

मात्र गावस्कर आणि मॅल्कम मार्शल हे दोन दिग्गज त्याकाळात एकत्र खेळताना पाहणं हि त्यावेळी प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.