जागतिक विक्रमी सुपर मारिओचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.

टीव्हीवर व्हिडीओ गेम्स खेळण्याचा तो काळ. उडणाऱ्या बदकाला गोळ्या घालणे, रणगाडे उडवणे याबरोबरच मारियोला त्याच्या प्रिन्सेस पाशी पोहचवायला आमची अख्खी दिवाळी सुट्टी खर्ची पडायची. पण ती कधी मिळालीच नाही. लहान असताना मारियोच्या प्रिन्सेस साठी जेवढे कष्ट केले तेवढे कष्ट केले तर कमीत कमी तहसीलदारची पोस्ट तरी काढली असती. असो

अशा या जागतिक विक्रमी सुपर मारिओचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.

साल होत १९८५ . जन्मठिकाण जपान.

जपानची निन्टीण्डो नावाची एक कंपनी आहे. गेली सव्वाशे वर्ष गेम या क्षेत्राशी निगडीत आहे. शिगेरू मियामोटो नामक एक गेम डिझायनर होता. त्याने निन्टीण्डोसाठी एक गेम डिझाईन केला होता डॉंकीकॉंग नावाचा. आर्केड गेम प्रकारातील ही गेम. म्हणजे काय तर पूर्वी व्हिडीओ पार्लर असायचे जिथे मशीनवर गेम खेळायला लागायचं ते आर्केड गेम. अजूनही मॉल मध्ये हे गेम्स असतात.

तर हा डॉंकीकॉंग आर्केड गेम वर बराच फेमस होता. त्यात एक जंपमॅन नावाचा सुतार असतो. बुटका,जाडजुड मिशा, डोक्यावर टोपी अंगात लाल कपडे असा टिपिकल इटालियन सुतार. त्याच काम असत की उड्या मारत डॉंकीकॉंग कडे अडकलेल्या आपल्या राजकुमारीला सोडवण्यासाठी ते कष्ट करायचं.

अमेरिकेत ही जापनीज गेम खूप गाजली. या गेममधल्या करेक्टर्सची नावे मात्र तिथल्या काम करणाऱ्या निन्टीण्डोच्या ऑफिस मधल्या लोकांनी बदलून अमेरिकन केली. सगळ्यात पहिलं नाव बदललं जंपमॅनचं.

वॉशिंग्टनमध्ये एका गोडाऊन मध्ये निन्टीन्डोवाले आपले मशीन ठेवायचे. त्या गोडाऊनचा मालक होता मारियो सिजेल. तो त्या जंपमन सारखा दिसायचा. त्याचे अमेरिकेत बरेच गोडाऊन होते. त्याचं या जापनीज कंपनीच्या कर्मचार्यांशी सारख भांडणं देखील व्हायची, त्याची बरीच चेष्टा या कंपनीत काम करणारे तरुण कर्मचारी करायचे.

याच मारियो सिजेलच्या नावावरून गंमतीगंमतीमध्ये जंपमनच नामकरण झालं मारियो.  

खर तर मियामोटो ला त्याच नाव पोपोय ठेवायचं होतं. पण त्याच नावाच कार्टून फेमस असल्यामूळ ते नाव काही मिळालं नाही. मग अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांनी फेमस केलेले नाव मारियो हेच फायनल करून नवीन गेम सुरु केली. यात मारियोचा हिरवे कपडे घालणारा भाऊ पण आणला त्याच नाव लुगी. ही गेम सुद्धा गाजली.

पण तो पर्यंत निन्टीण्डोने ठरवलं की आर्केड गेममूळ खूप लीमीटेशण येत आहेत. जास्तीतजास्त मुलांपर्यंत पोहचायचं झालं तर त्यांना घरी बसून खेळता येईल असेच गेम डेव्हलप केले पाहिजेत हा त्यामागचा विचार होता. यातूणच मियामोटोने नवीन टीव्ही गेम डिझाईन केली ज्याच नाव होतं सुपर मारियो ब्रदर्स.

जुन्या आर्केडवरच्या मारियो पेक्षा ही गेम खूप वेगळी होती. यात मश्रूम खाऊन मारियो मोठा होत होता, त्याला सुपर पॉवर येत होत्या. डावीकडून उजवी कडे धावत मध्ये मध्ये आडवे येणारे कासव लाथ मारून उडवत होता, मोठ्या उड्या मारून भिंती फोडत होता. कोणत्याही खूप गुंतागुंती नसलेला हा मारियो थोड्याच काळात जगभर फेमस झाला.

या त्याच्या यशात मियामोटोच डोक तर होतंच पण त्या बरोबर कोजी कोंडो नावाच्या तरुणान बनवलेलं पार्श्वसंगीत सुद्धा तेवढच इफेक्टिव्ह होतं. आजही मारियो म्हटल तर मागून वाजणारी ती टिपिकल धून डोक्यातून उतरत नाही. कोजी कोंडो ने निन्टीण्डोवाल्यांना वेगळा साउंड डिझायनर ठेवायची सवय लावली.

सुपरमारियोने गेमिंगचा इतिहास बदलून टाकला. जगाचा महासत्ता असलेले अमेरिका जपान असोत किंवा भारता सारखे विकसनशील देश असोत जगाच्या कानाकोपऱ्यातली मुलं हा गेम खेळत होती.  मध्यंतरी कोणी तरी मारियो सिजेल यांची मुलाखत घेतली. तेव्हा त्यांनी गंमतीत सांगितल की, 

“माझ्या कडे खरेच अशा काही सुपर पॉवर नाहीत. मी कोणत्या राजकुमारीच्या शोधातही नाही. तरी निन्टीण्डोने मला न विचारताच माझ नाव वापरलं. खर तर मी त्यांना रॉयल्टी मागायला हवी होती. आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो.”

आज एकूण ३४ वर्ष झाली. खरे मारियो कधीच देवाघरी गेलेत. टीव्हीवर खेळले जाणारे गेम सुद्धा इतिहास जमा झाले. मोबाईल, प्लेस्टेशनचा जमाना आहे. पण मारियोची जादू अजूनही कमी झाली नाही. आजही कित्येकजण आपल्या मोबाईलवर हा गेम खेळत असतात. मारियोला अजून त्याची राजकुमारी मिळालेलीच नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.