अतिरेकी समजून सुनील शेट्टीवर अमेरिकन पोलिसांनी बंदूका रोखून धरल्या होत्या

अण्णा हे नाव घेतल्यावर इडली आणि मेदुवडा विकणारा, लुंगी नेसलेला अण्णा डोळ्यासमोर येतो. असाच एक बॉलिवुडमध्ये अण्णा आहे. त्याची सुद्धा हॉटेलं आहेत. पण या अण्णाला कलाकार म्हणून सुद्धा भारतीय सिनेसृष्टीत मान आहे.

सिनेमातला हा विद्रोही अण्णा म्हणजे आपला सुनिल शेट्टी.

सुनील शेट्टीने स्वतःच्या हटके स्टाईलने बॉलिवुडमध्ये अनेक सिनेमे गाजवले. कधी अण्णा ॲक्शन हीरो म्हणून झळकला तर कधी विनोदी सिनेमात सुद्धा अण्णाचा अफलातून अभिनय पाहता आला.

बऱ्याचदा सिनेमात एखादी भूमिका खलनायकी असेल तर त्या पद्धतीचे कपडे हिरोला घालावे लागतात.

एकदा असाच खलनायकी पोशाख परिधान केल्यामुळे अण्णाला थेट अमेरिकन पोलिसांनी तुरुंगात डांबलं होतं.

काय झालं होतं नेमकं ?

संजय गुप्ता दिग्दर्शित काॅंटे सिनेमा आठवतोय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाची स्टारकास्ट.

अमिताभ बच्चन, संजय दत्त, महेश मांजरेकर, सुनील शेट्टी, लकी आली असे कलाकार या सिनेमात झळकले. अभिनयाच्या बाबतीत सगळेच मातब्बर कलाकार. काॅंटे हा पहिला भारतीय सिनेमा आहे, ज्याचं संपूर्ण शूटींग अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झालं.

हॉलिवूडमध्ये Quentin Tarantino नावाचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. या दिग्दर्शकाचे सिनेमे हा सर्वांसाठी अभ्यासाचा विषय असतो. याच दिग्दर्शकाचा Reservoir Dogs हा सिनेमा प्रचंड गाजला होता.

संजय गुप्ता आणि मिलाप झवेरी यांनी Reservoir Dog या सिनेमावर आधारीत कांटेची पटकथा लिहिली.

विषयाला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी पण महत्वाची पार्श्वभूमी सांगितली पाहिजे ती अशी..

काॅंटे चं शूटिंग सुरू होण्याआधी ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यामुळे अमेरिकेत दहशत, घबराट आणि तणावपूर्ण वातावरण होतं. संपूर्ण अमेरिकेत रेड अलर्ट जारी केला होता.

या संपूर्ण वातावरणात आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊन काॅंटे सिनेमाचं शुटिंग सुरू होतं.

ज्या ठिकाणी कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती, त्या हॉटेलपासून शूटिंग लोकेशन खूप लांब होतं. त्यामुळे कलाकार हॉटेल मधून तयार होऊन एकत्र शूटिंग लोकेशन वर पोहचायचे. अण्णा अर्थात सुनील शेट्टी मात्र निघायच्या आधी साधारण एक तास जिम मध्ये व्यायाम करायचा.

अण्णाला फिटनेस बद्दल असलेलं वेड जगजाहीर आहे. म्हणून वयाची पन्नाशी ओलांडली तरीही अण्णा आज फिट अँड फाईन आहे.

एके दिवशी अण्णा जिमला जाण्यासाठी निघाला.

जिम हॉटेलपासून थोडी लांब होती. व्यायाम वैगरे सर्व आटपलं आणि उशीर झालाय हे अण्णाच्या लक्षात आलं. इथून पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन कपडे बदले पर्यंत आणखी उशीर होईल, हे अण्णाच्या लक्षात आलं.

त्याने पर्सनल स्टाफ कडून शूटिंगला लागणारे कपडे मागवून घेतले. अण्णा जिममध्ये तयार झाला. काॅंटे मध्ये तो एका गुन्हेगाराची भूमिका रंगवत होता. त्यामुळे त्याचा लुक आणि कपडे सुद्धा तसेच होते.

दाढी वाढलेली, लेदर जॅकेट, बूट, गळ्यात चैन अशा सर्व गोष्टींसह अण्णा तयार झाला. सर्व सामान स्टाफला आवरायला सांगून, अण्णा गाडी घेऊन एकटाच शूटिंगला जाण्यासाठी निघाला. पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला सुतराम कल्पना नव्हती.

गाडी घेऊन भरधाव वेगात अण्णा शूटिंगला जात होता. इतक्यात त्याच्यापेक्षा अधिक वेगात तीन-चार पोलिसांच्या गाड्यांनी अण्णाचा पाठलाग केला.

काय होतंय हे अण्णाला कळेना. देश अनोळखी होता. त्यामुळे पोलिस पाठलाग का करत आहेत, हे अण्णाला समजत नव्हतं. अखेर दुसऱ्याच क्षणी या गाड्यांनी अण्णाच्या गाडीला घेराव घालून त्याची गाडी थांबवली. पोलिस गाडीतून खाली उतरले आणि अण्णा समोर बंदुकी रोखल्या. काहीही चूक नसताना समोर बंदूक पाहून अण्णाला दरदरून घाम फुटला.

तो गाडीतून खाली उतरला. समजवायचा प्रयत्न करूनही पोलिस त्याला अटक करून घेऊन गेले.

अण्णाला अमेरिकन तुरुंगात डांबण्यात आलं. इकडे अण्णा अजून न आल्यामुळे शूटिंग रखडलं होतं. काही वेळानंतर सिनेमाच्या युनिटला हे प्रकरण कळालं. अण्णाला सोडवण्यासाठी सिनेमासंबंधी मुख्य माणसं जेलमध्ये गेली. अण्णा आणि या सर्वांची पोलिसांनी दीड-दोन तास कसून चौकशी केली.

तेव्हा पोलिसांनी अण्णाला जेलमधून सोडलं,

“लुक आणि गेटअप मुळे आम्हाला हा इसम अतिरेकी वाटला.”

असं पोलिसांनी सांगितलं. अण्णा जेलमधून बाहेर आला आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.