खरच सूर्यकुमार न्यूझीलंडकडून खेळू शकतो का..? यापूर्वी कोणते खेळाडू दूसऱ्या देशाकडून खेळलेत.

सध्या आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवची जगभरात चर्चाय. मुंबईचा हा गडी विराट कोहलीला पण टशन देतोय, नुसता टशन नाही तर एक हाती मॅच पण जिंकून देतोय.

आयपीएल, रणजी, दुलीप सगळीकडं त्यानं खोऱ्याने रन्स बनवलेत. पण कितीजरी राडा केला तरी त्याला भारताच्या ब्लु जर्सीचा चान्स मिळालेला नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवणे हे सूर्याचं स्वप्न राहिलेलं आहे. आजही त्याचे वडील प्रत्येकवेळी टीम जाहीर झाली की त्याच नाव शोधत असतात.

नुकताच ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय टीमची घोषणा झाली पण त्यातही त्याचं नाव आलं नाही. सूर्यापेक्षाही त्याचे फॅन्स जास्त निराश झाले. आज सूर्यकुमार यादव वयाच्या तिशीला पोहचला आहे. टीम मध्ये येण्यासाठी त्याने काय करायचं बाकी राहिलंय हे कोणीही सांगू शकत नाहीय.

अशातच एक बातमी आली आणि सगळ्या देशात खळबळ उडाली. सुर्याला न्यूझीलंडच्या माजी खेळाडूंनी त्यांच्या टीम कडून खेळण्याची ऑफर दिली. या ऑफर मुळे काही फॅन्सच्या भावना दुखावल्या तर काही जण म्हणू लागले की बीसीसीआय जर सूर्यावर अन्याय करत असेल तर त्याने किवी टीमकडून खेळले पाहिजे. काहीजण तर थेटपणे म्हणत आहेत,

सुर्याला मुंबईचा दुसरा अमोल मुझुमदार होऊ देणार नाही. त्यासाठी त्याला कोणताही त्याग करायला लागू दे.

खरोखर सूर्यकुमार यादव न्यूझीलंडची ऑफर स्वीकारेल का माहित नाही पण बऱ्याच जणांनी शंका विचारल्याप्रमाणे असं करता येऊ शकत का? असं यापूर्वी घडलंय का याची उत्तरे आपण बोल भिडू तर्फे शोधू.

आयसीसीचे इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर्सच्या निवडीचे क्रायटेरिया

१) खेळाडू ज्या देशात जन्मलेला आहे त्या देशाच्या टीम कडून खेळू शकतो.

२) त्या खेळाडूकडे संबंधित देशाचे पासपोर्ट पाहिजे.

३)ज्या देशाकडून खेळायचे आहे त्या देशात तुमचं घर पाहिजे. तिथे तुम्ही ३ वर्षांपासून राहात आहेत याचा पुरावा हवा.

हे झाले नियम. पण नियम अटींना पळवाटा असतात. अशा पळवाटा  वापरून अनेक खेळाडू दोन देशांच्या टीमकडून खेळले आहेत. म्हणजे चंद्रपॉल, रामनरेश सारवान, मॉन्टी पानेसार यांच्यासारखे खेळाडू बद्दल आम्ही बोल्ट नाही. हे खेळाडू जरी भारतीय वंशाचे असले तरी खेळले त्यांच्या जन्मदात्या देशातच.

आपण असे खेळाडू पाहणार आहे जे जन्मले, वाढले, खेळले एका देशात आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केलं वेगळ्याच देशाकडून.

याचं उदाहरण म्हणजे खालील यादी.

१)केव्हिन पीटरसन

इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन मूळचा इंग्लंडचा नाहीच. तो जन्मला दक्षिण आफ्रिकेत. तिथल्या नाताळ प्रांतातील पीटरमारिट्झबर्ग गावात. त्याचे वडील आफ्रिकेचे आणि आई इंग्लंडची. पीटरसनच शाळा कॉलेजचं शिक्षण आफ्रिकेतच झालं. अंडर १६ मध्ये नाव चमकल्यावर त्याने नाताळच्या टीमकडून त्याने फर्स्ट क्लास डेब्यू देखील केलं.

तिथं तो ऑफस्पिनर आणि पार्ट टाइम बॅट्समन होता. एकदा नासिर हुसेनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची टीम आफ्रिकेला गेली होती तिथं त्याने पीटरसनला  खेळताना पाहिलं. त्याची इंग्लंडच्या नॉटिंगहॅमशायर या सुप्रसिद्ध टीमचा फॉरेन प्लेयर म्हणून निवड झाली.

नॉटिंगमकडून खेळताना त्याने आपली बॅटिंग सुधारली. बॉलिंग मागे पडून तो एक आक्रमक फलन्दाज बनला.

कौंटी खेळून परत आल्यावर त्याला वाटले की आपल्या साठी आफ्रिकन टीमचे दार आपोआप उघडेल पण तस झालं नाही. द. आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय टिमममध्ये कोटा सिस्टीम आहे. पीटरसनला याचा फटका बसला. टॅलेंट असूनही आपल्याला संधी मिळणार नसेल तर देश बदलणे हा उपाय आहे असं म्हणत पीटरसन आईच्या माहेरी म्हणजेच इंग्लंडला गेला.

तिथं त्याला चान्स मिळाला. पीटरसनने आपला पासपोर्ट बदलून घेतला. इंग्लंडचा कॅप्टन बनण्याची संधी देखील त्याला मिळाली. मात्र स्मिथ सारखे राष्ट्रभक्त आफ्रिकन खेळाडू शेवट्पर्यंत त्याच्या नावाने बोटे मोडतच राहिले.

२)इम्रान ताहीर

पीटरसन आफ्रिकेतून इंग्लंडला गेला तर इम्रान ताहीर पाकिस्तानमधून आफ्रिकेला आला. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये ताहीर जन्मला. घरची परिस्थिती खराबच होती, गल्लीत रस्त्यावर खेळताना स्पिन बॉलिंग शिकला. लाहोरमध्ये क्रिकेटची मोठी परंपरा आहे. शाळेत असतानाच इम्रान ताहीरला मोठी संधी मिळत गेली. पाकिस्तानच्या अंडर १९ टीमकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली.

देशाच्या अंडर १९ टीमकडून खेळणारा प्रत्येक खेळाडू आज ना उद्या आंतरराष्ट्रीय टीममध्ये संधी मिळेल याच भरवश्यावर असतो. ताहीरला सुद्धा तसेच वाटलं.

फर्स्ट क्लासमध्ये चांगली कामगिरी केल्यावर त्याची पाकिस्तान A कडून खेळायला मिळालं. स्वर्ग त्याच्यापासून फक्त दोन बोटे दूर होता मात्र तो तसा दूरच राहिला. अनेक धडका देऊनही ताहिरला कधीच पाकिस्तान च्या मेन टीम कडून खेळायला मिळालं नाही. मग तो कौंटी खेळायला इंग्लंडला गेला.

ताहिरची गर्लफ्रेंड आणि भावी बायको  दक्षिण आफ्रिकेची होती. २६ वर्षाचा असताना ताहिरने योग्य वेळी डिसिजन घेतला आणि पाकिस्तानसोडून आफ्रिकेची नॅशनॅलिटी स्वीकारली. त्यांच्याकडून खेळताना अनेक विक्रम केले. तिथला तो आजवरचा सर्वात यशस्वी स्पिन बॉलर आहे.

३) अँडी फ्लॉवर

अँडी आणि त्याचा भाऊ ग्रॅण्ट फ्लॉवर मूळचे आफ्रिकेचे. त्यांचा जन्म आफ्रिकेतच झाला. तिथल्याच एका क्रिकेटसाठी फेमस शाळेत त्यांचं शिक्षण झालं. दोघांनाही आफ्रिकेतील स्कुल क्रिकेट गाजवलं होतं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर लवकर संधी मिळणार नाही हे ओळखून ते झिम्बाब्वेला शिफ्ट झाले आणि तिथे १९९२ साली दोघांनाही वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली.

विशेषतः विकेटकिपर असलेल्या अँडी फ्लॉवरने आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. झिम्बाब्वेच्या सर्वात यशस्वी कप्तानांच्या यादीत त्याचं नाव हमखास येतं. मात्र झिमाब्वेच्या क्रिकेटमध्ये  होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून त्याने आवाज उठवला आणि त्याची हकालपट्टी करण्यात आली. परत तो कधीच झिमाब्वेकडून खेळू शकला नाही.

आपला मूळ देश आफ्रिकामध्ये तो परत गेला व काही फर्स्ट क्लास गेम्स खेळले पण त्याच्या कारकिर्दीची तिथेच अखेर झाली.

४)अँड्रयू सायमंड्स

ऑस्ट्रेलियाचा सर्वात वादग्रस्त खेळाडू म्हणजे सायमंड्स. त्याला आपल्या भज्जीने मंकी म्हणून दोन देशात भांडणे होतील एवढी पाळी आणली होती. पण गंमतीची गोष्ट म्हणजे सायमंड्स मूळचा ऑस्ट्रेलियाचा नाहीच. त्याचे खरे वडील वेस्ट इंडिजचे आणि आई स्वीडिश वंशाची. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तो ३ महिन्याचा असताना त्याला ऑस्ट्रेलियाच्या एका कुटुंबाने दत्तक घेतले.

अँड्र्यू सायमंड्स वाढला ऑस्ट्रेलियात. त्याचे दत्तक वडील क्रिकेटचे मोठे फॅन होते. त्यांच्यामुळे सायमंड्सला क्रिकेटची आवड निर्माण झाली. शाळेत आपल्या तुफान बॅटिंगने त्याने सगळ्यांना खुळ करून सोडलं. क्वीन्सलँडच्या टीमकडून त्याने फर्स्ट क्लास पदार्पण देखील केलं.

पण हे सगळं घडत होतं आणि त्याच्याकडे पासपोर्ट इंग्लंडच होत. इंग्लंडमध्ये देखील त्याची कीर्ती जाऊन पोह्चलीच होती. त्यांनी त्याला तिकडे बोलावून घेतलं. तिथल्या कौंटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यावर सायमण्डसची निवड इंग्लंड A टीममध्ये झाली. आता काही महिन्यातच त्यांच्या राष्ट्रीय टीममध्ये तो दिसणार इतक्यात सायमण्डने जाहीर केलं कि तो कधीच इंग्लंडकडून खेळणार नाही. वाट बघेन पण ऑस्ट्रेलिया कडूनच खेळेन असं त्याच ध्येय होतं.

आपल्या दत्तक आईबापाच्या देशाकडून खेळण्यास त्याने सुरुवात केली.

५)रॉबिन सिंग

रॉबिन सिंग भारतीय वंशाचा आहे हे सगळ्यांना माहित आहे. जन्मला त्रिनिदाद टोबॅगो मध्ये. त्याचे बापजादे अनेक पिढ्यांपूर्वी राजस्थान अजमेरवरून वेस्ट इंडिजला शिफ्ट झाले. ऊस तोड कामगार म्हणून गेले आणि तिथले स्थायिक होऊन बसले.

वयाच्या १९व्य वर्षी शिक्षणासाठी म्हणून रॉबिन सिंग चेन्नईला आला. क्रिकेटची आवड होतीच.त्रिनिदादमध्ये त्याने शाळा लेव्हल पासून हवा करायला सुरवात केली होती. तिथल्या अंडर१९ वगैरेंच्या टीमचा तो कॅप्टन देखील होता. रॉबिन सिंगने वेस्ट इंडिजच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये देखील सहभाग घेतला होता.

पण भारतात शिकायला आल्यावर त्याला तामिळनाडू क्रिकेट संघटनेने हेरले. रॉबिन सिंगची बॅटिंग, त्याची बॉलिंग, फिल्डिंग जबरदस्त आहे हे ओळखून के श्रीकांतने त्याला तामिळ्नाडूकडून रणजी टीममध्ये संधी दिली. या संधीने त्याला त्रिनिदाद देशाचं नागरिकत्व सोडायला भाग पाडलं. १९८९ साली वेस्ट इंडिजच्याच विरुद्ध रॉबिन सिंगने भारतीय टीम मध्ये एंट्री केली. तिथून पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.

आजही रॉबिन सिंगचे आईवडील, भाऊ बहीण वेस्ट इंडिजमध्ये राहतात. पण तो भारताचा सच्चा नागरिक बनून इथेच चेन्नईमध्ये राहतो आहे.

याचाच अर्थ सूर्यकुमारने मनात आणलं तर तो न्यूझीलंडच काय तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया कुठल्याही देशाकडून खेळू शकतो. फक्त त्याच्या सहनशीलतेचा संयमाचा बांध कुठवर टिकतो तो पर्यंतचा प्रश्न आहे. बीसीसीआय आणि कोहलीने याचा विचार अशीच सगळ्या फॅन्सची मागणी आहे.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. Pradum bhosale says

    सध्या सुरू असलेल्या osmose वैगैरे सर्व चैन मार्केटिंग वरती एखादा लेख भिडुंसाठी लिहावा

Leave A Reply

Your email address will not be published.