मुंबईत विधान परिषदेवरून कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवारामुळे आघाडीत बिघाडी होणार का ?

येत्या १० डिसेंबरला मुंबईची विधान परिषदेची निवडणूक जवळ आली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी सोबत लढणार हे वाटत असलं तरी यात आता बिघाडी ची सुरुवात झाली आहे. त्याचे निमित्त ठरले ते म्हणजे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कोपरकर हे !!!

मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी काल अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय, कोपरकर यांचा अर्ज कायम राहिल्यास मुंबई मतदारसंघासाठी निवडणूक अटळ आहे हे मात्र नक्की..

विधान परिषदेच्या पाच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.

या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने माजी आमदार राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

दोनच जागांसाठी ही निवडणूक होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती.  

आधीच सेनेने भाजपच्या विरोधात तगडा उमेदवार दिला असतांना सुरेश कोपरकर यांच्या एंट्रीने महाविकास आघाडीचं त्रिकुट बिघडतं कि काय याची मुंबईच्या राजकीय वर्तुळात कुजबुज चालू आहे.

मुंबई महापालिकेत उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ नाहीये त्यामुळे कॉंग्रेस ने शांत राहत  इथून उमेदवार द्यायचं टाळलं. पण हि निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून शेवटी कॉंग्रेसचे कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला… त्यामुळे मुंबईच्या विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होणार आहे.

जरी त्यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांना काँग्रेसचे समर्थन असल्याची चर्चा आहे. 

 मात्र सुरेश कोपरकर यांच्या उमेदवारीमुळे सेनेला आणि सेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांना दगाफटका होणार का? 

तर हे आधी पाहूया…या निवडणूकीचा कार्यक्रम कसा असणार आहे ?

२४ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी केली जाणार.

२६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. 

१० डिसेंबर रोजी मतदान असणार आहे. 

११ डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल असणार आहे. 

२६ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेता येण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुरेश कोपरकर हे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतात कि कायम करतात हे पाहणे महत्वाचे आहे.  कारण सेनेच्या योजनेनुसार त्यांचा उमेदवार मागे घेणे आता शक्य नाही आणि ते मागे घेण्याची जोखीम सेना कधीही घेणार नाही..कारण सेनेचा इतिहासच आहे पक्ष कधीही मुंबईच्या कोणत्याही जागेवरून माघार घेत नाही.

त्यामुळे सुरेश कोपरकर मैदानात राहतात की माघार घेतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे..

पण तरीही अशीही चर्चा मुंबई महापालिकेत चालूये कि, सुरेश कोपरकर मैदानात टिकून राहो अगर न राहो त्याचा फारसा परिणाम शिवसेनेवर होणार नाही.  कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी ७७ मतांची अवश्यकता आहे. शिवसेना आणि भाजपकडे त्यापेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येणार असल्याचं सांगितलं जातंय म्हणजेच थोडक्यात हि निवडणूक बिनविरोध झाली असती. 

पण जर कोपरकर उतरले तर त्यांना किती मते मिळणार? 

एकंदरीत मतांचं गणित पाहिलं तर लक्षात येते कि, भाजपकडे ८३ तर शिवसेनेकडे ९९ मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे फक्त ३० आहेत, आणि राष्ट्रवादी कडे फक्त ८ आहेत, सपाकडे ६, एमआयएम २  आणि मनसेकडे एक मत आहे. 

जरी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा आणि एमआयएमची मते एकत्रित केले तरी जिंकून येण्यासाठी   कोपरकर ७७ मते मिळवू शकत नाहीत. त्यामुळे कोपरकर जिंकून येण्यासाठी स्वतःच काय वेगळं गणित मांडतात कि, शिवसेना किंवा भाजपचे मते फोडण्यात कोपरकर यशस्वी ठरतात हेच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यात गुप्त मतदान होणार असल्याने त्याची उत्सुकता जास्त वाढलीये.

पण एक मात्र आहे, कोपरकरांच्या निमित्ताने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होता होता राहिली जी आता चांगल्याच चुरशीची होणार आहे..पण काहीही म्हणा हि निवडणूक महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.

हे ही वाचं भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.