रेशीम मार्ग – रशिया आणि मध्य आशिया

 

कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगीझीस्तान, उजबेकिस्तान आणि ताजिकीस्तान हे देश प्राचीन रेशीम मार्गावरचे. नव्या रेशीम मार्गावरही हे देश आहेत. पण आज ती राष्ट्र-राज्यं आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे सोवियत रशियाच्या पतनानंतर ही राष्ट्र-राज्यं निर्माण झाली. झारशाहीतला रशिया, सोवियत रशिया, आजचा रशिया आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सोवियत रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेले देश, यापैकी कोणत्याही देशामध्ये मुक्त व्यापार, लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य ही मूल्यं रुजली नाहीत. नजिकच्या भविष्यकाळातही ती शक्यता नाही. त्याची कारणं भूगोलामध्ये आहेत. राष्ट्राचं भवितव्य निश्चित करण्यात भूगोल महत्वाची भूमिका निभावतो.

रशिया हा महाकाय देश आहे. युरोप आणि आशिया या दोन खंडात तो पसरला आहे. उरल पर्वताची रांग दक्षिण-उत्तर आहे. या पर्वतरांगेच्या पश्चिमेला युरोप तर पूर्वेला आशिया असं सामान्यतः मानलं जातं. उरल पर्वतरांगांच्या पश्चिमेला रशियाची मुख्यभूमी आहे. ‘मॉस्को’ ही रशियाची राजधानी त्याच प्रदेशात आहे. या प्रदेशाला वेढणाऱ्या नैसर्गिक सरहद्दी- समुद्र, उत्तुंग पर्वतरांगा, वाळवंट, दलदलीचा विस्तीर्ण प्रदेश इत्यादी नाही. त्यामुळे रशियावर प्राचीन काळापासून आक्रमणं होत राह्यली. स्विडीश, पोलीश, जर्मन पश्चिमेकडून तर तुर्की, इराणी दक्षिणेकडून. पूर्वेकडून तार्तार टोळ्या हल्ले करायच्या. शतकानुशतकांच्या या इतिहासामुळे सुरक्षितता आणि अस्तित्वाचा संघर्ष रशियन राज्यकारणाचा मध्यबिंदू राह्यला आहे. बारमाही बंदरं, जलवाहतूक करणाऱ्या  नद्या, लागवडीयोग्य जमीन हे घटक कोणत्याही देशाच्या अर्थकारणात कळीचे असतात. झारशाही असो की सोवियत रशिया वा सध्याची बेगडी भांडवलशाही. विचारसरणी कोणतीही असो, बंदरं हिवाळ्यात गोठलेली असतात आणि उत्तरेकडील युरोपियन मैदानं सपाटच असतात, असं निरीक्षण ‘टिम मार्शल’ या पत्रकाराने त्याच्या ‘प्रिझनर्स ऑफ जिऑग्राफी’ या ग्रंथात नोंदवलं आहे.

रशियाकडे बारमाही बंदरं नाहीत. त्यामुळे सुरक्षितता आणि अस्तित्वाचा संघर्ष यावर रशियन राज्यकर्त्यांनी आक्रमण आणि साम्राज्य विस्ताराची नीती निश्चित केली. मुख्य रशियन साम्राज्यावर हल्ला झाला तर उरल पर्वतरांगांच्या पलीकडे राजधानी नेऊन तिथून संघर्ष सुरू ठेवण्याचा रशियाचा ‘बॅकअप प्लॅन’ प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे तार्तार टोळ्यांचा पराभव केल्यानंतर रशियाने आपल्या सीमा दक्षिणेकडे टीनशान पर्वतरांगांपर्यंत वाढवल्या. फरगाना खोरं ताब्यात घेतलं. हाच मध्य आशिया-उझबेकिस्तान, कझाकस्तान, ताजिकीस्तान, किरीगीझीस्तान, तुर्कमेनिस्तान पार अफगाणिस्तानपर्यंत (दक्षिण आशिया) रशियन साम्राज्याच्या सीमा भिडल्या. पूर्वेला सायबेरीया आणि त्याच्या दक्षिणेला मंगोलियापर्यंत रशियन साम्राज्य पोचलं. ‘व्लादीओस्तोक’ हे चीनी साम्राज्याचं प्रशांत महासागरातलं बंदरही रशियाने घशात घातलं. चेचेन्या, अझरबैजान, युक्रेन ह्या प्रदेशावरही कब्जा केला. रशियन मुख्यभूमीला वेढणारे बफर झोन्स निर्माण करणं ही रशियाची सामरिक नीती राह्यली आहे.

हे प्रचंड साम्राज्य सांभाळायचं तर विविध जमाती, भाषा, प्रदेश यांच्यावर हुकूमत गाजवणं भाग होतं. विविध समूहांच्या, टोळ्यांच्या स्वतंत्र अस्मिता, ओळखी चिरडण्याचा मार्ग रशियाने अवलंबला. कारण या समूहांना रशियाबद्दल प्रेम नव्हतं, असलाच तर तिरस्कार होता. त्यासाठी लाखो लोकांचं स्थलांतर, त्यांच्या भूमीमध्ये रशियनांच्या वसाहती, नोकरशाहीची पोलादी पकड, साम्राज्य विस्तार आणि संरक्षण यासाठी प्रचंड लष्कर हाच पर्याय होता. आणखी एक गोची होती. उरल पर्वतरांगांच्या पलीकडे आणि सायबेरीया सारख्या वैराण आणि हाड फोडणाऱ्या थंडीच्या प्रदेशात नवीन शहरांची उभारणी करणं भाग होतं. कारण तो बॅकअप प्लॅन होता. मात्र तिथे अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं याचा प्रचंड खर्च सरकारला सोसावा लागत होता. गुप्त पोलीसांचं जाळं, नोकरशाही राज्यकारभार, लष्करी दडपशाही अटळ ठरली. त्याचे भीषण परिणाम   झाले. लाखो लोक ठार झाले वा देशोधडीला लागले. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि लोकशाही यांचा परिपोष होईल अशी परिस्थिती रशियात कधीही नव्हती. लष्करावरील खर्च एवढा वाढला की साम्राज्याचा डोलारा सावरणं अशक्य झालं. त्यामुळेही सोवियत रशियाचं विघटन अटळ ठरलं.

‘सी जिंग पिंग’ यांच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या महत्वाकांक्षी प्रकल्पात रशिया आणि मध्य आशिया कळीचे प्रदेश आहेत. चीनमधील कारखान्यांमध्ये बनणारे लॅपटॉप्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू युरोपियन बाजारपेठेत पोचण्यासाठी काही हजार किलोमीटरचा प्रवास करून बंदर गाठतात. तिथून बोटीने दक्षिण चीनचा समुद्र, मलाक्का, हिंदी महासागर, सुवेझ कालवा या मार्गाद्वारे या वस्तू युरोपात जातात. एसर कंपनीचा कंप्युटर कंपनीमध्ये तयार झाला की युरोपियन बाजारपेठेत पोचायला सामान्यतः दोन महिने लागतात. मात्र नवीन सिल्क रोड, रस्ते आणि लोहमार्ग, विशेषतः लोहमार्गामुळे केवळ दोन आठवड्यात हा माल युरोपियन बाजारपेठेत जातो. दर दिवशी जर्मनीला ४१ कंटेनर्स या मार्गाने रवाना होतात. समुद्रमार्गाच्या तुलनेत खुष्कीचे मार्ग महागडे असतात पण समुद्रमार्गाची नाकेबंदी झाली तर पर्यायी मार्ग हाताशी राहातो. नव्या रेशीम मार्गाची सुरुवात पश्चिम चीनमधील चाँगशिंग या शहरातून होते. तिथून कझाकस्तान आणि रशियामार्गे हा खुष्कीचा मार्ग (रस्ते आणि लोहमार्ग), युरोपात पोचतो.

मध्य आशियावर- कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, उजबेकिस्तान, ताजिकीस्तान, किरगीजीस्तान, आजही रशियाचं राजकीय वर्चस्व आहे. नव्या रेशीममार्गामुळे मध्य आशिया आणि रशिया यांचं भूगोलीय राजकारण बदलणार आहे. कारण या मार्गामुळे सर्व प्रदेशांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. मध्य आशिया हा विस्तीर्ण कुरणांचा प्रदेश आहे. आजही तिथे पशुपालकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी नवा रेशीम मार्ग म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती आहे. उंटांच्या तांड्यांची जागा ट्रक आणि रेल्वेच्या वाघीणींनी घेतली आहे.

सोवियत रशियाच्या विघटनानंतर रशियन भाषा आणि रशियन राष्ट्राची अस्मिता यांना रशियाच्या राजकारणात मध्यवर्ती स्थान मिळालं आहे. त्याचाच वापर करून रशियाने युक्रेनमधील क्रिमिया हा प्रदेश ताब्यात घेतलाजेणेकरून सेवेस्तापोल या भूमध्य सागरातील बारमाही बंदरावर ताबा मिळावा. क्रिमिया असो की चेचेन्या, तेथील रशियन लोकसंख्येच्या सुरक्षिता हे कारण पुढे करून रशिया या देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करतो. सोवियेत रशियाचं १५ नवीन राष्ट्रांमध्ये विघटन झालं. त्यापैकी उजबेकिस्तान, अझरबैजान आणि तुर्कमेनिस्तान ही अलिप्त राष्ट्रं आहेत. कझाकस्तान, किरगीजीस्तान, ताजिकीस्तान, बेलारूस, आर्मेनिया ही रशियावादी राष्ट्रं आहेत. तर इस्टोनिया, जॉर्जिया, लाटविया, लिथुआनिया, मोल्दाविया आणि युक्रेन ही युरोपवादी राष्ट्रं आहेत.

नव्या रेशीमार्गामुळे ही राजकीय समीकरणं अर्थात राजकीय भूगोल बदलण्याची शक्यता आहे.

सुनिल तांबे 

९९८७०६३६७० 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.