कोरोनाने आई-बाप हिरावलेल्या लेकरांच्या मदतीसाठी आता कलेक्टर धावून आलेत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. आपण बघितलं त्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसलाय. कोरोनाच्या या संकटात अनेकांचं आयुष्यच बदललं.  कुणाच्या आयुष्यात हा बदल सकारात्मक ठरला…पण अनेकांच्या आयुष्यात या कोरोनाने जितेपणीच नरक दाखवला.  बऱ्याच जणांनी नोकरी गमावली, कर्जबाजारी झालेत, तर कित्येक जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं….तसेच हा कोरोना विषाणू कित्येकांना अनाथ करून गेला..

हा मुद्दा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं कि, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार आहे. कोरोनामुळे आई -बाबा गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे झाले सरकारचे पाऊल… मात्र यात सामाजिकदृष्ट्या कुणी पुढे येणार का ? अनाथ लेकरांना हक्काचे पालकत्व घेण्याची तयारी नाममात्र लोकांनीच घेतल्याचे पाहायला मिळाले…

पण अलीकडेच एक सकारात्मक उदाहण समोर आले ते म्हणजे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे…..मांढरे सरांनी समाजासमोर एक आदर्श उदाहरण घालून दिला आहे. 

असा एक गैरसमज आहे, की सरकार आणि सरकारी नोकरदार वर्ग हा बोथट असतो, भावनाशून्य असतो. पण हा गैरसमज जरा बाजूला ठेवला तर कधी काही नोकरशाहीतील माणुसकीचा प्रत्ययही जनतेला येतोच येतो आणि त्याचेच उदाहरण म्हणजे, नाशिक मधील हि घटना.

कोरोनाच्या काळात बालकांचे छत्रे हरपली. हजारो बालके अनाथ झाली. सरकारी योजनेतून तसेच सेवाभावी संस्थांकडून काही मुलांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी उचलली जाणार, अशा घोषणा झाल्या. ‘शासकीय मदतदूत’ ही सरकारची अशाच अनाथांसाठीची योजना आहे. योजनेची पहिली अंमलबजावणी नाशिकमध्ये झाली. 

नाशिक जिल्ह्यातील ४० कुटुंबातील ५६ बालके या कोरोनाच्या संकटात पोरकी झालीत. याच ५६ अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी ४० महसूल अधिकाऱ्यांनी स्वीकारत माणुसकीचे दर्शन घडवले. हे अधिकारी त्यांना शक्य तितके संगोपन करणार आहे. या सर्व अनाथ बालकांमध्ये काही महिन्यांच्या पासून ते कुमारअवस्थेतील मुलांचा समावेश आहे.  

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ या अनाथ बालकांना मिळवून देण्याची जबाबदारी या संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे. लाभ मिळवण्यात काही अडचणी आल्या तर त्या दूर करण्याची जबाबदारी देखील याच अधिकाऱ्यांची असणार आहे.

याच दरम्यान जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जाहीर केले कि, सर्वात कमी वयाच्या बालकांची जबाबदारी मी स्वतः घेईन. त्यांनी सांगितल्यानुसार, मांढरे यांनी दोन जुळ्या बहिणींची जबाबदारी स्वीकारली. या दोन बहिणी नऊ महिन्यांच्या असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले तर हे दोन्ही बाळ १३ महिन्यांच्या असतांना त्यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. आता या जुळ्या बहिणी दीड वर्षाच्या आहेत. आणि त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी मांढरे यांनी स्वीकारली आहे.”

सूरज मांढरे सांगतात कि, “कोरोना मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जबाबदारी स्वीकारण्याच्या माझ्या आवाहनाला जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी एक मुखाने सकारात्मक प्रतिसाद दिला.  त्याचाच एक भाग म्हणून मी जबाबदारी स्वीकारलेल्या दोन बालिका, कावेरी व प्राजक्ता साबळे यांना आज भेटलो. थोडा खाऊ, एक छोटा धनादेश आणि खूप साऱ्या गप्पा केल्या… 

या जुळ्या लहान गोंडस बहिणी प्राजक्ता आणि कावेरीची कहाणी तर अत्यंत हृदयद्रावक आहे. भानुदास साबळे आणि शांता साबळे यांना लग्नानंतर २१ वर्षांनी या जुळ्या मुली झाल्या होत्या. वडिल कँसर ने गेले तर आई कॅन्सर ने गेली. सद्या त्यांचा सांभाळ त्यांचे मामा श्री घुगे करीत आहेत.

कोरोना नंतर पालक अथवा जोडीदार गमावलेल्या व्यक्तींसाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना सुरू झाली व आपल्या जिल्ह्यात आपण एका कार्डवर सर्व लाभ देण्याचा उपक्रम सुरू केला. त्याचा चांगला परिणाम मला या भेटीत दिसून आला. या बालिकांना शासनाकडून मिळालेले मुदत ठेवीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे, त्यांच्या सांभाळ करणाऱ्या मामांचा दाखला प्राप्त झालेला आहे, त्यांच्या वडिलांच्या मिळकतीवर अज्ञान पालन कर्ता म्हणून नाव देखील दाखल झालेले आहे.

आता त्यांना शासकीय संगोपन शुल्क दरमहा मिळवून देणे, त्यांचे छोटे-मोठे वैद्यकीय उपचार शासकीय व्यवस्थेतून करून देणे, त्यांच्या आजीची संजय निराधार योजनेची पेन्शन मंजूर करून देणे अशा स्वरूपाचे उर्वरित लाभ एखादे दोन आठवड्यांमध्ये त्यांना दिले जातील अशी व्यवस्था या भेटीतच केली.

प्रत्येक कुटुंबाला एक वरिष्ठ महसूल अधिकारी या माध्यमातून जोडला गेल्यामुळे त्या अधिकाऱ्याच्या पाठपुराव्यामुळे निश्चितपणे सर्व कामे गतीने पूर्ण होतील. त्याचबरोबर जे नातेवाईक या बालकांचा सांभाळ करीत आहेत त्यांच्यासोबत प्रशासन आहे ही भावना दृढ  होऊन तेही अधिक चांगल्या प्रकारे त्या बालकांचे संगोपन करतील याची मला खात्री वाटते, अशी प्रतिक्रिया देखील नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केली.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.