भारतातल्या या समुद्र किनाऱ्याकडं पर्यटक सोडा पण स्थानिक लोकंही फिरकत नाहीत

समुद्र किनारा म्हटलं की लाटा आठवतात, तिथलं वातावरण, वाळू, शांतता अशा सगळ्या निसर्गरम्य गोष्टी आठवतात. मात्र गुजरात मधील हा समुद्र किनारा भीतीदायक म्हणून ओळखला जातो. स्थानिक नागरिक तर समुद्र किनाऱ्यावर साधं फिरायला जात नाही. हा समुद्र किनारा भुतांची जागा असणारा म्हणून ओळखला जातो. 

स्थानिक नागरिक तर म्हणतात, इथं रात्री गेलेला माणूस परत येत नाही.

तर या समुद्र किनाऱ्याचं नाव आहे डुमस

जर तुम्ही गुगलवर जाऊन भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणं कुठली आहेत, असं सर्च केलं तर त्यात डुमस किनाऱ्याचं नाव मिळेल.     

डुमस हा समुद्र किनारा सुरतपासून २१ किलोमीटरवर आहे. तसा हा समुद्र किनारा इतर समुद्र किनाऱ्यांप्रमाणं सुंदर आहे. मात्र त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. इथल्या काळ्या जादूच्या कथा सांगितल्या जातात. 

या किनाऱ्यावर अनेक वर्ष सामूहिक अंत्यसंसकार करण्यात येत होते. त्यामुळे अनेकांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी भुतांचा अधिवास आहे.

इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या समुद्र किनाऱ्यावरील वाळू ही काळ्या रंगाची आहे. 

डुमस समुद्र किनाऱ्यावर आईस्क्रीम विकणारे गौरव आणि विक्की पटेल सांगतात की, “गेल्या १५ वर्षांपासून आम्ही रोज या किनाऱ्यावर येतो. मात्र आम्ही कधीही भुत पहिले नाही किंवा त्याचा आवाज ऐकला नाही. मी मुंबईतील जुहू बीच बघितले आहे ते डुमसच्या किनाऱ्या पेक्षा जरा वेगळे वाटले. तिथली वाळू तपकिरी रंगाची होती. इथली वाळू काळ्या रंगाची आहे. एवढाच काय तो फरक मला दिसला.” 

तर काही पर्यटकांच्या मते डुमस समुद्र किनाऱ्याचे रात्री फोटो काढल्यास त्यात सहस्यमय गोष्टी दिसतात. प्रकाशाचे ठिपके किंवा एखाद्या व्यक्तीची अंधुक चित्रं फोटोमध्ये दिसून येतात. 

इथल्या समुद्र किनाऱ्या बद्दलचा इतिहासात कुठलीच नोंद नाही. इथं येणारा पहिला व्यक्ती कोण होता, या किनाऱ्याला कधीपासून भुताचा किनारा म्हटले जाते, या संदर्भात नोंद सापडत नाही. 

इथं काही वर्षांपूर्वी सामूहिक अंत्यसंसकार होत होते. त्यामुळेच किनाऱ्यावरील वाळू काळी झाली आहे, असं सांगितलं जातं. त्याच बरोबर ज्यांचे अंत्यसंसकार झाले त्यातील काही जणांचे आत्मे अजूनही समुद्र किनारी भटकत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. 

तसेच संध्याकाळनंतर या बीचवर ओरडण्याचा आवाज येतो. हा आवाज समुद्र किनाऱ्यापासून बराच दूर ऐकायला येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

तर काहींच्या मते डुमस समुद्र किनाऱ्यावरील भीतीदायक वातावरण हे मानवनिर्मित आहे.

इथं मात्र, कुत्रे मोठ्या प्रमाणात जमलेले असतात. त्यांच्या रडण्याच्या आवाजानं आणि फिरण्यामुळे लोक भितात. या समुद्र किनाऱ्यावर येताच कुत्रे रडायला सुरुवात करतात आणि सैरभर पळतात.    

दुसरीकडे हा समुद्र किनारा तरुणांसाठी लव्ह स्पॉट आहे. इथे दिवसभर कपल्स बसलेले असतात. मात्र, दिवसभर बसणारे हे तरुण म्हणतात की, “रात्री हा समुद्र किनारा भयानक वाटतो. त्यामुळे आम्ही रात्री इकडे फिरकत सुद्धा नाही. तिकडून भीतीदायक, विचित्र आवाज येतात.” 

खरं इथल्या जमिनीत लोह आणि खनिज जास्त असल्याने वाळू काळी आहे. पण, इथल्या स्थानिक नागरिकांना वाळूच्या काळ्या रंगाबद्दल काहीच वाटत नाही. या किनाऱ्यावर अनेकवेळा मासळी मेलेल्या अवस्थेत आढळतात. स्थानिक लोकांच्या मते समुद्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे हे मासे मृत आढळत आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. 

डुमसच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील वातावरण खराब होत असल्याचं पर्यावरण रक्षक कार्यकत्यांचे म्हणणे आहे. मात्र सरकारकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नाही.

थोडक्यात, कारणं काहीही असली तरी इथं जायला स्थानिकांनाही भिती वाटते हेच खरं…     

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.