….तर रजनीकांत हवेत सिगरेट उडवू शकला नसता !

सुपरस्टार रजनीकांत आज ७३ वर्षांचा झालाय. या वयात देखील चाहत्यांमध्ये असणारं त्याचं क्रेझ अचंबित करणारं आहे. त्याचं हे क्रेझचं आहे की कुठलाही निर्माता त्याच्या पिक्चरवर कितीही पैसे लावायला एका पायावर तयार असतो. कारण ते दुपटीने वसूल होण्याची खात्री असते. रजनीकांतची केवळ उपस्थितीच, चित्रपटाला रिलीज होण्याआधीच सुपरडुपर हिट करण्यासाठी पुरेशी असते.

मध्यंतरी रजनीकांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘इंडिया टुडे’ मासिकाच्या ताज्या अंकात त्याची एक मुलाखत प्रकाशित करण्यात आली होती. या मुलाखतीतून रजनीकांतविषयीच्या यापूर्वी कधीही न ऐकलेल्या अनेक किस्से समोर आलेत. त्यातच त्याने आपल्या हवेत सिगरेट उडविण्याच्या स्टाईलविषयी देखील सांगितलं होतं.

रजनीकांतच्या वेगवेगळ्या स्टाईल त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. त्याची आधी हवेत सिगरेट उडवून नंतर ती ओठाने पकडत पुन्हा पेटवण्याच्या स्टाईलचं वेड तर त्याच्या जगभरातील चाहत्यांना आहे. तमिळमधले अनेक अभिनेते देखील त्याची ही स्टाईल कॉपी करतात.

रजनीकांत ज्या पद्धतीने सिगरेट हवेत उडवून ती पेटवतो, ते केवळ त्यालाच जमू शकतं. पण आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नसेल की मूळ रजनीकांतची स्टाईल नाहीच. रजनीकांत ही स्टाईल शिकला बॉलीवूडच्या ‘छेनू’कडून.

आपल्या पहाडी आवाजात ‘खामोश’ म्हणणारा आणि सध्या राजकीय मैदानात भाजपच्या घरात राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना कुठल्याही मुद्दयावर बोचकावणारा ‘छेनू’ म्हणजे शत्रुघ्न सिन्हा.

हवेत सिगरेट उडवण्याची करामत बॉलीवूडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणली ती शत्रुघ्न सिन्हाने. शत्रुघ्न सिन्हाची या स्टाईलने रजनीकांतला प्रभावित केलं आणि त्यात अनेक बदल करून रजनीकांतने देखील तशाच पद्धतीने सिगरेट उडवायला सुरुवात केली.

रजनीकांतच्या मते हवेत सिगरेट उडवण्याच्या या स्टाईलला इतक्या सफाईदारपणे करण्यासाठी त्याला जवळपास हजार वेळा सराव करायला लागला होता. तेव्हा कुठे आजच्या सारखं परफेक्शन मिळालंय.

हे एक टॅलेंट असलं तरी सगळा खेळ टायमिंगचा असल्याचं रजनीकांत मानतो. तुम्हाला फक्त हवेत सिगरेट उडवायची नसते, तर सोबतच डायलॉग देखील बोलायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी योग्य ती टायमिंग साधली गेली पाहिजे.

माध्यमांमध्ये अनेकवेळा तमिळमधला दुसरा एक सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत हे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याचं चित्र रंगवलं जातं. दोघांच्याही राजकीय सक्रियतेमुळे तर ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून देखील समोर येतात, पण रजनीकांत मात्र कमल हसन हे आपले  प्रतिस्पर्धी नसून एक अतिशय जवळचे मित्र असल्याचं सांगतात. कमल हसन यांनी अनेकवेळा आपल्याला मदत केलेली असून आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या असल्याची कबुली देखील रजनीकांत या मुलाखतीत देतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.