पोरांना संस्कारी बनवणारी गावच्या सरपंचाची अनोखी मोहीम, जिची चर्चा अख्ख्या जगात सुरुये

‘शिव्या’ अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. म्हणजे आपल्यातलेचं बरेच भिडू असतील ज्यांचा दिवस शिव्या दिल्याशिवाय अपूर्ण असेल. शिव्या देणं म्हणजे राग व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, असं सोज्वळ उत्तर सुद्धा त्यांच्याकडून मिळत. एवढंच नाही तर काही जण याला वैज्ञानिक आधार देत म्हणतात कि, शिव्या दिल्यानं मनातला राग हलका होतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचे चान्सेस कमी होतात म्हणे. असो… ह्या झाल्या स्वतःला सांत्वन देण्याच्या गोष्टी. 

पण भिडू हे सुद्धा तितकचं खरं आहे कि, या शिव्यापायी आजकालची पोर काय आणि पोरी काय बिघडायला लागलीत. त्यात आया बहिणींचा उद्धार जास्त केला जातो. आणि हेच सगळं आपल्या पुढच्या पिढीच्या कानावर पडतंय. आता काही दिवसांपूर्वीचं थेरगावच्या क्वीनच उदाहरण घ्या ना, फेमस होण्यासाठी मॅडमने शिव्यांचा आधार घेतला, पण फेमस होण्यापेक्षा त्यांची बदनामीच जास्त झाली. 

असो… आता शिव्यांचा विषय निघालाय कारण पंजाबच्या एका भिडूनं या शिव्यांवर खास करून आया बहिणीवर दिल्या जाणाऱ्या शिव्यांवर चाप बसवण्यासाठी एक मोहीम सुरु केलीये ती म्हणजे ‘गाली बंद घर’. जी आता थेट आंतरराष्ट्रीय विषय बनलीये. 

म्हणजे झालं काय,  काही दिवसांपूर्वीची गोष्ट एका ब्रिटिश वृत्तपत्राच्या पत्रकाराने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक प्रश्न विचारला, ज्यावर राष्ट्रपतींनी त्याला डायरेक्ट शिवीच घातली. राष्ट्रपतींना माहित नव्हतं म्हणे कि माईक चालू आहे.या गोष्टीवरून तिथल्या मीडियामध्ये बराच गोंधळ उडाला. इंटरनॅशनल मॅगझीन कॉस्मोपॉलिटिनने यावरून भारतातल्या एका गावचे सरपंच सुनील जागलान यांच्या ‘गाली बंद घर’ मोहिमेचं भरभरून कौतुक केलंय. ज्यामुळे त्यांची ही  मोहीम सध्या चर्चेचा विषय बनलीये.

तसं पाहिलं तर सुनील जागलान यांची ही शिव्या बंद करण्याची मोहीम कित्येक वर्षांपासून सुरु आहे. पण आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मोहिमेचे कौतुक केल्यामुळे ते सध्या लाईमलाईटमध्ये आलेत. सुनील हे पंजाबच्या हरियाणातील जिंद जिल्ह्यातील बीबीपुर गावचे रहिवासी आहेत. 

आजकाल साधं बोलताना सुद्धा शिवी देणं कॉमन झालंय, पण याचा परिणाम घरात सुद्धा पाहायला मिळतोय लहान लहान पोर सुद्धा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या शिव्या ऐकून तेच बोलायला शिकलीत. मग शाळेत जाऊन सुद्धा शिव्या देऊन दादागिरी करण्याचा वेगळाच ट्रेंड सुरु झालाय. पण हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून सुनील जागलान यांनी मोहीम हाती घेतलीये. 

सध्या त्यांची ‘गाली बंद घर’ मोहीम चर्चेत आहे. ज्याचा उद्देश महिलांचा उल्लेख करून दिल्या जाणाऱ्या शिव्यांना आळा घालणं आहे.  सुनील यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यात आधी घरातून ही सवय लागली पाहिजे. घरातील मोठ्या माणसांनी शिव्या देणं बंद करायला पाहिजे, आणि खासकरून लहान मुलांच्या समोर. जेणेकरून त्यांच्यावर तो परिणाम होणार नाही. कारण लहान मुलांवर घरातल्या वातावरणाचा सगळ्यात जास्त परिणाम होतो. त्यामुळे सगळ्यांनी मिळून यावर काम केलं पाहिजे.

भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ अन्वये या प्रकारच्या द्वेषपूर्ण भाषणासाठी तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो.

सुनील यांच्या म्हणण्यानुसार त्यांची ही मोहीम आतापर्यंत मेवात, पलवल, गुरुग्राम, जिंद, हिसार, कर्नाल, अंबाला, शाहबाद, सोनीपत, भिवानी आणि फतेहाबाद जिल्ह्यांपर्यंत पोहोचलीये. पण त्यांना ही  मोहीम संपूर्ण भारतात पोहोचवायची आहे ज्यासाठी ते वेबिनार करणार आहेत. 

सुनील जागलान यांनी ही एकचं नाही तर बऱ्याच मोहिमा हाती घेतल्यात. सुनील हे सेल्फी विथ डॉटर फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सेल्फी विथ डॉटर मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय आणि भारतीय मंचांवर अनेकदा कौतुक सुद्धा केलंय.

मुलींना सन्मान देण्यासाठी गाव असो की शहर, त्यांच्या नावाच्या पाट्या घराबाहेर लावण्याची मोहीमही सुनील जागलान  यांचेच योगदान आहे. सासू-मुली आणि सुना आजही त्यांच्या मासिक पाळीबद्दल बोलण्यास संकोच करतात, परंतु सुनील जागलान यांनी मासिक पाळीचा तक्ता घरांमध्ये लावण्याची मोहीम सुरू केली आहे. गोवा आणि नेपाळमध्ये ही मोहीम हाती घेतली जात आहे.

याचा फायदा असा की, पिरियड चार्ट पाहून कुटुंबातील पुरुष सदस्यांनाही त्यांच्या मुली, सून किंवा पत्नीच्या मासिक पाळीची तारीख काय आहे हे कळते, जेणेकरून त्या स्त्रियांना होणारा त्रास कमी करण्याची व्यवस्था करता येईल. मग पॅड आधीच घरात आणून ठेवणं असू.

सुनील जागलान यांच्या या सामाजिक मोहिमेशी बरीच गावे आणि शहरे जोडली  गेलीयेत. सुनील जागलान यांनी मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करण्याच्या मागणीसाठी सगळ्या हरियाणा लाडो पंचायतींचे आयोजन केले. जागलान यांनी अलीकडेच भारत सरकारच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य विनय सहस्रबुद्धे यांना एक अहवाल सादर केलाय, ज्यामध्ये त्यांनी एप्रिल २०२० पासून सुरू झालेल्या लाडो पंचायत मोहिमेद्वारे मुलींच्या लग्नाचे वय २१ करण्याविषयी पूर्ण आराखडा दिलाय.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.