हिंदी भाषेवरून थेट महात्मा गांधींनाच नडणारे ते ‘निरालाच’ असू शकतात…

होय…थेट महात्मा गांधींना नडणारे थोर साहित्यिक होऊन गेले त्यांचं नाव ‘निराला’ सूर्यकांत त्रीपाठी. निरालाजी प्रख्यात हिंदी कवी. 

वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी असा माणूस त्यात कवी, साहित्यिक म्हणल्यावर त्यांचं व्यक्तिमत्व विशेष असंच होतं. त्यांच्याबद्दल आज फारसं कुणाला माहिती नसावं.

तर निराला यांचा जन्म व बंगालचा मात्र यांचे मूळ घराणे उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील होते. त्यांचे बालपण बंगालमध्ये गेल्यामुळे त्यांची मातृभाषा देखील बंगाली होती. कालांतराने ते बंगाल सोडून आपल्या मूळ गावी आले. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांचे शिक्षण दहावी-पर्यंत पूर्ण झाले. बालपणीचा आई वडील गेले पुढे पत्नी वारली त्यामुळे कुटुंबाचा सर्व भार त्यांच्यावर येऊन पडलं. मोठ्या मेहनतीने जिद्दीने ते हिंदी भाषा शिकले आणि साहित्य निर्मितीही करू लागले.

प्रचंड दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती. आर्थिक संघर्षाबरोबरच साहित्यिक मान्यतेसाठीही त्यांना संघर्ष करावा लागला होता. जीवनभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे. 

असंही म्हणलं जातं कि, उत्तरायुष्यात मानसिक तोल ढासळल्यामुळे त्यांच्या वृत्तीत विक्षिप्तपणा आला होता. कालांतराने त्यांची मुलगी वारली. 

त्यांच्या मुलीची म्हणजेच सरोज चे निधन त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुःखी काळ ठरला. 

या घटनेमुळे निराला संपूर्णपणे कोसळले होते. तिच्या आठवणी त्यांनी एक अद्भुत रचना केली. भारतीय हिंदी साहित्य मधील ही रचना पहिली ‘शोकरचना’ ठरली. 

ती म्हणजे ‘सरोजस्मृती’…हि रचना हिंदी साहित्यातील एक अद्भुत रचना मानली जाते.

असो तर आता आपण मूळ किस्स्यावर येऊ, एकदा हिंदी भाषेवरून महात्मा गांधी आणि निराला यांच्यात वाद निर्माण झाला होता. 

महात्मा गांधींचं हिंदी भाषेवरील प्रेम आपल्या सर्वांनाच माहितीये. निराला आणि महात्मा गांधी यांच्यातील वादानंतर असेही म्हणले जाते कि, गांधीजींना नंतर त्यांची चूक कळली होती तरीदेखील निराला जी महात्मा गांधी यांच्यावर नाराज झाले होते.

ही घटना तेंव्हाची आहे जेंव्हा महात्मा गांधी यांना हिंदी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे सभापती म्हणून संमेलनाच्या मंचावर भाषण करत होते.  त्याच भाषणात गांधी असं काही बोलले कि त्यामुळे त्यांना निरालाजींची माफी मागावी लागली होती. 

गांधी आपल्या भाषणात म्हणाले, “मी तुलसीदास यांचा पुजारी आहे त्यामुळे मला हिंदी भाषा विशेष करून त्यांच्याचमुळे आवडते. पण माझा प्रश्न हा आहे की या हिंदी भाषेत रवींद्रनाथ टागोर कुठे आहेत? हिंदी मध्ये कोणी जगदीश बोस आहेत का?” 

गांधीजी इथेच थांबले नाही तर पुढे ते असंही बोलले की, “कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर या महान व्यक्तीला त्या भाषेत शोधलं जाईल”.

महात्मा गांधीजींनी केलेल्या वक्तव्याला सूर्यकांत त्रीपाठी निराला सहमत नव्हते, त्यांनी नाराज होऊन या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गांधीजींना भेटायचं ठरवलं. बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली आणि या भेटीत निराला आणि गांधीजी यांच्यात बरेच वाद झालेत. 

निराला महात्मा गांधी यांना म्हणाले की, तुम्ही पंडित बनारसी दास चतुर्वेदी यांचे नाव कसे काय विसरलात? त्यावर महात्मा गांधीजींनी उत्तर दिले की, मला हिंदी साहित्याबद्दल तितकंसं माहिती नाही.

यावर निराला यांनी प्रश्न केला कि, ” जर तुम्ही हिंदी भाषा जाणत नाही मग तुम्हाला असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, कि हिंदी साहित्यामधील रवींद्रनाथ ठाकूर  हे कोण आहेत? तुमच्या या वक्तव्याचा हिंदी साहित्यिकांवर काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार केला आहात का?”

त्यावर गांधीजी उत्तरले,  “मी जे काही बोललो त्याचा अर्थ तुम्ही वेगळाच काढला आहात”. तरीदेखील रागात असलेले निराला जी पुढे बोलतच राहिले. 

त्यांनी धडधडीत गांधीजींना ऐकवले की, तुम्ही रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सारखे साहित्यिक हिंदी मध्ये आहेत हे तुम्हाला देखवत नाहीत. परंतु प्रिन्स द्वारकानाथ ठाकूर यांचे नातू किंवा नोबल पुरस्कारप्राप्त कुणीही साहित्यिक तुम्हाला महत्त्वाचे वाटतात. 

या वादविवादानंतर गांधीजींना त्यांची चुक उमगली होती. तरी देखील निराला जी गांधीजींवर नाराज होते. त्यांना नाराजीमध्ये त्यांनी एक उपरोधीक काव्यरचना देखील केली होती.

असे निडर साहित्यिक असणारे निराला जी हिंदी साहित्यात नवे नवे प्रयोग करणारे साहसी कवी होते.. छंदांच्या बंधनांना झुगारून हिंदीमध्ये मुक्तछंदात कविता लिहिण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली, त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांनामुळे हिंदी साहित्यात मुक्तछंद सुरु होण्यामध्ये निरालांचाच वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्या मुक्तछंदातील काव्यात आशयाला धरून लयबद्धता जाणवतेच शिवाय त्यांच्या लिखाणात बंगाली आणि इंग्रजी भाषेतील साहित्याचा प्रभाव देखील जाणवतो. 

राम की शक्तिपूजासारख्या त्यांच्या काव्यरचनेत ‘पौरुष व ओज’यांचा प्रत्यय येतो. निसर्गप्रेम, सौंदर्याची आसक्ती, उत्तुंग कल्पनाशक्ती, चोखंदळ शब्दयोजना, सूक्ष्मता, शृंगार, कारूण्य, वात्सल्य, हास्य, उपरोध असे अनेक भाव त्यांच्या साहित्यात आढळतात.  याचबरोबर ते काळानुसार त्यांच्या साहित्यामध्ये वास्तवाचे परखडपणे चित्रण करीत. ‘भिक्षुक’, ‘बनबेला’, ‘कुकुरमुत्ता’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यांच्या विशेष गाजल्या.

त्यांची ‘वह तोडती पत्थर’ ही रचना तर विसरल्या जाणारच नाही अशी आहे. त्यांच्या अंगी असलेली सामाजिक संवेदनशीलता त्यांच्या कवितामध्ये उतरायची त्यामुळे त्यांच्या कविता आजही जिवंत वाटतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.