सुरेश भटांच्या गझलेवर नाखूष झालेल्या शाहिरांनी तिथेच त्यांना प्रत्युत्तर देणारी गझल लिहिली

गझल हा प्रकार जगभरात मोठ्या आवडीने ऐकला जातो. हजारो मैलांचा प्रवास आणि साहित्य क्ष्रेत्रातल्या अनेक घडामोडींची स्थित्यंतरे पार करत गझल हा प्रकार भारतीय भाषांमध्ये आपसूक रुजला. भारतभरातल्या जवळपास प्रत्येक भाषेत गझल प्रकार आवडीने लोकं हाताळतात. मराठी गझलेने मराठी रसिकांच्या मनाचा ताबा घेतला तो कायमचाच.

मराठी माणसांनी गझल ऐकली , वाचली आणि गायली ती म्हणजे गझल प्रकाराचे अनभिषिक्त सम्राट सुरेश भट यांच्याकडून.

शृंगार रसाने ओतप्रोत भरलेले प्याले सुरेश भटांनी मराठी रसिकांना बहाल केले. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तरुण आहे रात्र अजूनही , केव्हा तरी पहाटे अशा अनेकविध गझला भटांनी लिहिल्या. मराठी काव्यसृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे सुरेश भट.

समाजातल्या सर्वसामान्य माणसांचा एल्गार त्यांनी कुणाच्याही टीकेची कदर न करता बेफिकीरीने मांडला. सुरेश भटांनी गझलेला केवळ प्रेयसी आणि प्रेमप्रकरणांपुरतं मर्यादित न ठेवता सामाजिक आणि राजकीय विषयही तितक्याच ताकदीने लोकांसमोर मांडले. गझलेइतका प्रभावी दुसरा कलाप्रकार नाही याची जाण सुरेश भटांना होती. गझलेचा त्यांनी अत्यंत कुशलतेने वापर केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी पुढे बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. त्यांनी लिहिलेली भीमवंदना, तुझाच गौतमा पडे हि त्यांची गीते प्रचंड गाजली. माधव ज्युलियन यांनी मराठीत आणलेला गझल प्रकार पुढे सुरेश भटांच्या रूपाने त्याचा वटवृक्ष तयार झाला.

सुरेश भेट हे एक उत्तम कवीही होते. त्यांच्या कवितांची चोपडी हृदयनाथ मंगेशकर यांना फुटपाथवर सापडली होती. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.

लोकसंगीताचा बाप माणूस विठ्ठल उमप आणि गझलसम्राट सुरेश भट यांचा हा गझलेचा गाजलेला किस्सा.

आंबेडकरी चळवळीत गाणी गात असताना त्यातल्या कव्वाल्या गात असताना विठ्ठल उमप यांचे बरेचशे मुसलमान मित्र होत गेले. तिथून त्यांना मुस्लिम मित्रांमुळे नज्म,हम्द [प्रार्थना ], गझल हा प्रकार कळायला लागला, आणि आवडूही लागला. बऱ्याच गझलाही विठ्ठल उमप लिहायचे. लोकगीते, कोळीगीते अशा प्रकारावरून थेट गझल प्रकार त्यांना आवडू लागणे आणि त्यात गझल लिहू लागणे हे कमालीचं वैशिष्ट्य होतं.

त्यावेळी त्यांना सुरेश भट आणि त्यांच्या गझला यांची ओळख झाली. सुरेश भटांच्या गझलांचे ते चाहते होते आणि भटांवर विठ्ठल उमपांचा खूप जीव होता.

शिवाजी मंदिर नाट्यगृहात सुरेश भटांच्या कवितेचं काव्यसंमेलन सुरु होतं. सगळं नाट्यगृह तुडुंब भरून गेलं होतं. त्यांच्या गाण्याची एक युनिक स्टाईल होती. दमदार आवाज आणि रसरशीत कविता याने सगळं पब्लिक धुंद झालं होत. त्यावेळी त्यांनी त्यांची एक गझल गेला सुरवात केली , तिची सुरवात अशी होती कि,

देखावे बघण्याचे वय निघून गेले

रंगांवर बोलण्याचे वय निघून गेले….

त्यावेळी विठ्ठल उमप प्रेक्षकांमध्ये बसून भटांच्या कविता ऐकत होते. त्यांना या ओळी खटकल्या, वय निघून गेले ? हे मला काय पटत नाही म्हणत ते उठले. तोवर मध्यंतर झालं आणि ते बाहेर आले. चहा घेऊन ते येरझाऱ्या मारत होते त्यांच्या मनात एकच चालू होत कि इतक्यात वय निघून गेले हे काही बरोबर नाही. मग त्यांना चहा घेता घेता एक पॉझिटिव्ह ओळ सुचली आणि त्यांनी पटकन कागदावर ती लिहून घेतली कि ,

हि रात जगण्याचे हे वय अजून आहे

बेहोष नाचण्याचे हे वय अजून आहे

वयमान कितीक जाहले वयात काय आहे

आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे…..

वयाच्या ८१ व्या वर्षी विठ्ठल उमप हि गझल लिहितात तेव्हा मनाने तरुण असलेल्या या कलाकाराची प्रचिती येते.

कार्यक्रम संपल्यावर त्यांनी भटांना हि गझल ऐकवली आणि म्हणाले कि वय अजून आहे, यावर भटांनी त्यांना आलिंगन दिलं. सुरेश भट आणि विठ्ठल उमप यांचा स्नेह विशेष होता, तसेच त्यांची मैत्रीही तितकीच पक्की होती. 

पुढे विठ्ठल उमपांनी ती ‘ याद साजनाची नावाने ‘ गझल अल्बम लिहिला आणि त्यांच्या मुलाने नंदेश उमपांनी तो प्रदर्शित केला.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.