बॉलीवूडचा शेट्टी अण्णा सिनेमे करत नसला तरी आजही वर्षाला १०० कोटी कमावतो

ॲक्शन हिरो म्हणुन सुनील शेट्टी आपल्या सर्वांना माहित आहेच, पण त्याहीपलीकडे बाॅलिवूडच्या ‘अण्णा’ची आज एक यशस्वी बिझनेसमन म्हणुनही ओळख आहे. आज अण्णा सिनेमे इतके सिनेमे करत नसला तरी त्याच्या व्यवसायांमधुन वर्षाला १०० कोटी इतकं उत्पन्न त्याला मिळतं.

एक यशस्वी बिझनेसमॅन ते लोकप्रिय अभिनेता हा त्याचा प्रवास नेमका कसा आहे, हे जाणुन घेऊ.

११ ऑगस्ट १९६१ ला कर्नाटकमधल्या मुल्की येथे सुनील शेट्टीचा जन्म झाला. लहानपणापासुन फिटनेसची आवड असलेल्या सुनील शेट्टीने किक-बाॅक्सींग या प्रकारासाठी ब्लॅकबेल्ट कमावला आहे. त्याच्या वडिलांचं स्वतःचं उडपी रेस्टाॅरंट होतं. त्यामुळे व्यवसायाचे धडे सुनीलने लहानपणापासुनच गिरवले.

वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सुनील शेट्टीने स्वतःची हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट सुरु केली. मुंबईत खार भागात सुनील शेट्टीचा H20 नावाचा रेस्टोबार खुप प्रसिद्ध आहे. सामान्य माणसापासुन ते बाॅलिवुडच्या नामांकित सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण इथे हजेरी लावतात. या हाॅटेलमधला ‘लाँग आयलंड आईस टी’ हा प्रकार खाणाऱ्या-पिणाऱ्या माणसांमध्ये खुप लोकप्रिय आहे.

सुनील शेट्टीला आयुष्यभराची साथीदार बिजनेसच्या निमित्तानेच मिळाली.

त्याचा किस्सा असा की, बिझनेसच्या निमित्याने सुनील शेट्टी अनेक पार्ट्यांना जायचा. यामुळे विविध व्यावसायिकांची गाठभेट व्हायची. एकदा अशाच एका पार्टीला गेला असता सुनीलच्या नजरेत एक मुलगी आली. आणि सिनेमात दाखवतात तसं , पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. परंतु त्या मुलीशी बोलायचं कसं? कारण ओळखही नव्हती आणि त्या मुलीचं नाव माहित नव्हतं. मग कुठुनतरी कळालं की त्या मुलीचं नाव माना आहे.

यानंतर सुनीलच्या डोक्यातला बिझनेसमन जागा झाला. सुनीलने स्वतःच एका पार्टीचं आयोजन केलं. त्यावेळी एका मित्राकरवी त्याने मानाला आमंत्रण दिलं.

माना पार्टीला आली. दोघांचीही गाठभेट झाली. मानाला सुद्धा सुनील आवडला. पार्टीनंतर सुनील बाईक घेऊन मानासोबत लाँग राईडवर गेला. ९ वर्ष एकमेकांसोबत राहून १९९१ साली दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.

भिडूंनो, लग्नाच्या वेळेस सुनील एक व्यावसायिकच होता. अजुन अण्णाची बाॅलिवूड एन्ट्री झाली नव्हती.

१९९२ उजाडलं. यावर्षी सुनील शेट्टीच्या रुपातुन बाॅलिवुडला एक अॅक्शन हिरो मिळाला. बिझनेसमध्ये यशस्वी झालेल्या सुनील शेट्टीने बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तब्बल ३० सिनेमांच्या करारावर सही केली. तसं बघायला गेलं, अक्षय कुमारसोबतचा ‘वक्त हमारा है’ हा सुनीलचा पदार्पणाचा पहिला सिनेमा असणार होता.

परंतु साजीद नाडीयादवाला यांचा ‘बलवान’ आधी बनवुन पूर्ण झाला. सुनील शेट्टी बाॅलीवूडमध्ये नवखा असल्याने त्याच्यासोबत ‘बलवान’ मध्ये काम करण्यास कोणीही लोकप्रिय हिरोईन तयार नव्हती. शेवटी अभिनेत्री दिव्या भारती तयार झाली.

१९९२ साली ‘बलवान’ रिलीज झाला. सिनेमा सुपरहिट झाला आणि बाॅलिवुडला एक नवा ॲक्शन हिरो मिळाला.

सुनील शेट्टीची सिनेमात अक्षय कुमार सोबत जोडी रंगली. दोघांनी एकत्र मिळुन ‘सपुत’, ‘वक्त हमारा है’, ‘हेरा फेरी’, ‘आन’, ‘मोहरा’, ‘थँक यु’, ‘फिर हेराफेरी’ असे अनेक सुपरहिट बाॅलीवूडला दिले. तसंच सुनील शेट्टीची बाॅलिवूडमध्ये एका हिरोईनसोबत मस्त जोडी रंगली आणि हि जोडी प्रेक्षकांनाही आवडली. या अभिनेत्रीचं नाव सोनाली बेंद्रे.

१९९६ ते १९९८ या काळात सोनाली बेंद्रेसोबत सुनील शेट्टीने सहा सिनेमांमध्ये काम केलं. सोनालीला सुनील आवडायचा. तिने त्याच्यासमोर प्रेमभावनाही व्यक्त केल्या. पण सुनील विवाहीत असल्यामुळे तो सोनालीपासुन लांबच राहिला.

‘काँटे’ सिनेमाच्या सेटवर बाॅलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी सुनीलचं नाव ‘अण्णा’ ठेवलं.

तेव्हापासुन सर्व बाॅलिवूडसाठी सुनील शेट्टी ‘अण्णा’ झाला.

अभिनयासोबतच सुनील शेट्टीने ‘पाॅपकाॅर्न फिल्म’ हि स्वतःची प्राॅडक्शन कंपनी सुरु केली. याअंतर्गत सुनीलने ‘भागम् भाग’ सारख्या हिंदी सिनेमांची निर्मिती केली. सुनीलने अलीकडेच रजनीकांत सोबत ‘दरबार’ सिनेमात काम केलं होतं.

२०१० नंतर सुनील शेट्टीने सिनेमात काम करणं कमी केलं. सध्या अण्णाचं संपूर्ण लक्ष त्याच्या बिझनेसवर असतं. ‘मिस्चीफ’ नावाने अण्णाची भारतभर कपड्यांची मोठी दुकानं आहेत. बिझनेसमन-अभिनेता-बिझनेसमन असं अण्णाच्या प्रवासाचं वर्णन करता येईल. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरीही तरुण कलाकरांना लाजवेल असा अण्णाचा फिटनेस आहे.

अभिनय क्षेत्रात बरीच अनिश्चितता असते. आता भरपुर काम असेल, परंतु नंतर एकाही सिनेमाची ऑफर नसेल. अशावेळेस कलाकारांनी अण्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मनोरंजन क्षेत्रात वावरताना अभिनया व्यतिरिक्त स्वतःचा एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरु करण्यास हरकत नाही. यामुळे जरी उद्या काम नसलं, तरी व्यवसायामुळे आर्थिक बाजु ढासळणार नाही.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.