झोपडपट्टीचे प्रश्न सोडवताना अपघाताने सिनेमात आल्या आणि ७ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले…

मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेते ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते.त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो.

सुमित्रा भावे यांची हि सिनेमानिर्मिती मागची भावना. मूळचा सिनेमानिर्मितीचा पिंड नसलेल्या सुमित्रा भावे आधी समाजसेविका आणि लेखिका होत्या.

दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखिका असणाऱ्या सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं.

सिनेमा आणि समाजसेवा यांत त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या एकूण कामगिरी आणि चित्रपटांविषयी आजचा आढावा.

१२ जानेवारी १९४३ साली त्यांचा पुण्यात जन्म झाला. आगरकर हायस्कुलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेत पदवी मिळवली.मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. सुरवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून मराठी वृत्त निवेदनही केलं.

१९६५ पर्यंत त्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. त्यानंतर वीस वर्षे त्यांनी सोशल वर्क फिल्डमध्ये काम केले. त्यात तब्बल दहा वर्ष त्या पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन करत होत्या. झोपडपट्टी विभागातील स्त्री आणि मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलवला. अनेक समाजसेवा कार्यांच्या प्रमुख त्या होत्या त्यांनी हि जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

याच झोपडपट्टीतील महिलांचे प्रश्न मांडताना अपघातानेच त्या सिनेमामध्ये आल्या. कोणताही अनुभव नसताना कोणतंही प्रशिक्षण नसताना त्यांनी १९८५ साली बाई हि शॉर्ट फिल्म बनवली. या शॉर्ट फिल्मच्या वेळी त्यांना सिनेमाच्या क्षेत्राची ताकद लक्षात आली.

या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

दरम्यान दलित, अशिक्षित स्त्री यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्यापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने त्या चित्रपट क्षेत्राकडे वळल्या. त्यांच्या मनाने आजवर पाहिलेले अनुभव, प्रसंग, निरीक्षणे, मानवी भावनांची गुंतागुंत त्यांनी अतिशय उत्तमरीत्या चित्रपटातून सामान्य माणसांपर्यंत पोहचवली. अभिव्यक्तीसाठी सगळ्यात उत्तम माध्यम म्हणजे सिनेमा असं त्या म्हणायच्या.

कासव सारखा सुवर्णकमळ पटकावणारा मानवी मनाच्या नैराश्यावर भाष्य करणारा चित्रपट त्यांनी लिहिला आणि दिग्दर्शितही केला. हा चित्रपट कसा सुचला त्याविषयीचा हा किस्सा.

एकदा सुमित्रा भावे या कुठल्यातरी दौऱ्याहून पुण्यात आल्या तेव्हा त्यांचे सहकारी सुनील सुकथनकर यांनी त्यांना सांगितले कि आलोक राजवाडे काहीतरी वेगळी लकेर घेत गाणी गातोय आणि ते ऐकायला चांगलं आहे पण समजण्याच्या पलीकडे आहे. त्यावेळी सुमित्रा भावेंनी अलोकला बोलावून घेऊन ते गाणं गायला लावलं. त्यांना जाणवलं कि,

हे निराशेचं संगीत आहे. त्यातून नैराश्य डोकावतं. हि संवादाची भाषा आहे. तरुण पिढीचं मन अशी कितीतरी नैराश्येची गाणी गात असत हाच धागा पकडून त्यांनी जगावर रुसलेला आणि तरीही जगावर प्रेम करणारा नायक रेखाटला आणि कासव नावाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट तयार केला.

ठराविक साच्यातले चित्रपट न बनवता त्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या पद्धतीने त्यांनी सिनेमा माध्यम हाताळले. दोघी आणि वास्तुपुरुष सारखे गंभीर चित्रपट सुद्धा त्यांनी बनवले.

सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप चहा , हा भारत माझा, संहिता, अस्तु, दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे.

या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.

बॅंगलोर मधील शाश्वती फाउंडेशन नावाची एक संस्था आहे जी भारतभरातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लेखिकांना त्यांच्या संस्थेचा मानाचा  पुरस्कार देतात. या संस्थेने त्यांच्या समाजसेवेतील आणि सिनेक्षेत्रातील कामाकडे बघत त्यांच्या लेखनाच्या स्क्रिप्ट मागवून घेतल्या. संपूर्ण भारतातून ज्युरी लोकांनी तो पुरस्कार सुमित्रा भावे यांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु

सुमित्रा भावे या एकमेव लेखिका अशा होत्या कि ज्यांना साहित्यावर पुरस्कार न मिळता स्क्रिप्टवर पुरस्कार मिळाला होता.

माझा सिनेमा पैसे कमावण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यात कधी नसेलही. चित्रपटातून मानवी भावनांचं विश्व् मला सामान्य माणसांपर्यंत पोहचवायचं आहे,

असा त्यांचा निर्मळ हेतू होता. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीचं मोठं आणि न भरून येणारं नुकसान झालं आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.