डिंपलने सनीचा ढाई किलोवाला हात कायमचा घट्ट पकडलाय.

तेव्हा ती सोळा वर्षाची होती. पहिलाच सिनेमा राज कपूर दिग्दर्शित करत होते. हिरो त्यांचा मुलगा चिंटू होता. ती दिसायलाच हायफाय फटाकडी होती. टूपिस बिकिनीसुद्धा एकदम सहज कॅरी केली. पिक्चर सुपरहिट झाला. पहिल्याच सिनेमात फिल्मफेअर जिंकल. ही नवी हिरोईन कोण म्हणून अख्खी मिडिया तिच्यावर तुटून पडली.

नाव होतं डिंपल कपाडिया. भले सगळे इंडस्ट्रीमधले दिग्गज तिच्यावर गळ टाकायसाठी सरसावले. पण तोपर्यंत बातमी आली की सुपरस्टार राजेश खन्नानी आधीच नंबर लावला आहे. बॉबी रिलीज होण्यापूर्वी राजेश खन्नानी या षोडशवर्षीय कम्सीन कळी बरोबर लग्न केलं होतं.

“हम तुम एक कमरे में बंद हो”

म्हणत अख्ख्या भारताला खूळ करून सोडलं. बॉबी मध्ये एखाद्या विजेसारखी चमकली आणि काका बरोबर लग्न करून संसाराला पण लागली. सिनेमा सोडला. सोन्यासारख्या दोन पोरी झाल्या. पण काका म्हणजे काका होता. एकेकाळी सुपरस्टारडम अनुभवलेलं पण बच्चनसाहेबांच्या आगमनाने सगळ होत्याच नव्हतं झालं. याच नैराश्यातून दोघांची भांडण होऊ लागली. डिम्पलला काकाने आपल करीयर संपवल याच दुःख होतं. शिवाय त्याच्या अफेअर्सच्या चर्चा ऐकून वैतागली होती.

एक दिवस निश्चय केला. दोन्ही पोरीना उचललं  आणि राजेश खन्नाच्या संसाराला टाटा बाय बाय करून बाहेर पडली. 
सगळ्या फिल्मइंडस्ट्रीसाठी हा धक्का होता. बिचारी अबला नारी, नवऱ्याने सोडून दिलंय, पदरात दोन पोरी आहेत आता कस होणार? अनेकजन आधाराचा खांदा घेऊन गेले. खमक्या डिंपलने सगळ्यांना पळवून लावलं.

कमबॅकचा पहिलाच सिनेमा साईन केला शोले फेम रमेश सिप्पीचा ‘सागर’. तिच्या आयुष्यातल्या दुसऱ्याच सिनेमाचा हिरो परत ऋषी कपूरच होता. रमेश सिप्पीसारख्या मोठ्या डिरेक्टरचा सिनेमा करतीय म्हटल्यावर आपोआप तिच्या मागचे भुरटे लोक गायब झाले. बऱ्याच सिनेमांची ऑफर आली. यात पहिला रिलीज झाला जखमी शेर.

copyright@bolbhidu.com
रिलीज व्हायला लांबलेल्या सागरमध्ये तिने खूप बोल्ड सीन दिले. यातला समुद्रकिनाऱ्यावरचा अर्धअनावृत्त(अर्थ कळला नसेल तर गूगल करणे) टॉवेल सीन विशेष करून रसिकांच्या लक्षात आहे. या सिनेमासाठी परत तिने फिल्मफेअर जिंकल. विशेष करून ऋषी कपूर तिला लकीच होता. खर तर ऋषीचासुद्धा तिच्यावर डोळा होता पण बॉबीवेळीच वडिलांनी रागवल्यामुळे त्याने तिच्यापासून सुरक्षित अंतर राखलं होतं.

एकूण काय सागर मुळे डिंपलचं जोरात कमबॅक झालं. तिची गाडी रुळावर आली. प्रेक्षकांनी देखील दोन पोरींची आई असा काहीही शिक्का न मारता  तिला स्वीकारलं होतं. डिंपल आपल्या स्वतःच्या पायावर उभी झाली होती. याच काळात तिचा एक सिनेमा आला. मंजिल मंजिल. याचे दिग्दर्शक होते द ग्रेट नसीर हुसेन. हिरो होता धर्मेंद्रचा कोवळा मुलगा सन्नी!! मंजिल मंजिल रिलीज झाला तेव्हा मुलाखतीमध्ये बोलता बोलता डिंपल म्हणाली,

“हा पिक्चर करताना खूप मज्जा आली. एखाद्या पिकनिक प्रमाणे वातावरण होतं.”

एकूण काय तर सनीबरोबर काम करण तिला आवडल होतं. त्याचा हा दुसराच सिनेमा होता. पहिला बेताब चांगलाच गाजला होता. त्यातली हिरोईन अमृतासिंग बरोबर त्याची काही तरी खिचडी पकतीय अशी चर्चा झाली होती. पण गडी लग्न झालेला आहे हे नंतर कळाल.

१९८५ साली सनी डिंपलचा आणखी एक सिनेमा आला. अर्जुन. सनीच्या कारकिर्दीतला सर्वात महत्वाचा सिनेमा. (खर तर सागर या सिनेमानंतर रिलीज झाला होता) अमिताभ बच्चन नंतरचा नवा अँग्री यंग मॅन मिळाला आहे. याच पिक्चरच्या वेळी डिंपल आणि सनीची केमिस्ट्री जबरदस्त जुळल आहे हे सगळ्यांना दिसून आलं. 

शेवटी धर्मेंद्रच पोरग. लेकरू तोंडावरून निरागस होतं पण अंगात खूप करामती होत्या. अमृता बरोबर ब्रेक अप झालं आणि लगेच डिंपल बरोबर जुळवल. अख्ख देओल कुटुंब यमला पगला दिवाना आहे. आपल्या ढाई किलोका हात त्याने डिंपलच्या हातात दिला आणि कायमच्यासाठी पकडला.

असं म्हणतात की त्या दोघांनी सिक्रेटली लग्न केलं. सनी तर शादीशुदा होताच पण डिंपलने देखील राजेश खन्नाबरोबर ऑफिशियल काडीमोड घेतला नव्हता. पण तरी दोघे एकत्र राहू लागले. तिकडे काका देखील टीना मुनीम नंतर आपली पहिली गर्लफ्रेंड अंजू महेंद्रू कडे परत गेला.

एवढ सगळ जुळून आल होतं. जवळपास बारा वर्षे दोघे एकत्र होते. सगळ्यांना त्याचं ओपन सिक्रेट ठाऊक होतं. दोघे बऱ्याच सिनेमात एकत्र दिसले.  खऱ्या आयुष्यात सनी खूप रोमांटिक आहे. त्याने डिंपलला तर आधार दिलाच पण तिच्या पोरीनाही आपलं मानलं. ट्विंकल आणि रिकी या दोघीही सनीला छोटे पापा म्हणायच्या. 

डिंपलचा अनिल कपूरबरोबरचा जांबाज, नाना पाटेकर सोबतचा क्रांतीवीर गाजला. कल्पना लाज्मीच्या रुदालीमध्ये तर तिने नॅशनल अवाॅर्ड, फिल्मफेअर सगळे आपल्या नावे केले. सगळ मस्त चाललय असं वाटत होतं तेवढ्यात परत माशी शिंकली.

नाही म्हटल तरी डिंपलच आता वय दिसू लागलेलं. सिनेमेसुद्धा आटलेले. सनी मात्र फुल फॉर्ममध्ये होता. दामिनी, घायल, घातक एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे येत होते. डिंपलच्या लेकीला ट्विंकलला सनीने आपल्या भावाबरोबर म्हणजे बॉबी बरोबर लॉंच केलं. पिक्चर चालला. डिंपलने काम बंद केलं.

पण दोघांच्यात वाद सुरु झाले होते. अशातच एक दिवस सनीच्या ‘जिद्दी’ सिनेमाच शुटींग चाललेलं. यात हिरोईन होती रविना टंडन. एकदिवस डिंपल कपाडिया जिद्दीच्या सेटवर येऊन धडकली. तिथे तिला काय बघायला मिळालं काय माहित पण त्या दिवशीच सनीच आणि तीच जोरात भांडण होऊन ब्रेक अप झालं. 

डिंपलने यानंतर दिल चाहता है मधून आपली तिसरी इनिंग सुरु केली. ट्विंकल अक्षयबरोबर लग्न करून सेटल झाली. गदरच्या सुपरहिट यशानंतर हळूहळू सनी पाजीसुद्धा उतरणीला लागला. काही वर्षापूर्वी काका राजेश खन्ना याचं निधन झालं. कितीही वाद झाले तरी डिंपलच त्यांच्याबरोबरच रिलेशन चांगलच होत. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा ती गेली होती. त्यांच्या निधनानंतर शेवटची उसाभर जावई अक्षयनेच केली.

सनी डिंपलची लव्हस्टोरी इतिहास जमा झाली असंच सगळ्यांना वाटत होतं. दोघसुद्धा वयाच्या साठीत पोहचलेत. डिंपलला आता नातवंड आहेत. सनीचा मुलगा सुद्धा आता डेब्यू करेल. पण काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात सनी पाजी आणि डिंपल कुठल्यातरी देशात एका रेल्वेस्टेशनवर निवांत बसलेत. डिंपल मस्तपैकी सिगरेटचे झुरके मारतीय. यात विशेष दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सनी पाजीनी तिचा हात घट्ट पकडलाय.

किसीने सच कहा है,

“ये ढाई किलो का हात किसी पर पडता है ना. आदमी उठता नही उठ जाता है.”

copyright@bolbhidu.com

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.