कल्पना चावलाच्या गावची दुसरी मुलगी अंतराळात प्रवास करणार आहे
कल्पना चावला आपल्या भारताची पहिली महिला आंतराळवीर. हरियाणाच्या करनाल मधून आलेल्या या कल्पनाने सगळ्या जगात आपल्या भारताचं नाव कमावलं. पण दुर्दैवाने काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा परतीच्या प्रवासात मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याच्या वेदना आजही सगळ्या भारतीयांच्या खारकरून करनाल वासीयांच्या मनात ताज्या आहेत.
पण असं असताना करनालचीचं एक कन्या पुन्हा एकदा अंतराळात झेप घेणार आहे. करनाल भागातील इंद्री येथील रहिवासी असलेल्या सुरभीची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे तिच्या बरोबरचं करनाल मधल्या प्रत्येक घरात पुन्हा एकदा जल्लोषाचे वातावरण आहे.
सुरभीची निवड झाल्यानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या मुलीच्या या कामगिरीचा पालकांनाही अभिमान वाटत आहे. इस्रोमध्ये निवड झाल्याच्या आनंदात करनाल रहिवासी आणि नातेवाईकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसं तर सुरभीने आपलं करीयर पूर्णपणे वेगळं निवडलं होतं. वायएससी विद्यापीठातून सुरभीने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलेलं. यानंतर तिने गेट परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि काही काळानंतर तिला टीसीएस कंपनीत नोकरी मिळाली.
त्यानंतर तिची बीएसएनएलमध्ये जेई पदावर निवड झाली. उच्च शिक्षणामुळे चांगली नोकरी मिळाली त्यामुळे तिला पगारही चांगलाचं मिळत होता. पण तिच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुरभीने सांगितले की, जेव्हा ISRO ने एकाच वेळी 100 उपग्रह प्रक्षेपित केले तेव्हा तिच्या मनात इस्रोसोबत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. आपणही इस्त्रो सोबत काम करून आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावावा. असं तिला वाटायला लागलं.
आणि असं म्हणतात ना की, मनापासून इच्छा असेल तर संपूर्ण जग आपल्यासमोर झूकतं,असचं काहीसं सुरभी सोबत सुद्धा घडलं आणि तिचे हे स्पप्न सुद्धा पूर्ण झालं.
ISRO च्या स्पर्धा परीक्षेत सुरभी ऑल इंडिया रँक 8 मध्ये आली आणि तिची ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. सुरभीने या यशाचे संपूर्ण श्रेय तिच्या पालकांना दिले, कारण पालकांनीचं तिला संपूर्ण पाठिंबा दिला होता. तिच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला ज्याचे निकाल आज सर्वांसमोर आहेत.
आपल्या मुलीच्या या यशाबद्दल वडील बलदेव राज आणि आई वीणू यांनी आनंद व्यक्त करताना म्हंटले की, त्यांना विश्वास होता की आपली मुलगी ज्या पद्धतीने मेहनत आणि स्वत: ला झोकून देऊन शिक्षण घेत आहे , तिला एक दिवस नक्कीच यश मिळेल. आणि आज तिने ते सिद्धही केले.
युवकांना संदेश देताना सुरभीने म्हंटले की, प्रत्येक ध्येय मेहनतीने गाठता येते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत रहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
हे ही वाचं भिडू :
- कल्पना चावलाच्या पावलावर पाऊल ठेवत भारताची तिसरी लेक अंतराळात सफर करणार
- कल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येत
- भिडू ! भारतीय वंशाचा एक माणूस आता थेट चंद्रावर दिसू शकतो.