जत्रेत तमाशाचा फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर थेट न्यूयॉर्कला जाऊन पोहचल्या..
मंचावर एकदम अंधार आणि लावणीच्या सुरवातीला वाजणारा ढोलकीचा तोडा, जोडीला घुंगराची साथ , ढोलकीवाल्याच्या कडाडणाऱ्या थापेवर मान हलवणारा प्रचंड तमाशा रसिक समुदाय, भरगच्च रोषणाई आणि पायात घुंगरांचे चाळ बांधून प्रवेश घेणाऱ्या सुरेखा पुणेकरांच्या आवाजातील ही लावणी
या रावजी तुम्ही बसा भावजी
कशी मी राखू तुमची मर्जी …..
ही लावणी म्हणजे सुरेखा पुणेकरांनी मराठी संगीत जगताला दिलेली एक अप्रतिम भेट आहे. याच लावणीतील सुरेखा पुणेकरांची अदाकारी जर तुम्ही बघितली असेल तर तुम्ही चांगले रसिक आहात.
सुरेखा पुणेकर जेव्हा ही लावणी सादर करतात तेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्या , शिट्ट्यांचा नुसता गजर होतो. फेटे उडवले जातात. गावोगावच्या जत्रांमधले सुरेखा पुणेकरांचे कार्यक्रम असो किवा पुण्यातल्या बालगंधर्व मधले नटरंगी नार चे कार्यक्रम असो , लावणीची झिंग काय असते हे तुम्हाला कळेल.
लोककलांमधील सगळ्यात जास्त लोकप्रिय प्रकार म्हणजे लावणी. ज्या वेळी तमाशा आणि लावणी हा विषय निघेल तेव्हा ही लावणी कायम वरच्या रांगेत तुम्हाला दिसेल. प्रत्येक तमाशात या लावणीची फर्माईश केली जाते. या लावणीने मराठी प्रेक्षकांची तमाशातली गोडी टिकवून ठेवली आहे. ही लावणी कितीही वेळा ऐकली तरी आपण कंटाळत नाही.
चवली पावलीचा तमाशा ते न्यूयॉर्क मधला लावणी महोत्सव असा खडतर ज्यांचा प्रवास होता अशा सुरेखा पुणेकरांबद्दल आपण जाणून घेऊया.
मंचावर नाचून , गावून अदाकारी करून लावणी सादर करणाऱ्या सुरेखा पुणेकर या एकमेव आहेत.
सुरेखा पुणेकरांचा जन्म पुण्यात झाला. घरची परिस्थिती गरिबीची होती. त्या कधीही शाळेत गेल्या नाही लावणीलाच शिक्षण मानलं. त्यांच्या वडिलांचा बैलगाडीचा तमाशा होता कोंडाजी टाकळीकर नावाने. त्यामुळे आपसूकच त्यांचा तमाशात प्रवेश झाला. त्यांच्या बहिणी , आई असा सगळा परिवार तमाशा फडात होता. त्यांचा तमाशा हा चवली पावलीचा तमाशा होता. यात कलाकार लोकांना अदाकारी करत प्रेक्षकांकडून पैसे घेऊन यायचं आणि परत नाच करायचा असा हा प्रकार होता.
उन्हाळ्यातील जत्रांचे सीजन संपल्यावर त्यांनी अक्षरशः पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामे सुद्धा केली आहेत. घरकामातून महिन्याकाठी मिळणाऱ्या ३० रुपयांपैकी त्यांनी पंधरा रुपयांत कथकचा क्लास लावला आणि उरलेले पंधरा रुपये घरखर्चाला आईकडे देत असत. कामाबरोबर कलेची गोडी त्यांनी जोपासली आणि टिकवली सुद्धा.
वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी त्यांनी दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात प्रवेश केला. तिथे त्यांची मेहनत आणि चिकाटी दिसून आली . अशा बऱ्याच तमाशांमध्ये त्यांनी कामे केली आणि त्यांना जाणवलं की आपला स्वताचा तमाशा फड आपण उभा केला पाहिजे. पण आर्थिक अडचण समोर आली तेव्हा अनेक चाहत्या लोकांनी आणि कलाकारांनी मिळून त्यांना मदत केली आणि त्यांचा तमाशा फड उभा राहिला. या तमाशाचं नाव होतं ,
” कोंडीबा टाकळीकर यांच्या कन्या लता सुरेखा पुणेकर यांचा तमाशा ”
फड तेजीत सुरु झाला , तमाशाला गर्दी होऊ लागली ,जत्रांच्या सुपाऱ्या येऊ लागल्या. एका गावातल्या जत्रेच्या ठिकाणी अजून एक तमाशा फड होता पण सुरेखा पुणेकरांच्या लावणीसाठी तुफ्फान गर्दी लोकांनी केली होती याने बाजूचे तमासगीर चिडले आणि त्यांनी सुरेखा पुणेकरांच्या फडावर हल्ला केला . या हल्ल्यात सुरेखा पुणेकरांच्या बऱ्याच लोकांना दुखापत झाली, फडाच नुकसान झालं , तिथून परतताना त्यांची जीप दरीत जाता जाता वाचली. या प्रकाराने सुरेखा बाईनी तमाशा बंद करण्याचा निर्णय घेतला.
पुण्यात येऊन छोटेखानी शो करायला त्यांनी सुरवात केली. ही अशी सादरीकरण करत असताना त्यांना नारायणगावच्या लावणी महोत्सवाचं आमंत्रण आलं. या लावणी महोत्सवाने त्यांचं जीवन बदललं. या महोत्सवात बरीच दिग्गज मंडळी उपस्थित होती त्यात अमरीश पुरी,नौशाद ही लोकं उपस्थित होती. या महोत्सवातील त्यांच्या लावणीच्या सादरीकरणाने उपस्थित लोकांची मने जिंकली.
त्यांचं सादरीकरण बघून नौशादजी स्टेजवर आले आणि त्यांनी सुरेखा पुणेकरांना भेट म्हणून ५०० रुपयाची नोट दिली. त्यांचं कौतुक करताना नौशादजी म्हणाले गाणं, नाचण आणि सादरीकरण हा संगम मी आयुष्यात पहिल्यांदाच तुमच्या रूपाने पहिला. या पुढे जाऊन खूप मोठ्या कलाकार होणार असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले.
अकलूज मधील मराठा सेवा संघ यांच्यातर्फे मंदिराच्या देणगीसाठी मदत म्हणून सुरेखा पुणेकरांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या वेळी त्यांनी एक नवीनच आविष्कार केला तो म्हणजे नटरंगी नार. यात पारंपारिक आणि काही सिनेमातील अशा एकूण ३० लावण्या या कार्यक्रमात होत्या. हा कार्यक्रम चांगलाच गाजला, प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. या कार्यक्रमातून तब्बल ३५ हजार रुपये गोळा झाले. या घटनेमुळे त्यांची लावणी ही महाराष्ट्रभर पोहचली.
असंख्य अडचणींना तोंड देता देता त्यांनी एक वेगळाच प्रयोग लावणीच्या इतिहासात केला . लावणीला यश आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी पुण्यात संक्रांतीच्या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष लावणी महोत्सव ठेवण्यात आला. या लावणी महोत्सवात येताना प्रवेशद्वारावर महिलांना शिट्टी, गजरा आणि तिळगुळ देऊन त्यांना आत पाठवलं गेल. या कार्यक्रमावेळी सगळं नाट्यगृह तुडुंब भरून गेल होतं. केवळ महिलांनीच हा कार्यक्रम हाउसफुल केला.
याआधी लावणी ही फक्त पुरुषांसाठीच सादर केली जायची आणि फक्त पुरुष मंडळीच लावणी पाहू शकत होती. सुरेखा पुणेकरांनी ही पद्धत मोडीत काढून महिलांसाठीही लावणी सुरु केली. लावणी महोत्सवात त्या नेहमी सांगतात की लावणी बघायला येताना तुमच्या घरादारालाही सोबत घेऊन या. त्यांच्या या नवीन प्रयोगाने लावणीच्या कार्यक्रमाना भरपूर गर्दी होऊ लागली, तिकीटबारी वरची गर्दी ओसंडून वाहू लागली.
पुढे त्यांनी भरपूर लोकगीतांचे अल्बम गायले. आनंद शिंदेंसोबत त्यांची गाणी चांगलीच गाजली. कारभारी दमानं हे मूळ गाणं प्रल्हाद शिंदेंच होतं पण त्यावर सुरेखा पुणेकरांनी अदाकारी करून त्याला लाखो हिट्स मिळवून दिले.
टीव्हीवर त्यांच्या लावण्या झळकू लागल्या. एका लावणीच्या रियालिटी शोच्या त्या प्रशिक्षक होत्या. आता त्या लावणीच्या शिक्षिका सुद्धा आहेत.
न्यूयॉर्कमध्ये जाऊन लावणी सादर करणाऱ्या त्या एकमेव आहेत.
लावणीप्रतीची निष्ठा , लावणीवर असलेली श्रद्धा या विषयी त्या भरभरून बोलताना दिसतात. तमाशा कलावंतांच्या अडचणी बेधडकपणे मांडताना दिसतात.
सुरेखा पुणेकरांच्या इतर लावण्यासुद्धा भरपूर गाजल्या. त्यापैकी काही,
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…….
झाल्या तिन्ही सांजा……
कारभारी दमानं, होऊद्या दमानं ……..
हे ही वाच भिडू.
- पोटचा मुलगा गेला तरी लावणी कला त्यांनी खेडोपाड्यात पोहचवली..
- लावणीसम्राट पठ्ठे बापूराव आणि पवळाबाई यांच्यावर स्वतःचा लिलाव करायची पाळी आली होती.
- कमाल करणारा ढोलकीपटू महाराष्ट्रात होऊन गेला आहे, त्यांचं नाव राम जामगावकर.
- नेफा सीमेवर १९६२ मध्ये लष्करातील सैनिकांसाठी तमाशा सादर करणाऱ्या विठाबाई नारायणगावकर !