गावस्कर खेळत होते आणि एक प्रेक्षक मैदानात येऊन त्यांना थेट शिव्या घालू लागला..

सुनील गावस्कर यांचा एक सुवर्णकाळ होता. त्यांनी शतक झळकावल्यावर सगळ्या बातम्यांमध्ये त्यांचा उल्लेख असायचा. ज्यावेळी भारतीय संघाची बॅटिंग कमकुवत मानली जायची त्यावेळी सुनील गावस्कर यांनी संघात येऊन आपल्या बॅटिंगने सगळ्या विरोधकांचे तोंडं बंद केले होते. पण सुनील गावस्करांना त्यांच्या एका बॅटिंगवरून बऱ्याच शिव्या पडलेल्या त्याबद्दलचा हा किस्सा.

१९७५ साली वनडे विश्वचषक खेळायला सुरवात झाली होती. त्यावेळी ६० ओव्हरच्या मॅचेस होत्या. वर्ल्डकपचा पहिलाच सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्यात होता. या मॅचमध्ये सुनील गावस्कर यांनी जी बॅटिंग केली ती आजवरची सगळ्यात विवादास्पद मॅच ठरली होती.

७ जून १९७५ साली हि मॅच क्रिकेटचा मक्का म्हणून प्रसिद्ध असलेल्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला गेला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित ६० षटकांत ४ विकेट गमावून ३३४ धावांचा डोंगर उभा केला. हा त्यावेळचा आजवरचा सगळ्यात मोठा स्कोर मानला गेला होता. इंग्लंडच्या संघाकडून डेनिस अमिस १३७, केथ फ्लेचर ६८ आणि ख्रिस ओल्ड याने केवळ ३० चेंडूत ५१ धावा तडकावल्या.

इतकी मोठी धावसंख्या बघून लोकांनी आधीच भारताचा पराभव मेनी केला होता. पण रनरेटच्या आधारावर पुढे चांगला रनरेट असेल तर सेमीफायनल खेळता येईल त्यामुळे भारताने कमी विकेट गमावता सामना जिंकणं गरजेचं होत.

सलामीवीर म्हणून ओपनिंगला आलेले सुनील गावस्कर मात्र त्या दिवशी आपल्याच धुंदीत होते. वनडे सामन्याची सुरवात त्यांनी टेस्ट सारखं खेळून केली. सुनील गावस्करांची इतकी हळू बॅटिंग बघून प्रेक्षक वैतागू लागले, शिव्या घालू लागले. प्रेक्षकांच्या संयमाचा बांध तुटला आणि एक प्रेक्षक पळत पळत मैदानात येऊन सुनील गावस्करांना थेट भिडला आणि शिव्या घालू लागला कि तू इतकं स्लो जाणूनबुजून का खेळतो आहेस ?

गावस्करांची हि बॅटिंग बघून संघातले खेळाडू नाराज झालेले दिसत होते. गावस्करांनी या सामन्यात १७४ चेंडू खेळले आणि आउट न होता फक्त ३६ धावा काढल्या. या धावांमध्ये केवळ एका चौकाराचा समावेश होता. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावून केवळ १३२ धावा केल्या. २०२ धावांच्या इतक्या मोठ्या फरकाने भारताचा दारुण पराभव झाला.

इतक्या मोठ्या धावसंख्येने पराभूत होण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड बनला जो पुढचे २७ वर्ष तसाच होता. गावस्करांच्या इतक्या संथ खेळीचं नक्की कारण काय होतं यावर चर्चा झडू लागल्या. त्यावेळचे भारतीय संघाचे मॅनेजर जी.एस. रामचंद यांनी या खेळीविषयी प्रतिक्रिया देताना सांगितलं कि,

आजपर्यंत मी जितक्या मॅचेस बघितल्या त्यातली हि सुनील गावस्करची इनिंग हि सगळ्यात शरमेची बाब होती. देशाची प्रतिष्ठा पणाला लावून न खेळता स्वतःच्या स्वार्थासाठी सुनील गावस्करानी हा सामना हाताने गमावला.

बऱ्याच लोकांनी अशी टीका केली होती कि एका सामन्यात इंग्लंडने भारताला ४२ धावांवर ऑलआउट केलं होत आणि तिथून पुढे भारताची अशी धारणा झाली कि ते इंग्लंडच्या संघाविरुद्ध कधीच जिंकू शकत नाही. सुनील गावस्करानी ऑलआउट होण्यापासून संघाला वाचवलं होतं.

या सामन्यानंतर सुनील गावस्करांना लोकांनी चांगलंच धारेवर धरलं, या खेळीमागचा काय विचार होता विचारलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं कि,

पीच बॅटिंगसाठी अनुकूल नव्हतं, आणि मी फॉर्ममध्ये नव्हतो. मी स्वतः बळच आउट होण्याचाही प्रयत्न केला होता पण त्याला यश आलं नाही त्यामुळे मला नाईलाजाने खेळावं लागलं.

पण दुसऱ्या बाजूने याही अफवा पसरत होत्या कि , वर्ल्डकपसाठी जो संघ निवडला गेला त्यामुळे गावस्कर नाराज होते. मागच्या वेळी वेगवान गोलंदाजांना संधी न देता फिरकीपटूंना संघात घेतलं गेलं आणि त्यामुळेच भारत पराभूत झाला, यामुळे गावस्कर खुश नव्हते.

अशा अनेक अफवा उठत राहिल्या. नंतर एका कार्यक्रमात या खेळीविषयी गावस्करांना विचारलं असता त्यांनी मान्य केलं कि ती खेळी माझ्या आयुष्यातली सगळ्या वाईट खेळी होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.