विलासराव देशमुखांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली ती सुरेश कलमाडी यांच्या डावपेचामुळेच

गोष्ट आहे २००३ सालची. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. युतीच्या शासनाला हरवून सत्तेत आलेल्या या आघाडी सरकारला चालवणे बरंच कसरतीचा काम होतं. विरोधी पक्षाचे नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असे दिग्गज नेते आपल्या भाषणांनी सभागृह घुमवत होते.

अविश्वास ठराव, आमदारांची फुटाफुटी असे अनेक महादिव्य पार करत विलासरावांचं सरकार चाललं होतं.

अचानक एक दिवस दिल्लीतून बॉम्ब पडला. विलासरावांची गच्छंती करायची.

कारण तर विशेष काही नव्हतं. विलासरावांच्या विरुद्ध मोठे आरोप नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीला चांगलं जुळवून घेतलंय याचा दिल्लीकरांना प्रॉब्लेम होता. विलासराव आपल्या कारभाराबद्दल सिरीयस नाहीत, त्यांच्या मुलाच्या सिनेमाकडे त्यांचं लक्ष आहे वगैरे वगैरे कारणे देत भाकरी पलटवायचं चाललं होतं.

काँग्रेसमधले वेगवेगळे गटतट ऍक्टिव्ह झाले होते. आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी सगळ्यांची चढाओढ लागली होती. कित्येकजण शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत होते. पण त्यात एक नाव सगळ्यात आघाडीवर होतं, ते होते पुण्याचे कारभारी सुरेश कलमाडी.

असं म्हणतात कि विलासराव देशमुखांना हटवण्यात सर्वात आघाडीवर सुरेशभाई कलमाडी यांचे डावपेच होते.

कुशल क्रीडा संघटक, उत्कृष्ट इव्हेन्ट मॅनेजर,प्रसारमाध्यमांचा हुशार नियंत्रक, ढोर मेहनत घेणारा कार्यकर्ता आणि यशस्वी राजकीय नेता असे अनेक तुरे कलमाडींच्या शिरपेचातील फेट्यात होते. एकेकाळचा हा भारताचा लढाऊ पायलट शरद पवारांच्या मदतीने पुण्याचा कारभारी बनला होता. पुढे त्यांची महत्वाकांक्षा एवढी प्रचंड वाढली कि ते शरद पवार गटातून बाहेर पडले आणि स्वतःचा वेगळा गट निर्माण केला.

पुण्याची एकहाती सत्ता कलमाडी यांच्या हातात होती. अनेक दिग्गज नेते मंडळी जुने जाणते नेते यांना मागे सारून कलमाडी पुण्याचे कारभारी बनले होते. मोठमोठे इव्हेंट्स करून देशभरात गाजत असले तरी त्यांचा पुण्यावरचा होल्ड कमी झाला नव्हता. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून ते गांधी घराण्यापर्यंत प्रत्येकाचा विश्वास जिंकलेले कलमाडी पक्षाच्या राजकारणापासून पुढे गेले होते.

त्यांच्या समोर आता एकच लक्ष्य खुणावत होतं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद.

याची कुणकुण विलासरावांना लागली होती. आपल्या राजकीय जीवनाची सुरवात पुण्यापासून करणाऱ्या विलासराव देशमुखांना पुण्यात देखील पुण्यावर वर्चस्व निर्माण करायचं होतं. त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे बाळासाहेब शिवरकर, हर्षवर्धन पाटील, रामकृष्ण मोरे, उल्हास पवार हि मंडळी पुण्याशी संबंधित होती. त्यांच्या माध्यमातून सुरेश कलमाडी यांच्यावर वचक बसवायचा त्यांचा प्रयत्न होता.

दोन्ही दिग्गज नेत्यांची चढाओढ पक्षांतर्गत चढाओढ आता बाहेरच्यांच्या देखील लक्षात येऊ लागली होती.

या वादाचे पडसाद दिल्लीतही उमटू लागले. एरव्ही व्यवस्थित चालू असलेल्या विलासरावांच्या सत्तेला तडे जाऊ लागले. तरीही विलासरावांना मोठा आत्मविश्वास होता. त्यांच्यावर पक्षश्रेष्टींची इतराजी व्हावी असं मोठं कोणतं कारण देखील नव्हतं. मुलाच्या सिनेमावरून टीकाटिप्पणी झाली होती पण त्यात दम नव्हता.

विलासरावांना हादरवणारी पहिली घटना पुण्यातच झाली.

झालं असं होतं की जेष्ठ शास्त्रीय गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या एका कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पुण्याला आले होते. प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना देखील या कार्यक्रमात उपस्थित राहावं लागणार होतं.

वाजपेयी नेहमीच्या स्टाईलने भाषणाला उठले. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी सहा महिन्यापुर्वीची भीमसेन जोशी यांची भेट आणि तो प्रसंग सांगितला. आजकालचे युती व आघाड्यांचे राजकारण यामुळे उद्या काय होईल कधी आपलीखुर्ची मोकळी करावी लागेल याचा काहीच अंदाज सांगता येत नाही असं ते म्हणाले. त्यानंतर काही क्षण थांबले, आपला भाषणातला वर्ल्ड फेमस पॉज घेतला आणि मागे  वळून विलासराव देशमुखांच्या कडे वळून पाहिलं, खट्याळ हसत म्हणाले,

“क्यूँ विलासराव ?”

विलासराव देशमुख आधी अवाक झाले. काही क्षणात सावरून हसत हसत मान डोलावली. सगळं सभागृह हास्याच्या स्फोटाने गाजून गेलं. वाजपेयींनी राजकारणातली संदिग्धता, महाराष्ट्रातदेखील विलास रावांना राष्ट्रवादी बरोबर आघाडी चे सरकार चालवण्यासाठी करावी लागत असलेली कसरत यावर गंमतीदार टिप्पणी केली. विलासरावांनी देखील खिलाडू वृत्तीने ती स्वीकारली.

खरा धक्का तर काहीच दिवसात बसला. वाजपेयींचा तो कार्यक्रम होऊन आठवडाही झाला नसेल मात्र तेवढ्यातच दिल्लीहून बातमी आली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सोनिया गांधी यांनी राजीनामा द्यायला लावला आहे.

वाजपेयी आणि पुण्याचे कारभारी सुरेशभाई कलमाडीयांच्यातील मैत्रीमुळे विलासरावांच्या राजीनाम्याबद्दल वाजपेयींना आधीच बातमी पोहचली होती असं म्हणतात.

सुरेश कलमाडी यांनी आपलं संपूर्ण वजन वापरलं, सामदाम दंड भेद याचा वापर करून विलासरावांना हटवण्यात तर ते यशस्वी ठरले पण एवढं करून मुख्यमंत्रीपद त्यांना जिंकता आलं नाही. मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, त्यांच्या कामाच्या स्टाईलबद्दल जेष्ठ नेत्यांमध्ये असलेली नाराजी, जातीय समीकरणे अशा अनेक कारणांमुळे सुरेश कलमाडी स्पर्धेतून बाहेर फेकले गेले.

पक्ष निरीक्षक म्हणून आलेल्या प्रणब मुखर्जी यांनी अखेर विलासर्वांचेच अगदी जिवाभावाचे मित्र असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. सुरेश कलमाडी यांनी प्रचंड प्रयत्न करून विलासरावांची घालवलेली खुर्ची अनपेक्षितपणे सुशीलकुमारांच्या पदरात आयती आली.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. TM Official says

    Vilasrao Deshmukh Was a great leader we had

Leave A Reply

Your email address will not be published.